११ . दृष्टांत

११ दृष्टांत 
            एके काळी जंगलमय प्रदेशात नर्मदा माईच्या पवित्र तिरी एका महान तपस्वी महर्षीच्या आश्रमात गुरूसेवेत ४० /५०  भक्तवृंद रहात होते. एका लहानश्या पर्णकुटीत त्यांचा आश्रय असे. तेथे बरीच शिष्य मंडळी राहुन साधना करीत असत, प्रत्येक शिष्याने रोज गावात जाऊन माधुकरी (भिक्षा) मागुन सर्वांचे पालन पोषण करणे व येणाऱ्या भक्ताना माधुकरीचे भिक्षांन्न भोजन देऊन तृप्त करीत व आध्यात्माचा उपदेश करून सर्वाना ज्ञानमार्गाचे मार्गदर्शन करीत असत. हा त्या महाराजांचा नित्यक्रम असे.
            त्यांच्या शिष्यापैकी बरीचशी शिष्य मंडळी निरक्षर व साधी भोळी होती. त्यापैकी भोळाराम नावाचा एक शिष्य आंगठेबहाद्दर  साधाभोळा अत्यंत मायाळु दयाळु व तत्वनिष्ट होता. गुरूनी दिलेले नाम तो चोवीस तास एक क्षणही न विसरता अखंड घेत असे. गुरूसेवा करण्यात तो सर्वापेक्षा अग्रेसर असे व आत्मभावनेने गुरू सेवेत तत्पर रहात असे. एके काळची गोष्ट आहे, दुपारचे 3/4 वाजण्याचे सुमारास 2 उंटावरचे शहाणे दोघेही उंटावर बसुन आश्रमात दाखल झाले. ते पाहुन भक्त भोळाराम त्यांच्याकडे पाहुन म्हणाला, या महाराज नमस्कार, असे म्हणुन त्यांच्या उंटावरचे सामानाचे ओझे गाठोडे उतरण्यास मदत करीत राहीला व म्हणाला, अहो उंट येथे झाडाला बांधा व थोडी विश्रांती घ्या. महाराज माझे गुरू आत साधणेस बसले आहेत थोडयाच वेळात उठतील तेंव्हा आपले दर्शन होईल. असे त्या उंटावरच्या दोन शहाण्यास म्हणत थंड पाणि पिण्यास दिले व त्याना दोघाना 2 आसन देऊन थोडी विश्रांती घेण्याची विनंती केली. सांयकाळचे सात वाजले, भोळारामचे गुरू महाराज साधणेतुन उठुन बाहेर आले तेंव्हा ते दोन सद्गृहस्थ त्याना दिसले त्यावेळी महाराज त्यांच्या जवळ जाऊन त्या सद्गृहस्थाना म्हणाले, अहो आपण कोठुन आलात, आपला परिचय काय म्हणुन विचारतो.  महाराजांचे बोल एैकुन ते दोघे म्हणाले, महाराज आम्ही काशी क्षेत्राचे वेदांत पंडित आहोत. सहा शास्त्र, आठरा पुराण, चार वेद व स्मृतीशास्त्र, सांख्य इत्यादी तत्वज्ञान विषयाचे महापंडित आहोत. आणि या सर्व ग्रंथाचा संग्रह आम्ही सोबत घेऊन उंटावर व्यापार करतोय. आमच्याकडे मोठ-मोठया संस्कृत व दुर्मिळ ग्रंथाचा संग्रह आहे. राजे रजवाडे, वेद पंडित व साधुसंत यांच्याशी आम्ही चर्चा करतो व प्रश्न उत्तराची देवाणघेवाण करतो. आम्ही जो प्रश्न विचारू त्याचे उत्तर जे देतील व आम्हाला जिंकतील त्याना हे सर्व ग्रंथ बक्षीस ठेवले आहेत. आणि आमच्या प्रश्नाचे उत्तर जर नाही देता आले तर आम्ही एक हजार एक रूपये घेतो. हाच आमचा उद्योग व्यापार आहे. महाराजानी त्या वेदांत पंडिताचे बोलने एैकुन घेतले व त्याना म्हणाले, छान छान ठीक आहे, बर आता ९ वाजले आहेत आपण दोघेही भोजन घ्या व तासभर थोडीशी विश्रांती घ्या. आपला प्रश्न उत्तराचा कार्यक्रम आपण ११ वाजता ठेऊ. असे म्हणुन शांत झाले. रात्रीचे ११ वाजले वेदांत पंडितानी गाठोडे सोडुन मोठमोठी पवित्र ग्रंथे १०० ते २००  एका रांगेत ठेवली. आणि महाराजाना त्या पंडितानी विंनती केली , महाराज आपले सर्व शिष्यवृंद घेऊन येथे चर्चेसाठी प्रश्न उत्तरासाठी आमच्यासमोर बसावे. हे एैकुन महाराज आसन टाकुन उत्तराभिमुख त्यांच्या समोर बसले व आवतीभोवती महाराजांचे सर्व शिष्यमंडळ २५/३० शिष्यवृंद आपआपल्या आसनावर बसले.
            तेंव्हा ते वेदांत पंडित म्हणाले, बोला महाराज व महाराजांचे शिष्य, गुरूबंधु यांना विनंती करतो की, आपला प्रश्न काय आहे तो विचारावा ही आमची पंडिताची विनंती आहे. ते पंडितांचे बोल ऐकून सर्व शिष्यवृंद स्तब्ध राहिले कोणीही काही विचारण्यास तयार नाही. ते वेदांत पंडित पुन्हा म्हणाले, अहो असे शांत का? बोला विचारा ना? आमचेकडे खुप मोठी ग्रंथसंपदा आहे, कोणताही प्रश्न विचारावा त्या प्रश्नाचे उत्तर आम्ही देऊ. जर का आम्ही उत्तर चुकीचे दिले तर या ग्रंथातून सिध्द करून दाखवितो. बोला महाराज बोला, अहो शिष्यमंडळी विचार करून प्रश्न करा, आपल्याला रात्र मोकळी आहे, तरी पण लवकर विचारा. याप्रमाणे वेदांत पंडित घाई करू लागले, तेंव्हा महाराज अंतर्ज्ञानाने त्यांच्या एका शिष्याच्या देहावर नेत्र बंद करून दृष्टीक्षेप करत पहातच राहिले. २५/३० शिष्यामध्ये एकाचीही हिंमत प्रश्न विचारण्याची होईना. रात्रीचे १/२ वाजलेले हे पाहुन एकदम महाराजानी एका भक्ताकडे बोट दाखऊन भक्त भोळारामला महाराज म्हणाले, अरे भोळया तुमच्यापैकी सर्व गप्प का? कोणीच काही प्रश्न विचारत नाहीत ते बिचारे महान वेदांत पंडित आहेत. महान शास्त्रांतर्गत ज्ञानी मंडळी आहेत. अरे असे गप्प बसुन कसे चालणार, अरे कोणीतरी त्याना प्रश्न विचारा आपले कर्तव्य पार पाडणे हे आपलेच कर्तव्य आहे. हे महाराजांचे बोलणे ऐकून सुध्दा प्रश्न विचारण्याची हिंमत होईना. तेंव्हा महाराज म्हणाले, अरे भोळया उठ बघतोस काय? विचार त्याना प्रश्न. हे महाराजांच्या मुखातुन बाहेर पडलेला पवित्र ध्वनि मस्तकी धारण करून पटकन भोळाराम उठुन उभा राहिला व श्री गुरू महाराजाना वंदन करून आज्ञा घेऊन त्या वेदांत पंडिताना प्रष्न विचारता झाला. ‘‘अहो वेदांत पंडित जनहो, आपण दोघेही मोठे पंडित आहात व उंटावरचे दोघेही फार मोठे शहाणे आहात बरं का, पण मी प्रश्न विचारणारा अंगठेबहाद्द्र  आहे बर का. माझे नाव भोळया, माझ्या गुरूचा मी पुत्र आहे गुरूंच्या चरणाचा भक्त आहे बरं का. मला काही कळत नाही पण गुरू महाराजांची आज्ञा आहे ती पाळली पाहीजे हे माझे कर्तव्य आहे म्हणुन विचारतो, पहा निट लक्ष देऊन ऐका बरं का पंडितजी, असे म्हणुन भोळाराम पंडिताना प्रश्न विचारू लागला. पंडितजी माझा प्रश्न आहे ‘‘पट गुडू-गुडू-गुडू-टप पुन्हा ऐका पंडितजी, पट गुडू-गुडू- गुडू-टप ग् भद म्हणजे काय हे सांगा’’.
