१२. सिध्दांत

१२. सिध्दांत.

        महाराज सांगतात शास्त्रांतर्गत जाऊन शास्त्र व पुराणाच्या गर्भात जन्म घ्यावा लागतो व त्या गर्भवासात शांतपणे निवास करून आध्यात्माचे संशोधने करावे लागते. जन्मभर त्याच गर्भात आयुष्य काढावे लागते. तरीपण काहीही सापडत नाही. तर एवढया गुढ स्थानी जाऊन सुध्दा काही सापडत नाही तेंव्हा संत तुकाराम महाराज सरळ व सोप्या भाषेत सांगतात.

       "जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे’’.

        आणि हे जे कळायचे आहे ते फक्त सद्गुरूंच्या  कृपाशिर्वादाने सहजच कळते. एवढया खोल पाण्यात जाण्याची साधकाना मुळीच गरज नाही. नामस्मरणाच्या ध्यासाने व आत्मनिष्ट भावनेने जे कार्य केले जाते एकविंद्य भावाने ईश्वरसेवा व गुरूसेवा केली जाते मग तो भक्त अज्ञानी असो वा सज्ञानी असो, निरक्षर असो किंवा अंगठे बहाद्दर असो त्याला फार मोठी मानाची पदवी बहाल केलेली त्याची अंतिम डिग्री आहे. निरक्षर पण अंगठे बहाद्दर . (बहाद्दर) ही ईश्वरी विश्व विद्यापिठाची ही शेवटची पदवी आहे. त्याला शास्त्र पठणाची किंवा अन्य कशाचीही गरज नाही. शुध्द भाव शुध्द गुरूसेवा आत्मनिष्ठ वृत्ती सर्वाभुती समभाव आणि मुखी नाम हाती काम व अखंड निष्काम कर्म, कर्मच नाम घेते व नामच कर्म करीत राहते हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे.

        नामाच्या संगतीने काया शुध्द व पवित्र होऊन मनुष्य शांत चित्त होतो व सत्वगुणांची प्राप्ती होऊन तो आष्ट सात्विक होतो. राग, द्वेष, काम, क्रोध, लोभ, मत्सर हे षडविकार हळु हळु नाहीसे होऊन दया, क्षमा, शांती देहाच्या ठायी अखंड निवास करते. देहाची कांती तेज पुंज होऊन मुखकमलावर शांतीचे व प्रसन्नतेचे तेज झळकत असते. आष्ट सात्विक भावाच्या संयोगाने ज्ञानाची वाढ होऊ लागते. त्याला सर्व शास्त्र पुराण वेदवेदांत विद्येचा अभ्यास प्राप्त होऊन अवलोकन करता येते. त्याची सर्व कर्मे नाममय होतात. कितीही श्रम केले तरी त्याची जाणीव देहाला होत नाही तेंव्हा त्याची देही असुन विदेही अवस्थेत सर्व कर्मे अनायासे चालु असतात. सुख दुःखाच्या संवेदना या प्रकृतीला कदापीही होऊ शकत नाहीत. तो सदैव परमानंदात निमग्न रहातो. गुरू चरणाच्या सेवेचा आनंद चाखण्यात त्याला परमसुख मिळते. सत्संग व गुरूसेवा अनाथाची सेवा, दिनदुबळयांची सेवा, भुकेल्या तान्हेल्यांची सेवा हीच भक्तीची खरी पाऊलवाट आहे.

        तेंव्हा साधक गुरूंच्या चरणारविंदी एकरूप होऊन एकनिष्ट भावाने गुरूसेवा व गुरू वाक्याचा बोध घेऊन अंतःकरणाच्या ठिकाणी एकलय होतो व भक्तीच्या पाऊलवाटेने पुढे जात रहातो. तेंव्हाच तो साधक मुक्त होऊन त्या परम पवित्र परमात्म भेटीच्या आलभ्य लाभाचा सुखसोहळा प्रक्षालन करीत, त्या महान सच्चिदानंदाला परमानंदात ईश्वरी दर्शनाचा अनुभव होऊन कृतार्थ होतो आणि पुर्णत्वाची वृध्दी होऊन ज्ञान वैराग्य त्याच्या पाठी लागते. त्याच समयास योग सिध्दी प्राप्त होऊन योग बळावर आत्मा ब्रम्हांडी नेऊन शेकडो दिवस वर्षे तो अंहब्रम्हास्मी या अवस्थेत मुद्रा लाऊन जप तप साधणेत स्थितप्रज्ञ रहातो. त्याच काळात रिध्दी सिध्दी दोन्ही हात जोडुन त्याला प्रसन्न होतात व अनेक प्रलोभने दाखऊन त्याला परावर्तीत करण्याचा प्रयत्न करतात. योग मार्गातील येणाऱ्या या अनेक अपत्ती आहेत. गुरूकृपेनेच याचे निर्दालन होते. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा