२०. माझ्या जिवन यात्रेत.

 ।। श्री समर्थ सद्गुरू माऊलींचे उदगार ।।

    माझ्या जिवन यात्रेत माझ्या भक्ताना मी अखंड घेऊन प्रवास करीत असतो. माझे प्रिय भक्त नानाविध अपराध करतात, तरी त्याना दया, क्षमा अखंड करीत असतो. माझ्या असंख्य भक्ताना प्रभु कडून दया करण्याची आज्ञा मागत असतो.

    श्रीराम कृष्णपंथ हे अकस्मात प्रगट होऊन वत्सलाभूत झाले. असे महाराज १९७० साली बोलून गेले.

                  तरी पण ज्याचे पाप = त्याचे बाप.

ॐ  शांती - शांती - शांती.

    परंतु तो काळ आणि वेळ २१ वर्षानंतर संपत असतोे. आता यापुढे हे स्तवण न करता शिष्याला मंत्र देण्यापुर्वी अनुग्रह देण्याच्या अगोदर.

गुरूरब्रम्हा गुरूर विष्णु । गुरूर देवो महेश्वरा ।  

गुरूर साक्षात परं ब्रम्ह । तस्मै श्री गुरूवेन नमः ।।

    हे स्तवण प्रथम करून नंतर बीजमंत्र द्यावा लागतो. सांगण्याचा मतीतार्थ म्हणजे पुर्वार्ध २१ वर्षाचा व उत्तरार्ध पुढील आयुष्याचा या प्रमाणे बीज मंत्राची शक्ती उत्तरार्धात क्षीण व सौम्य रहाते व पुर्वार्धात बीज मंत्राची शक्ती बलवत्तर रहाते. एक एक नमोकार एक हजार पटीने पुष्टीवर्धक असतो. अंतःकरणाच्या टोकानी  ॐ चा ध्वनी स्थिर होतो. आणि जेवढी जास्तीत जास्त जपसंख्या होते ती सर्व ॐ ही पिंड देहात स्थिरावते. २१ हजार ७५२ जप २४ तासात सहज होतो. प्रत्येक श्वासासोबत एक मंत्र घेतला तर दिवसाचे १२ तास व रात्रीचे १२ तास एकुण २४ तासात २१७५२  श्वास व त्या सोबत जप सहज होतो. पण............

 पडीले वळण इंद्रिया सकळा ।।

    देह इंद्रियाला श्वासासोबत नाम घेण्याचे वळण पडले पाहीजे. तेंव्हा दिवस रात्र झोपेत पण वळण पडल्यामुळे इंद्रिये तेच काम करतात. जप झोपेत सुध्दा चालु रहातो.याप्रमाणे इंद्रियाना वळण पडल्यास जपाची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाते. हां हां म्हणता साधक काही वर्षाच्या काळात चोवीस तासात लाखो जप सहज व सुलभतेने करू शकतो. कारण इंद्रियाला वळण पडल्याने या देहाचे एक एक इंद्रिये हेच काम करीत राहतात. प्रथमावस्थेत एकच इंद्रिय जप करते. ते मुखकमल नंतर दोन्ही नेत्र याच कार्यात कार्यरत राहतात तसेच नासिका , दोन कर्ण, दशांद्रिय, याच कार्यात राहतात. अशी शरीराची दाहीद्वारे नामस्मरणाच्या कार्यात राहतात. यावेळी २४ तासात लाखावर जपाची गती वाढत रहाते आणि कालांतराने देहाच्या त्वचेत रोम रोम ॐ चा गुंजारव (ध्वनी) चालु रहातो. आता कोटयावधी जप २४ तासात पुर्ण होतो.याप्रमाणे पुर्णत्वात मंत्रोपदेषाच्या महान शक्तीचा संचय होतो. साधक परम पवित्र परमात्म शक्तीच्या साह्याने सम्राट होतो. परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रथमावस्थेत साधक अचेतन जरी असला तर तो सचेतन मध्ये परावर्तीत व्हावा लागतो व नंतर सचेतन मधून कर्पूर मध्ये परावर्तीत व्हावा लागतो. म्हणजे महाभयंकर कठीण तीन पायऱ्या आहेत. त्या तीन प्रयत्नांची पराकाष्टा करून चढता येतात. एकदा का प्रथम पायरी वरून तिसऱ्या पायरीवर चढताच कर्पुर वृत्तीत परिवर्तन होण्यास वेळ लागत नाही. अचेतन म्हणजे न पेट घेणारी व सचेतन म्हणजे प्रयत्नांती पेट घेणारी. आणि कर्पुर म्हणजे कापराप्रमाणे अग्निचा स्पर्श होताक्षणीच प्रज्वलीत होणारी. हीलाच कर्पुरवृत्ती म्हणतात. साधकाची अचेतन वृत्ती मधुनच कर्पुरवृत्ती बनते तेंव्हाच या सर्व गोष्टी साध्य होतात. एवढयासाठीच गुरूंचा उपदेश घेऊन गुरूंची कृपादृष्टी संपादन करून घ्यावी लागते. प्रत्येक मनुष्य मात्राच्या जीवनात गुरूंची अत्यंत गरज आहे. गुरू प्राप्तीशिवाय या सर्व गोष्टी साध्य होत नाहीत. ज्यांच्या जीवन यात्रेत गुरूंची भेट होते, अशा साक्षात्कारी महापुरूषांकडून बीज मंत्राचा उपदेश मिळतो. तो अंगीकार करून त्याचे श्रवण व मनन करून निदिध्यास करावा लागतो व गुरूंच्या सत्संगतीचा योग लाभावा लागतो. गुरू महाराज जे सांगतील, जे ज्ञान देतील, जो मार्ग दाखवतील, त्याचे कटाक्षाने पालन केले पाहीजे. गुरू जो बोध देतील तो अंगी बानला पाहीजे गुरूंच्या प्रत्येक शब्दावर आत्मविश्वास ठेवला पाहिजे. 

