नर्मदा तापी माता की जय.
श्री सद्गुरू काशिनाथ महाराज यांचे अंतीम ध्येय.
श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशिनाथ महाराज, श्री दत्त मंदिर कुरखळी ता. शिरपूर. जि. धुळे.
तापीतिर्थ तटी
श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशिनाथ महाराज गंगाखेडकर आपल्या भक्तवृंदाना व सतशिष्याना गेल्या ४० वर्षापासून सांगत असत. अरे तापी तिर्थाच्या तिरी आपले मंदिर होणार आहे. तापी नर्मदा या पवित्र तिर्थाच्या तटी माझे गुरू प्रभु यल्लालिंग महाराज व आजे गुरू, श्री सिध्दलिंग महाराज यांच्या नावाचा जय जयकार झाला पाहीजे. अशी माझी अंतीम इच्छा आहे.
याप्रमाणे महाराज नेहमी बोलत असायचे.
पुणरपी जननंम् ।। पुणरपी मरणंम् ।।
माझे काही भक्त तापी व नर्मदाच्या परिसरात महाराष्ट्र व मध्यप्रदेश प्रांतात पुनरपी जन्माला आली आहेत. गुरू शिष्यांच्या ऋणानुबंधाप्रमाणे गुरू व शिष्यांची पुन्हा भेट होते. जन्म जन्मांतरीची भेट पुन्हापुन्हा होत असते. आणि शेवटी गुरूप्रसादाचे (अनुग्रहीत) अधिकारी होतात.याप्रमाणे सद्गुरू काशिनाथ महाराज त्यांच्या पवित्र मुख कमलातुन अमृत ध्वनी प्रसरण करीत असत.
श्री सद्गुरू काशिनाथ महाराज यांचे अंतिम ध्येय.
श्री सद्गुरू काशिनाथ महाराज यांचे दिर्घविचार व अंतीम इच्छा स्मरणात ठेऊन महाराजांचे काही सद् भक्त गंगाखेड निवासी श्री सुभाष मामु झवेरी, श्री माधवराव भरकंडकर, श्री नरहरी नामदेव धापसे, श्री किरण ठाकुर, श्री भोसले साहेब नगरपरिषद गंगाखेड या सद्भक्तानी संकल्प केला. महाराजांच्या अंतीम ध्येयपुर्तीसाठी तापीच्या काठी श्री दत्तमंदिर व महाराजांचे (गुरूमंदिर) झालेच पाहिजे. असा संकल्प गुरूचरणी करून आणि क्षणाचाही विलंब न लावता ही सर्व सत्षिष्य मंडळी धुळे जिल्हा, ता. शिरपुर, कुरखळी ग्रामी जाऊन दाखल झाली. कुरखळी येथे श्री शंभोमहादेव कुरकुटेश्वर भगवान यांची पूजा व अभिषेक करून तापीमाईचे दर्शन व पुजन करून कृतार्थ झाले आणि आनंदाच्या भाववेशात त्यांचा आत्मविश्वास प्रबळ झाला. आपले कार्य महाराज पुर्णत्वाप्रत नेऊन सोडणार यात शंकाच नाही आणि खरोखरच आश्चर्य असे की, सद्गुरू माउलीनी त्याना पदरात घेतले व शुभाशीर्वाद देऊन त्याच दिवशी दत्तमंदिरासाठी भुमी संपादन करण्यात आली. कुरखळी गावचे परम भक्त श्री छगन भिलाडे पाटील, कुरकुटेश्वरचे पुजारी श्री गुरव व त्यांच्या सुविद्य पत्नि सौ.कला जानकीराम गुरव या भक्तांनी दोन एकर जमिनीचा ठराव करण्यासाठी खुप श्रम घेतले व जमीन मालकाने जमिनीचा मोबदला घेऊन इसारत पावती दिली आणि चार ते पाच महिन्यात रजिस्ट्रेशन करण्यात आले. त्याच क्षणी औदुंबर, पिंपळ, वटवृक्ष या त्रिवृक्षाच्या छायेत श्री दत्तप्रभुंच्या पादुका व महाराजांच्या पादुका ठेऊन पुजा केली, हे होत असलेले कार्य पाहुन कुरखळी व शिरपुर इत्यादी गावचे भक्त वरचेवर दर्शनास येऊ लागले. महाराजांचा जय जयकार होत राहिला व त्याच काळात महाराजांचा आशिर्वाद घेण्यासाठी व दर्शनासाठी शेकडो सदभक्त येऊ लागले.