            भोळारामचा प्रश्न ऐकून ते दोघेही वेदांत पंडित थक्क झाले व एकमेकांच्या तोंडाकडे पाहुन ग्रंथ चाळु लागले. दोघेही भोळयाच्या प्रश्नाचे उत्तर ग्रंथात, वेदात, उपनिषदात शोधु लागले, परेशान  होऊन थकुन गेले. तो प्रश्न व त्याचे उत्तर त्यांच्या बापालाही मिळणे शक्य नव्हते तरी पण अनेक ग्रंथ उलटा पालटा करू लागले. सुर्याेदयाची वेळ झाली महाराज म्हणाले, पंडितहो सुर्याेदयास अवधी दहा मिनिटे राहीली आहे, सुर्याेदय होताच आपली वेळ संपते. ते दोघेही पंडीत थक्क झाले. नैराश्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर खेळू लागले थोडयाच वेळात सुर्याेदय झाला, भक्त भोळाराम म्हणाला, पंडित हो बोला आपली उत्तर देण्याची वेळ संपली आहे. तेंव्हा त्या दोघाही पंडितानी महाराजाना वंदन करून क्षमा मागुन त्यांच्या चरणावर मस्तक ठेऊन म्हणाले, महाराज आम्ही हरलो क्षमा असावी महाराज. या प्रश्नाचे उत्तर आपणच प्रश्न कर्त्याने द्यावे व हे सर्व ग्रंथ भांडार बक्षीस स्विकारावे. तेंव्हा भोळाराम प्रश्नाचे उत्तर देऊ लागला तो म्हणाला, अहो पंडितजी त्या प्रश्नाचे उत्तर ऐका,    
            प्रश्न : - पट गुडू-गुडू-गुडू-टप ग् भद म्हणजे काय?
उत्तर: - अहो पंडितजी, आपण आश्रमात बसलो आहोत. चोहु बाजुला कुड घेतलेला आहे. वरती पन्हाळी पत्रे उतरते टाकलेले आहेत, उतार फार आहे. आश्रमाच्या बाहेर कडेला एक भले मोठे औदुंबराचे झाड आहे. त्याला हजारो उंबराची फळे उंबर येऊन पिकले आहेत व पक्व होऊन पत्र्यावर पटा पट पडत आहेत व ते पट गुडू - गुडू - गुडू- टप ग् भद म्हणुन आवाज देत आहेत. पडत आहेत तोच आवाज ऐकून मी प्रश्न विचारला तो काय तुमच्या ग्रंथात आहे होय. अहो ऐका, वर लक्ष द्या, किती तरी फळे पडत आहेत. व तुम्हाला प्रश्न करीत आहेत तोच मी तुम्हाला कळावा म्हणुन विचारले. अहो पण पट गुडू - गुडू - गुडू - भद भद म्हणजे उंबर हेच उत्तर. हे भक्त भोळारामचे शब्द एैकताच दोन्ही पंडीत भोळाराम व गुरू महाराज या दोघांच्या चरणावर क्षमा मागु लागले. महाराजानी ग्रंथाचा पुर्ण संच त्या पंडिताना परत दिला व त्याना मिष्ठान्न भोजन देऊन दक्षिणा देऊन निरोप दिला.

टिप्पण्या