    सर्व गोष्टीचे अंतःकरणातुन अनुकरण केले पाहीजे. गुरूज्ञान हे अपरंपार असल्याने फार मोठी शक्ती गुरू वाक्यात सामावलेली आहे. पण आत्मविश्वासाने ती संपादन करून घेतल्याने त्या शक्तीचा फार मोठा अक्षय लाभ मिळतो. गुरू भक्ती ही सर्व श्रेष्ठ परम पदाची प्राप्ती करून देणारी एक महान शक्ती आहे.

    गुरूंच्या सेवेत राहुन गुरू बोधामृताचे प्राशन केले पाहीजे. सद्गुरू हे माझे परम दैवत समजून, गुरू सेवा हाच माझा भाव, गुरू भक्ती हीच माझी आत्मनिष्ठ भावना उदयांचलास यावी लागते. तरच सेवेचे फळ मिळते.एकेकाळी सद्गुरू काशिनाथ महाराज एका भक्ताला म्हणाले, अहो! शंकर डाॅक्टर ही भक्ती सोपी नाही. फार अवघड आहे. भक्ती - भक्ती - म्हणत बसल्याने भक्ती होत नाही भक्तीसाठी प्रथम मनुष्याचा भाव पाहिजे, भाव आणि भक्ती ही दोन्ही बहिण भाऊ आहेत. ते सख्खे बहिण व भाऊ आहेत. ते सावत्र भाऊ नाहीत बर का! आध्यात्मात सुध्दा नाते गोते असते. आध्यात्माच्या संसारात सर्वच आहेत. इह लोकांच्या संसारात पैसा असेल तरच संसार चालतो व आध्यात्माच्या संसारात नाम असेल तरच आध्यात्म साध्य होते. नाम हे चलन आहे नामाच्या अमाप संचयाने आध्यात्मात अनेक अनुभूती येतात. सुखाचे व दुःखाचे ज्ञान होऊन प्रकृती स्वास्थ्य लाभते. चैतन्याचा महद् प्रकाश अनुभवास येतो. याच प्रकाशात  आध्यात्म स्वयं प्रकाशित राहतो. चेतना वाढत राहते, सद्गुरू चेतनेला प्रवृत्त करीत असतात. आणि दृष्यातुन = अदृष्यात, निर्गुण निराकार भासातुन = अभासात चित्त एकाग्र होते. मन शांत  होते व गती क्षीण होते. रज तमातुन सत्वात परिवर्तन होते. मन, बुध्दी, चित्त स्थिर होते. राग, द्वेष, मत्सर, हळु हळु नाहीसे होतात. एव्हाना साधकाचा देह शांत होऊन दया, क्षमा, शांती देहाच्या ठायी वास करू लागते. तेंव्हा हा पिंडदेह शुध्द व पवित्र होतो. साधकाचा अंतर्भाव परिपक्व होऊन आध्यात्म मार्गातील साधना (जप) तप साध्य होते. अशा अवस्थेत असाध्य हे शिल्लक रहात नाही. सर्व गोष्टी साध्य होऊ लागतात.