शिरपुर येथील एक परमभक्त बालाजी हाॅटेलचे मालक श्री शाम महाजन (छोटू), शिरपुर निवासी यानी सर्वतोपरी मदतीचा सिध्द हस्त पुढे करून भगवंताच्या कार्यास झोकून दिले. व रात्रंदिवस प्रयत्नाची पराकाष्ठा करून मंदिराच्या निर्माण कार्यास अखंड राबत राहीले. त्याच प्रमाणे कुरखळी ता. शिरपुर येथील काही भक्त, पाटील बंधु व इतर गावातील भाविक भक्तवृंद या कार्यास सर्वतोपरी मदत करून स्वतः रांत्रदिवस कार्यरत राहीले. श्री परम भक्त वसंत छगन भिलाडे सद्गुरू काशिनाथ महाराज यांच्या मंदिराच्या निर्माण कार्यास सदैव तत्पर रहात असत. एकेकाळची गोष्ट आहे, श्री वसंत छगन भिलाडे यांचे निवासस्थानी मुरूड ता. जि लातुर येथील भक्त डाॅ आन्ना बाबाजी व लातुर येथील भक्त मनमथ आप्पा काळे हे दोघे त्यांचे घरी गेले असताना त्याना फार आनंद झाला व वसंतरावाच्या वडिलांना बोलता बोलता डाॅ आन्नांनी शुभ आशिर्वाद दिला. त्याच क्षणी ते उठून बसले व डाॅ आन्नांना प्रणाम करून, दोन्ही हात जोडले व नेत्रातून पाणी गाळत कळवळून म्हणाले, डाॅ. बाबाजी माझे वय ८९ ते ९० वर्षाचे झाले आहे, माझी दृष्टीमंद होत आहे व अर्धांग वायुने मी त्रस्त आहे. आता मंदिर केंव्हा तयार होणार? मला महाराजांचे कधी दर्शन होणार? माझ्यासमोर लवकर मंदिर व्हावे व मला महाराजांचे दर्शन घडावे ही माझी अंतीम इच्छा आहे. पाटलांच्या वयोवृध्द वडिलानी असे कळवळून उद्गार काढले व नेत्रातून अश्रू गाळत डाॅ. बाबाजींचे दोन्ही चरण धरून दर्शन घेतले. त्याचक्षणी पाटलांची अंतःकरणातून असलेले प्रेम व भक्ती पाहुन डाॅ. बाबाजी पाटलाना म्हणाले, अहो पाटील सद्गुरू काशिनाथ महाराज तुमच्या पाठीशी व अंतरंगात सदैव उभे आहेत, आपल्यासारख्या परम भक्तांच्या इच्छापुर्ती साठीच इथे आले आहेत, आपल्या इच्छेप्रमाणे महाराजांचे मंदिर वर्षाच्या आत तयार होईल व आपल्याला महाराज प्रत्यक्ष दर्शन देतील यात शंकाच नाही. ते ऐकुन पाटलाना परमांनद झाला ईश्वरकृपा ही दत्तप्रभुंची कृपा व सद्गुरूनाथांची महान कृपा या द्विवेदी कृपेने पाटलाना पदरात घेतले व माघ शुध्द १५ पौर्णिमा तारीख २२.१२.२००८ इ.सन. शुक्रवार रोजी महाराजांचे मंदिर निर्माण कार्याचे काम पूर्ण झाले आणि याच शुभ मुहुर्ती श्रीदत्त प्रभुंच्या सगुण = निर्गुण मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. श्री महाराज जरी गंगातीरी गंगाखेड नगरीत समाधिस्त असले तरी स्थितप्रज्ञ अवस्थेत जग उध्दाराचे जनकल्याणार्थ भविष्य काळाच्या ओघाने, अधुरे राहिलेले कार्य व भक्तांच्या उध्दारार्थ संदेश वाहकाचे कार्य करून घेत आहेत. सद्गुरू काशिनाथ महाराज हे एक युग पुरूष म्हणुन जन्माला आले आणि अवतार घेऊन परंपरेप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या नावाने प्रत्यक्ष श्री अवधुत दत्तात्रेय भगवान, कर्नाटक व आंध्र प्रांतातून गाणगापुर ग्रामी भिमा अमरजा संगमी प्रगट झाले. तेथील भक्तांचा उध्दार करून एका श्री शैल्य पर्वताच्या कर्दळीच्या पानात गुप्त झाले पुढे चारशे वर्ष गुप्तच राहीले व एक वृक्षाच्या बुंध्याषी सिध्दासनात आरूढ होऊन आत्मा ब्रम्हांडी नेऊन स्थितप्रज्ञ राहीले. याच काळात त्यांच्या देहाभोवती वारूळ तयार झाले आणि नृसिहं सरस्वती स्वामी महाराज. (प्रभु दत्तात्रेय) वारूळात बंद झाले. चारषे वर्षे संपताच, काळ आणि वेळ येताच, एक सरपण विकणारा मजूर जंगलात सरपण शोधीत असताना त्याला एक भला मोठा वृक्ष कडक वाळलेला दिसला. तो वृक्ष बुंध्यापासून तोडू लागला, तेंव्हा त्याची कुऱ्हाड चुकून वारूळात घुसली क्षणार्धात वारूळाचे दोन भाग झाले व वारूळातुन भव्य शरीरधारी महान तेजपुंज मुर्ती बाहेर प्रगट झाली आणि त्या मोळी वाल्यास शुभाशिर्वाद देऊन कृतार्थ केले व श्री स्वामी समर्थ या नावाने प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभु प्रगट झाले. तेच आज क्षेत्र अक्कलकोट येथे वटवृक्ष स्वामी समर्थ म्हणुन त्यांचे समाधी मंदिर आहे.
अक्कलकोट स्वामी समर्थ वटवृक्षाच्या बुंध्याषी समाधीस्त असताना (अहंब्रम्हास्मी) एक दापंत्य पुत्रप्राप्तीचा आशिर्वाद घेण्यासाठी तेथे आले असताना स्वामी समर्थ त्याना पहाताच म्हणाले, आप आये हैं मै पहचान लिया अब दर्शन लेकर यहाँसे जाईए । हे समर्थांचे शब्द मुखकमलातुन बाहेर पडताच तेंव्हा ते दापंत्य आज्ञा होताच परत गावी जाण्यास निघाले त्याच समयी स्वामी समर्थ समाधिस्त झाले.
नोंदः- वरील विषय महाराजानी रामवाडी येथे ०४.१०.१९६२ साली औदुंबराच्या ओठयावर प्रत्यक्ष निरूपन केला आहे. आणि पुढे काही काळानंतर काशिनाथ महाराज म्हणुन जगाच्या कल्याणा संताच्या विभुती. याप्रमाणे जन उध्दारार्थ मराठवाडयात रामवाडी ग्रामी अकस्मात येऊन दाखल झाले. तेथील पुरातन दत्त मंदिरातील पादुकांचा जिर्णोद्वार करून ६० ते ७० वर्षे तेथेच राहून जनकल्याणार्थ आपला देह कष्टवित राहीले. खडतर तपोनुष्ठान करून एकेकाळी गुरू आज्ञेप्रमाणे श्री संत जनाबाईच्या जन्म भुमीत जनाबाईच्या पद स्पर्शाने पुनीत झालेल्या भुमीत गोदावरीच्या तिरी गंगाखेड नगरीत समाधीस्त झाले. चार ते पाच वर्षे लोटताच आपल्या सत् शिष्यांच्या अंतरीच्या अंतरंगात जाऊन जागृत केले व भविष्य काळाच्या भविष्य वाणीने त्याना शुभाशिर्वाद देऊन पुढील कार्य करण्यास प्रवृत्त केले. त्याच अनुषंगाने पवित्र तापीमैया नर्मदामैया इत्यादी ठिकाणी जग कल्याणार्थ प्रगट होऊन भक्ताना ज्यांच्या त्यांच्या भाव भक्तीप्रमाणे पावन करून घेत आहेत. महाराज जरी समाधिस्त असले तरी ते एकेकाळी भक्ताना उद्देशुन म्हणत असत. अरे तुमच्या महाराजांची समाधी झाल्यावर आठ - नऊ - दहा वर्षाच्या आत मी परत येईन व गंगाखेड येथे तिसऱ्या मजल्यावर मध्य भागच्या कमानीत असेन त्यावेळी मी तुम्हाला ओळखीन पण तुम्ही मला ओळखणार नाहीत, अरे तुम्ही मला हकलून लावाल.