    एवढयासाठी सद्गुरूनाथ म्हणतात. आपण जे ध्यान करतो त्या ध्यानाचे मनन करतो, ध्यानात एकाग्रता होते तेंव्हा दिवसभराचा आळस नाहीसा होऊन मन चैतन्यमय होते व शांती मिळते. ध्यान हे गुरू पदकमलाचे मुळ आहे. (गुरूचरणसेवेचे) गुरूमुर्ती ही ध्यानाचे मुळ आहे. आपण जी पुजा करतो, मातृपुजा, पितृपुजा, देवपुजा व गुरूपुजा. पुजा म्हणजे ध्यान लावून इष्ट देवतेच्या अथवा गुरूदेवाच्या चरणकमली मनी निग्रह पुर्वक जी मानसपुजा करतो ती पुजा होय. कल्पनेचे पुजा साहित्य एका ताटात भरून १ लोटा जल, १ लोटा दुध, १ लोटा दही, हळदी, कुंकु, भस्म, तांदुळ, पुष्प व पुष्पहार, आरती, कापुर, उदबत्ती वगैरे. कल्पनेचे सामान भरगच्छ ताट भरून घेणे व पुजेस प्रारंभ करणे, ही मानसपुजा सर्वश्रेष्ठ मानली जाते. या पुजेत मन एकाग्र होण्यास ताबडतोब मदत मिळते. ध्यान लावून या पुजेस प्रारंभ करता क्षणीच एकाग्रता प्राप्त होते. आणि सत्य गुरूपुजेचा परमानंद मिळतो ही मानसपुजा म्हणजे व पुजेचे मुळ गुरूचरण हेच होय. आपण गुरूकडून जो मंत्रोपदेष घेतो त्याच दिवसापासून हा मानसपुजेचा संकल्प केला पाहीजे की, गुरूनी प्रदान केलेला बीजमंत्र मी म्हणजे स्वतः अखंड गुरूंच्या आज्ञेप्रमाणे खंड न पडता ओठ तोंड न हलवता आतल्या आत उच्चार करीत राहणे. तो मंत्रोपदेश महान असून त्या मंत्रात फार मोठी शक्ती सामावलेली आहे. उठता बसता, चालता फिरता, बिज मंत्रावर ध्यान लावून उच्चारण करावे तेंव्हाच त्याला मंत्र शक्तीची प्रचीती येते. ओमच्या बीज मंत्राचे मुळ सद्गुरूंच्या महावाक्यात सामावलेले आहे. सद्गुरूंच्या मुखकमलातुन जो ध्वनी बाहेर पडतो, गुरू जे बोलतात मग तो कुठलाही विषय असो, मुखातुन बाहेर पडणारे एक एक अक्षर ना अक्षर शब्द ना शब्द मग तो कसाही असो, तो अमुल्य आहे. अशा महान बिजमंत्राचे मुळ गुरूवाक्यात भरलेले आहे. आपली जी अंतिम इच्छा असते तो मोक्ष, नुसते मोक्ष मोक्ष म्हणुन तो लाभत नाही. मुमुक्ष आणि मोक्ष मनाला वाटत असते की, जन्माला येऊन इह जन्माचे कल्याण व्हावे, सार्थक व्हावे काहीतरी नाव मागे उरावे, मरावे परि किर्ती रूपे उरावे  संत तुकाराम महाराजांची शब्द ध्वनी ऐकून मग त्याच शब्दध्वनी प्रमाणे अंतिम किर्तीकडे धाव घेते. अंती मोक्षपदाला जाण्यासाठी अनंत सायास भक्तीज्ञान वैराग्य काय केल्याने प्राप्त होईल त्यासाठी कथाकिर्तन, प्रवचन, भजन, ग्रंथ पारायणे, अनेक देवतांचे तिर्थाटन, होम हवन, यज्ञयाग, जपतप अशा ज्या ज्या भक्ती सांगितलेल्या आहेत त्यात सहभागी होऊन प्रत्येक भक्त आपआपल्या परीस्थिती प्रमाणे हजारोनी खर्च करतो. आपल्या घरात सुखशांती नांदावी कुटुंब सुखी रहावे अशा नानाविध फळाची इच्छा धरून वरीलप्रमाणे भक्ती करीत असतो. परंतु जन्म आणि मुक्ती मुमुक्ष आणि मोक्ष सर्वात मोठी आशा जर का असेल तर ती मोक्षाची.