याप्रमाणे महाराज बरेच वेळा बोलत असत, याचाच अर्थ असा होतो की, श्री महाराज तापी नर्मदा तिर्थाच्या किनारी अवतार घेऊन जणकल्याणार्थ कार्य करीत आहेत व जुन्या भक्तांच्या ज्यांच्या त्यांच्या कडून जे कार्य करवून घ्यावयाचे आहे त्याप्रमाणे गंगाखेड निवासी असलेल्या काही भक्तांना ‘‘मर मर मरा बैलासारखे मरा’’ या महाराजांच्याच उक्तीप्रमाणेच श्री महाराजानी याच कार्यास कायमचे जुंपले आहेत व महाराज स्वतः मागे राहून त्या भक्ताना हाकत आहेत पण कासरा मात्र हातात धरला आहे. महाराज हाकतील त्याप्रमाणे बैल चालत आहेत. आज्ञानाच्या अंधःकारातुन ज्ञानाच्या प्रकाशात.
तापी व नर्मदा या भागातील भक्तांच्या उध्दारार्थ जनकल्याणार्थ गरीबांच्या सुख दुःखात सहभागी होऊन सत्य सुखाच्या दुःखदायी संवेदना निर्मुलनार्थ कार्य करीत आहेत. तसेच आज्ञानरूपी अंधःकारातुन त्याना अमृतोपदेश करून उपकृत करण्याचे कार्य करीत असत. सद्गुरू काशिनाथ महाराज एकेकाळी काशियात्रेस इ. सन १९७० साली संचार करीत असताना श्री क्षेत्र ॐकारेश्वर येथे जाट समाजाच्या धर्मशाळेत नर्मदा तिरी विश्रांतीस थांबले होते. रात्रीचे दहा वाजता साधनेस (जपास) सन्मुखासन लावून स्थिर झाले. पाच सहा तास एकाग्रतेत समाधिस्त झाले व पहाटे चार वाजता उठून आपल्या शिष्यांना उपदेशामृत करीत असताना म्हणाले, अरे शंकर डाॅक्टर तुमचे महाराज या पुढील काळात विहंगम अवस्थेत तापी नर्मदा नदीच्या तटी महामंडलेश्वर महेश्वर सनावत ब्रम्हा या पवित्र स्थानी व तापी तटवर्ती भागात पवित्र तिर्थी भ्रमण करीत राहतील. तेथील भक्तांचे दुःख हरण करून त्यांच्या उध्दारार्थ अवतरीत होतील जे काही माझे, माझे माझेच राहीलेले आहेत जन्माला आली आहेत ते मुमुक्षु माझेच आहेत रे. त्यांच्या उध्दारासाठी माझे मोठे महाराज माझे गुरू यल्लालिंग प्रभु महाराज, सिध्दलिंग गुरू माझे आजेगुरू, यांच्या आज्ञेप्रमाणे पुढील काळात तापी नर्मदा तटी विहंगम स्थितीत राहणार आहे. हे पहा एक भ्रमर, कमळ पुष्पावर बसुन सुखाचा गंध घेत असताना त्याचे मन अंतःकरण त्या सुंगधात हरवते. पण त्या कमल पुष्पाच्या पाकळया मिटताच तो आतच अडकून रहातो. आष्टदल कमलाची पाकळी उमललेली परत काही वेळानी बंद होते. त्याचक्षणी सद्गुरू भक्ताना स्वप्नातसुध्दा मंत्र दिक्षा देऊन कृतार्थ करतात. आणि त्यांच्या पुर्व संचिताप्रमाणे पुर्व जन्मीच्या प्रारब्ध कर्माप्रमाणे, त्यांचा उध्दार करतात.सत्संगतीतुन ज्ञानामृताचे प्राषन करवून घेतात. जसे ज्यांचे संचीत, प्रारब्ध व क्रियामान ही त्रिपुटी आहे. (जैसे ज्यांचे कर्म त्यांसी फळ देतो ईश्वर) असे सद्गुरू काशिनाथ महाराज इ.सन. १९७० ला ओंकारेश्वर पवित्र क्षेत्री नर्मदा माईच्या तिरी ब्राम्ही मुहूर्ती गुरूंच्या मुख कमलातून सहज बोलून गेले.
तापी तिर्थ महिमा.
श्री समर्थ सद्गुरू काशिनाथ महाराज भक्तांना तापी तिर्थाचा महिमा पुन्हा पुन्हा सांगत असत. तापी नर्मदा तिर्थाच्या काठी अनेक महान तपस्वी महर्षीचे वास्तव्य झालेले आहे. नर्मदा परिक्रमा करण्यासाठी साधुसंत, मायीची परिक्रमा करीत असतात. तापी संथपणे प्रवाहीत आहे तर नर्मदा मातेच्या उदरी गोल गोल गोठे वाळवंटात विखुरलेले दिसतात. काही शिवपिंड आकाराचे तर काही शाळीग्राम मातेच्या उदरी दिसतात. तापीच्या काठी अनेक देवतांची मंदिरे व साधु सत्पुरूषांचे आश्रम आहेत. तापी माता हे तिर्थ भक्तांचे पाप व ताप हरण करणारे आहे. महान ऋषी मुनींच्या पवित्र पद्स्पर्शाने तापीचे जल शुध्द व पवित्र झालेले आहे. कांही काळी तापी तिरी महान तपस्वी श्री तपेश्वर महाराजानी तपोनुष्ठान केलेले आहे ते तिर्थ भक्तांचे ताप व व्याधी नष्ट करते. पुरातन काळी तापीला तृप्ती म्हणून ओळखत असत, कारण त्याकाळी तापीचे जल गरम होते. तापीच्या तिर्थस्नानाने अनेकांचे महारोग, चर्मरोग वगैरे बरे होत असत.
महान तपोनिधी अग्निरस महर्षी.
महर्षी अग्निरस ऋषींच्या पवित्र स्पर्शाने तापीचे जल गरम होऊन वाहत असे, एकेकाळी गुरूदेव सांगत असत, तापी तिर्थ हे भक्तांचे दुःख हरण करणारे महान तिर्थ आहे. तापीच्या किनारी सातपुडा डोंगर रांगेत एका पहाडाच्या पायथ्यासी एका गुहेत महर्षी अग्निरस समाधिस्त बसले असताना बरेच वर्षे लोटली. महर्षी अग्निरस साधनेत खेचरीमुद्रेत स्थितप्रज्ञ होते. त्यांचा नित्य नियम असे की, ब्राम्ही मुहुर्ती धुनीतील रसरसीत अग्नि कमंडलुत भरून घेत. आणि तापीच्या प्रवाहात सोडुन स्नान आटोपुन तापीचे तिर्थ कमंडलू भरून घेत व त्या तिर्थाने धुनीची पुजा करून धुनीतील रसरसीत अग्निचा लाल गोळा ओंजळभर हातात घेऊन दोन्ही हातानी कमंडलूत पिळत व अग्निचा रस काढून कमंडलु भरत असे. त्यांच्या तपोबलाने अग्निचे पाणी होत असे. मध्यांन्नी महर्षी अग्निरस उष्ण जल अग्निचा रस तापीच्या पात्रात सोडत व पुजा करीत असत.याप्रमाणे ते प्रातःकाळी, मध्यांन्नी व सायंकाळी गोरज मुहुर्ती त्रिकाळ स्नान करीत.याच काळात तापीचे पाणी त्यांच्या तपोबलाने गरम होत राहीले अशी ही दुःखनाशीनी तापीमाता संथपणे प्रवाहीत आहे. एकेकाळी इ.सन १९७० साली श्री पुज्यनिय सद्गुरू काशिनाथ महाराज आपल्या काही शिष्यांना घेऊन काशीयात्रेस पुर्णा त खांडवा जात असताना तापीचा ब्रीज आला. गाडी ब्रिजवर प्रवेश करताच महाराज म्हणाले, अरे दिगंबर तुझी तापी आली बघ. इतक्यात महाराजांचा हालणारा दात पडला तो दात महाराजानी भक्त शंकर डाॅक्टरच्या हातात दिला व म्हणाले, घे सांभाळ. अरे दिगंबरची तापी आली व दुःखणाऱ्या दाताचा ताप गेला.