    गुरूचरण रज (गुरूचरणाचे रजकण) सुध्दा शुध्द व पवित्र असतात. (मोक्षाचे मुळ) गुरू चरण सेवेत भरलेले आहे मोक्षाचे मुळ गुरू कृपेत सामावलेले आहे. बरीच मंडळी गुरूकृपा गुरूकृपा म्हणुन नावाचे बोर्ड लावतात. गुरूची कृपा लाभावी म्हणुन अहोरात्र गुरू भजनात नामस्मरणात तल्लीन असतात.पण चुकलिया वर्म फेरा पडे. या संत उक्तीप्रमाणे कुठेतरी नेमके चुकत असतात. मोक्षाचे मुळ गुरूकृपा, गुरूकृपेशिवाय मोक्ष मिळत नाही. हे जरी तितके सत्य असले तरी क्रपा आणि कृपा या दोन्ही शब्दात लाखो किलोमिटरचा अंतर आहे. कारण क्रपेपासुन कृपा ही लाखो मैल दुर आहे. फार लांब अंतरावर बसलेली आहे. कृपा ही अंतःकरणातुन पान्हा सोडणारी दुग्धामृताची धार आहे. प्रेमाचा पान्हा प्रेमाचा पाझर गाईचे वासरू भुक लागताच हंबरडा फोडून प्रेम दृष्टीने गाईकडे पाहते. तेंव्हा तो आवाज गाय माउली ऐकते व ती प्रेमाचा पाझर सोडून वासराला जवळ घेते व बछडयाची भुक शमन करते. ही झाली भक्तीची ओढ.

    कुर्म म्हणजे कासव. कासव व कासवी जलाशयात राहते, त्यांची प्रेमदृष्टी अत्यंत प्रेमाच्या अंतकरणाने भरलेली असते. (काय भरलेले असते) प्रेम ते कुठे? असते कासवीच्या दृष्टीत प्रेम भरलेले असते. एवढयासाठीचे सद्गुरू महाराज कासवीचे उदाहरण देतात. तुका म्हणे येथे पाहीजे जातीचे. कोणत्या जातीचे हेच आपण इथे नेमके चकलो आहोत. (कासवीच्या जातीचे) कुर्मदृष्टी कासवीच्या पिलाला भुक लागते तेंव्हा ते तिच्या आईकडे पाहते. प्रेम दृष्टीने ते सारखे पाहत असते त्या पिलाची आई दुर अंतरावर पाण्यात फिरत असते. आपल्या पिलाकडे प्रेम दृष्टीने पाहते, दुरूनच पाहत रहाते व तिचे पिलु पण भुकेने व्याकुळ होऊन आईकडे पाहते. दोघांची दृष्टादृष्ट होताच पिलाचे पोट भरते व क्षुधाशांती होते. कासवीला कधीही स्तनपान करावे लागत नाही. तद्वतच प्रेमाचा पान्हा शिष्य आणि गुरू या दोघामध्ये जो अंतर आहे तोच फरक आहे. जोपर्यंत शिष्यामध्ये कासवीगत दृष्टी लाभत नाही आणि गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत केवळ गुरू कृपेत सुख व आनंद लाभतो. कुर्म दृष्टीचा आधिकार प्राप्त केला पाहिजे. मोक्ष पद जीवाचे अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, मोक्षकल्याणासाठी, गुरूच्या कृपेची व कृपाआशिर्वादाची नितांत गरज आहे. सद्गुरूंच्या आशिर्वादाने क्रपेतुन कृपेत रूपांतर होते. आणि गुरू कृपेचा लाभ होताच अंतिम ध्येय सहज साध्य होऊन मनुष्य जन्माचे सार्थक होते. मोक्ष मुलं गुरूरकृपा. मोक्षाचे मुळ शोधून पाहीले तर ते केवळ गुरूकृपेतच सामावलेले आहे.