सहजची बोलणे हीत उपदेश. याप्रमाणे महाराज सहज बोलून गेले. आणि पुढील प्रवासात तापीचे महत्व सांगतच राहीले पुढे चार ते पाच वर्षे लोटताच दिगंबर गायकवाड एस.टी चालक उस्मानाबाद यांना उदररोग झाला व त्यातच त्यांचा देहांत झाला. सहा सात वर्षानंतर महाराज गंगाखेड आश्रमात असताना डाॅक्टर शंकररावाना म्हणाले, अरे डाॅक्टर आपल्याला गुरू मंदिराचे भुमिपूजन करायचे आहे तर मग तापीचे तिर्थ घेऊन ये. लवकर निघ आणि हे पहा सोबत देवकातेना घेऊन जा. अरे, तापीच्या काठी एका गावात आपला दिगंबर गायकवाड जन्माला आला आहे. हे महाराजांचे बोलणे ऐकूण डाॅक्टर व देवकाते तुळजापुरकर यानी नतमस्तक होऊन श्री चरणी दर्शन घेतले. असे महाराज सहज बोलून गेले व परत क्षणभर शांत राहीले व पुन्हा म्हणाले, अरे शंकर डाॅक्टर हे पहा माझे गुरू यल्ललिंग प्रभुंचे नाव तापी नर्मदा काशीपर्यंत गेले पाहिजे रे.
असा माझा कोण भक्त आहे की गुरूंचे अंतीम ध्येय पुर्णत्वाप्रत नेऊन सोडील. असे महाराज बोलून जात असत. बऱ्याच वेळा तापी नर्मदा म्हणून भक्तांना सांगत आणि तापीचे महत्व वर्णन करून सांगत असत. माझे आजेगुरू सिध्दलिंग महाराज लच्चाण, भिमा तिरी स्थितप्रज्ञ आहेत.गुरूदेव यल्लालिंग प्रभु मुगळखोड कृष्णातीरी समाधिस्त आहेत आणि तुमचे गुरू, गोदावरी तीरी स्थितप्रज्ञ रहातील.
गुरू सिध्दलिंग, यल्लालिंग यांच्या नावाचा जय जयकार करून, ध्वज तापी नर्मदा स्थानी फडकवितील व या त्रिवेणी संगमाचा जयजयकार दक्षिण काशी ते उत्तर काशी चंद्र सुर्य असेपर्यंत होत राहील. वरीलप्रमाणे महाराज भाववेशात येऊन आनंदांच्या परमानंदात जाऊन अश्रु गाळत प्रणव मुखकमलातुन बोलून जात असत. अरे बाबानो ऐका, पुन्हा तुम्हाला कोण सांगणार नाही. माझे जे परमभक्त आहेत, जे आहेत ८,९,१० त्यांचे काय करायचे ते मीच करून टाकीन तो माझा अधिकार आहे. असे महाराज बोलत असत.
(लेखकाला चरणारविंदी स्थान देऊन पदरात घेऊन जे ज्ञान दिले ते आजतागायत स्मरणात ठेवले. ही सर्व लिला गुरू माउलींचीच आहे.) इथे लेखक निमित्तमात्र आहे.
सद्गुरू काशिनाथ महाराज महान यौग्याचे योगी म्हणजे महान कर्मयौगी यांनी १२० वर्षाच्या आयुष्यात, त्यानी महत्व जर दिले असेल तर ते फक्त कर्मालाच. कर्म (काम) सर्वश्रेष्ठ म्हंटले आहे. हाती काम मुखी नाम. अखंड कर्मरत रहात असत. चोवीस तासातून ते अठरा तास खंड न पडता उद्योगात रहात. महाराजांचा आवडीचा उद्योग शेतीव्यवसाय व पषुपालन पुर्ण आयुष्यभर ते शेतीवर काबाड कष्ट करीत राहिले मर मर बैलासारखे राबत असत. सकाळी सात ते सायंकाळी ९ ते १० पर्यंत उद्योगात रममान रहात असायचे. ते म्हणत असत, जो माझा भक्त प्रेमाणे भुमातेची मशागत (सेवा) करतो तोच भक्त महाराजाना प्रिय असे. महाराज नेहमी सांगायचे अरे शेती व्यवसाय निष्पाप आहे रे, जो भक्त अखंड उद्योगी व अखंड नामी असतो तोच महाराजाना आवडत असे. एवढेच नव्हे तर फळाची आशा न धरता जो कर्म करतो तीच सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. तिथेच मुक्ती आहे.
निष्काम कर्म व निष्काम भक्ती हीच अनन्य भक्ती व हीच गुरूभक्ती आहे. असा महाराजांचा अमृतमयी उपदेश भक्ताना होत असे.
-: गुरूभक्तीयोग: -
श्री सद्गुरू काशिनाथ महाराजानी गुरू भक्तीचा जिव्हाळा, गुरू प्रेम, गुरूचरणी विनम्र भाव व गुरूचरणाची पवित्र धुळ मस्तकी धारण करून श्री गुरूंचे अंतीम ध्येय (शेवटची इच्छा) पुर्णत्वाप्रत नेऊन पोहंचविण्यासाठी आपल्या परम भक्ताना शुभार्शीर्वाद देऊन अंतीम ध्येयाची संकल्पपुर्ती करून घेतली. खरोखरच महाराजांच्या सहा लाख शिष्यातुन गंगाखेड निवासी काही भक्तवृंद जे की, परम भक्त कर्मरत असणारे पुर्वस्थीतीतून परिपक्व असलेले कांही शिष्यवृंद असलेले भक्तापैकी श्री भक्त सुभाष मामु झवेरी गंगाखेडकर यांच्या शुभ हस्ते गुरू मंदिर (समाधी मंदिर) निर्माण कार्याचे भुमीपूजन सोहळयाचे श्रीफळ फोडून भुमीपूजन करण्यात आले. गुरू सेवेचा त्याचक्षणी सुभाषमामू यांना त्रिवार आशिर्वाद देऊन भक्त सुभाष मामू झवेरी यांच्या अंतरंगी जाऊन अंतरीच्या अंतरात्म्याला खाड्कन् जागृत केले. म्हणजेच नारळ फोडताच मामूच्या पाठीवर गुरूदेवांनी तीन थापा मारल्या म्हणजे त्रिवार आशिर्वाद त्यांना प्रदान केला व गुरूंच्या अंतीम ध्येय पुर्तीचा संकल्प सोडवून घेतला. तापी मातेच्या तिरी श्री गुरूंच्या कृपेने आशिर्वादाने व कुरकुटेश्वर भगवान शंभो महादेवाच्या कृपेने एका सूक्ष्म तत्वातुन (क्षणभंगुर) देहाकडून अवधूत दत्तात्रेय - सिध्दलिंग - यल्लालिंग - या त्रिगुरू देवांचा जयजयकार चंद्र सुर्य असेपर्यंत (विराजमान आहेत तोपर्यंत) अखंड रहाणारच हे त्रिवार सत्य आहे. या उभयताना गुरूंचा आशिर्वाद लाभला त्याच महा आशिर्वादाच्या महाशक्तीने......
श्री परमभक्त सुभाषमामू व त्यांचे बंधु श्री नरहरी नामदेव धापसे (टेलर) गंगाखेड निवासी व श्री भक्तराज गुरूबंधु माधवराव फरकंडकर, आडत व्यापारी गंगाखेडकर या परम भक्तांनी व इतर भाविकानी सुभाषमामूना सहकार्य करून गुरूभक्ती योगाची चालना देत राहीले. तसेच श्री कुरकुटेश्वर महादेव व तापी मातेचा आशिर्वाद घेऊन कुरखळी निवासी भक्त हिंमत सदाकोडी, श्री शेखर बाजीराव मोरे कुरखळी ता शिरपुर, श्री दिलीपसिंग दत्तुसिंग राजपुत, श्री भक्त रतन मोतीराम भिल कुरखळी तसेच भिलाडे पाटील बंधु शिरपुर निवासी, भक्त शाम वसंत महाजन (छोटेभैया) यांच्या निष्काम भक्तीतुन वेळोवेळी सहकार्य महाराजांच्या कृपेने सुभाषमामू भक्ताला मिळत राहीले. वरीलप्रमाणे भक्तांच्या निष्काम सेवेने व परिश्रमातून दत्त मंदिर व गुरू मंदिर कुरखळी ग्रामी ता. शिरपुर जि. धुळे या लहानशा गावी तापी तिरी मिथी वैशाख वद्य १४ शिवरात्री या शुभ दिनी ब्राम्ही मुहुर्ती श्री सद्गुरू काशिनाथ महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली कुरखळी व शिरपुरच्या भक्तानी मंदिर निर्माण कार्यास सर्वतोपरी मदत करून अहोरात्र परिश्रम घेऊन मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण करून घेतले. मंदिराच्या परिसरात एक हनुमान मंदिर व औदुंबर, पिंपळ व वटवृक्ष या छायेत दत्त प्रभुच्या निर्गुण पादुका व गणेश मंदिर इत्यादी धार्मिक स्थाने तयार केले.
।। त्रिवृक्ष तिर्थकुंड ।।
1. औदुंबर वृक्ष म्हणजे दत्तप्रभु तिर्थकुंड.
2. वटवृक्ष म्हणजे ऋषी तिर्थकुंड.
3. आश्वस्थ /पिंपळ वृक्ष म्हणजे नृसिंह तिर्थकुंड.
वरीलप्रमाणेच्या स्थानी दर्षविलेल्या देवतेचे वास्तव्य असल्यामुळे त्रिवृक्षाच्या बुंध्याषी (तिर्थकुंड).
अशाचप्रकारे त्रिवेणी संगम आहे.
1. गंगामाता 2. यमुना 3. सरस्वती
पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम. म्हणजेच
1. सिध्दलिंगेश्वर 2. यल्लालिंगेश्वर 3.काशिलिंगेश्वर
यांचा संगम होय.
श्री समर्थ सद्गुरू काशिनाथ महाराज महान यौगी महान कर्मयौगी त्यांच्याच कृपाआशिर्वादाने कुरकुटेश्वर प्रभुंच्या कृपेने भक्तांच्या कल्याणार्थ परमात्मा सर्वाठायी सर्वत्र परमात्म रूपच विलसत आहे. अवधुत सदानंद ।। परब्रम्ह स्वरूपिणे ।। विदेह देह रूपाय ।। काशिनाथाय नमस्तुते।।
ॐ शांती शांती शांती.
ॐ आसतो मा सद्रगमय ।। तमसो मा ज्योतिर्गमय ।।
मृत्र्योमा अमृत गमय ।।
या ग्रंथात लिहलेला वृत्तांत म्हणजे महाराजांच्या मुखातून निघालेले महान ज्ञानाचे ज्ञान म्हणजे महद् ज्ञान आहे. भक्तांनी या विचाराचे अनुकरन करावे व अर्थ परिपुर्ण करून ज्ञान घ्यावे व शुभ कार्याचे फळ प्राप्त करून घ्यावे. हे महान विचार अक्षय आहेत, जीवनाचे कल्याण करणारे आहेत, याच विचाराने आत्म शांतीचा लाभ होईल.
श्री गुरूदेव.
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
उत्तर द्याहटवासद्गुरु काशिनाथ महाराज की जय
खूपच छान पूजा तू तापी नर्मदेचं महात्म्य
वर्णन करणारा लेख टाकलेला आहेस धन्यवाद