    केळीच्या खुटातून आपण सोपट काढून पाहिले तर तीचे खुट रसभरीत असते पण इतर वृक्षापेक्षा रसाने पुर्ण भरलेले असते व ते खुट अंनत सालीपासुन तयार झालेले असते. जर का त्या खुटाचे एक एक सोपट काढू लागलो तर वरचे वर कठीणातुन सुक्ष्म व मृदु सोपटापर्यंत पोहंचू तेंव्हा तेंव्हा मृदु व मुलायम सोपटाचा गाभा लागताच उकलने शक्य होते व ते हाताने वरचेवर तुटून जाऊ लागते. तरी पण बहू प्रयत्नानी उकलत जाताच शेवटचा कोमल व मुलायम एक सुक्ष्म रसभरीत गाभ्याला (दोरवा) हात लागताच त्याचे पाणी होते. त्याचे रस हाताला लागते त्यात पुर्ण आत्यंतिक प्रेमाचा पाझर भरलेला असतो. तो तेंव्हाच जाऊन घेणे आवश्यक आहे.

     प्रेम आणि पाझर अंतःकरणात गुरूंच्या चरणारविंदी प्राणप्रतिष्ठापणा करून घ्यावी लागते. अंतःकरण तेवढे केळीच्या आतल्या गाभ्याप्रमाणे मृदु व मुलायम बनले पाहिजे. गुरू चरण सेवा निष्काम भाव आष्टसात्विक भाव, दया - क्षमा - शांती इत्यादी सात्वीक वृत्तीत रूपांतर होऊन गुरू प्रेमाचा एकनिष्ट भाव अंतरात्म्यात निर्माण झाला पाहिजे. ब्रम्ह भावनेने सद्गुरूला शरण जाऊन ध्यानी मनी स्वप्न ॐ कराचे ध्वनी निनादत राहीले पाहिजेत. तेंव्हाच या महद्तत्व ज्ञानाचे ज्ञान होऊन जिव शिवाचे एैक्य होते. जिव व शिव याचे एैक्य (एकरूप होणे) हेच मोक्ष. जावे जावे जावे शरणांगती पत्करून, गुरूच्या चरणकमली सुखे निवासास जावे. एवढयासाठी सांगीतले आहे.

    मोक्ष मुलं गरूर कृपा.


टिप्पण्या

  1. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशिनाथ महाराज की जय
    किती सुंदर केलेला आहे श्रीमहाराजांनी डॉक्टर अण्णा यांनी स्वतः ग्रहण करून भक्ता पर्यंत देण्याचे आदेश आज्ञा मान्य करू डॉक्टर ..अण्णा..कार्यरत झाले
    मोठ्या कष्टाने संग्रहित करून ठेवलेले आहे .... पुजा... आणि अमृता हे महान कार्य करत आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद आजचे महत्त्वाचे ज्ञान श्वासाबरोबर नाम घ्यावे हा मोठा संदेश आहे प्रयत्न करूया जय सद्गुरू

    उत्तर द्याहटवा
  2. जीवन यात्रेत सद्गुरू काशिनाथ महाराज यांनी सकल मानव जातीच्या कल्याणार्थ ध्यान हे गुरुपुजनाचे मुळ असल्याने कर्पुर वृत्ती धारण करून नाम घेण्यास तेही कुर्म दृष्टीने घेण्यास उपदेशित केले आहे. महाराजांचे ब्रीदवाक्य "हाती काम मुखी नाम "
    आहे. संसारामध्ये सतत कष्ट करत अखंड नाम घेतले पाहिजे.
    उपदेश आचरणात आणायला हवा.
    लेखकांचे खूप खूप आभार.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा