अध्याय तेवीस..
श्री. सद्गुरु काही दिवस उमरगा ग्रामी मुक्कामास होते...अवघ्या काही दिवसांवरच दत्त उत्सव आला होता..भक्त मंडळी अगदी आनंदात आणि उत्साहात उत्सवाच्या तयारीला लागले होते..आणि भक्तांचा हा अमाप आनंद आणि उत्साह पाहून सद्गुरुही आनंदीत होत.....एक वेगळीच उर्जा त्यांच्या ठायी असे..एक वेगळेच तेज सद्गुरुंच्या चेह-यावर झळकत असे..मोठ्या उत्साहाने स्वतः किर्तनात ते उभे राहत..आणि भक्तगणांसमवेत हरीनामात तल्लीन होत..त्यांचे हे तेजस्वी रुप पाहण्यासाठी व त्यांचे दर्शन घेण्यासाठी लांबून लांबून भक्तगण उमरगा ग्रामी येत असत..असाच आलौकिक सोहळा पार पडल्यानंतर रात्री सारे जागोजागी झोपलेले होते..आलेले सारे भक्तगण कुठेव कसे झोपले आहेत..हे पाहण्यासाठी सद्गुरु स्वतः रात्री आश्रमात फिरत होते...त्यांच्या समवेत त्यांचे परमभक्त प्रभाकरही होते..श्री. सद्गुरुंनी पाहिले भक्तांनी जागा मिळेल त्या ठिकाणी आपले अंग टेकले होते..काहींच्या अंगावर पांघरुणही नव्हते..रात्रीच्या गारव्यात तसेच अंग आखडून ते झोपले होते..पण चेह-यावर अपार समाधान होते..हे पाहून सद्गुरुंचे मन गहिवरले त्यांनी ताबडतोब प्रभाकराला आतून शाली आणण्यास सांगितले..आणि त्या जगतनियंत्याने स्वतःच्या हाताने भक्तांच्या अंगावर पांघरुण घातले..”जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा..” देव नेहमी माणसात पाहावा, क्षुधार्थांना अन्न द्यावा , गरजवंतास साह्य करावे..हीच शिकवण सद्गुरुंनी कायम आपल्या भक्तांना दिली..फक्त सांगितले नाही तर स्वतः ती आचरणात आणून दाखविली..धन्य धन्य श्री सद्गुरु...
मुगळखोड ग्रामी सद्गुरुंचे गुरु श्री. यल्लालिंगस्वामी वास्तव्यास होते..त्यांचाही मोठा भक्तसमुदाय होता..वयाची १०५ वर्षे सरली होती त्यांची..आणि जुने दात पडून आता पुन्हा नव्याने नवीन दात येण्यास सुरवात झाली होती..वठलेल्या वृक्षालाच नव्याने कोवळी फांदी फुटावी तसे काहीसे हे होते..आणि म्हणूनच त्यांना परत एकदा पाळण्यात बसवून त्यांचे नामकरण करावे असे त्यांच्या भक्तांना वाटत होते..पुनर्निमीतीचा हा सोहळा व्हावा असेच सा-यांना वाटत होते..भक्तांच्या आनंदासाठी श्री.गुरु यल्लालिंगस्वामींनीही त्यास अनुमती दिली..सारे भक्तगण आनंदाने तयारीला लागले होते..तेंव्हा आपल्या भक्तांना श्रीगुरु यल्लालिंगस्वामींनी सांगितले “ माझा एक परमप्रिय भक्त मराठवाड्यात जनउद्धाराचे कार्य करीत आहे..ज्याप्रमाणे सर्व रत्नांमध्ये सरस चिंतामणी तसा माझा तो शिष्यशिरोमणी आहे..त्यांस या सोहळ्याचे आमंत्रण द्यावे..व ताबडतोब येण्यास सांगावे..”गुरुंची आज्ञाशिरोधार्य मानून श्रीगुरुंचे शिष्य सद्गुरु काशीनाथ महाराजांकडे धावले व त्यांना येण्याचे आमंत्रण दिले..आपल्या गुरुंकडून आलेले आमंत्रण मिळताच सद्गुरुही ताबडतोब मुगळखोड ग्रामी जाण्यास निघाले..आपला परमशिष्य प्रभाकरासमवेत ते मुगळखोड ग्रामी पोचले..आपल्या शिष्यशिरोमणी श्री. काशीनाथ महाराजांना पाहून श्रीगुरु यल्लालिंगस्वामी अत्यानंदित झाले..गुरुशिष्याचे ते अनोखे प्रेम पाहून सारेच विस्मयचकित झाले..पालकारोहणाचा अलौकिक सोहळा पार पडला..त्यानंतर दोन क्षण आपल्या शिष्योत्तमासमवेत बसलेले असताना श्रीगुरु यल्लालिंगस्वामी सद्गुरु काशीनाथ महाराजांना म्हणाले.. “शिष्यांच्या अग्रहाखातर हा सारा सोहळा पार पडला पण आपण उत्तम रित्या जाणून आहोत की हा देह नश्वर आहे..त्याचे असे कितीही सोहळे केले तरी तो नष्टच होणार कधीतरी..पण..भक्ताच्या इच्छेपुढे भगवंताचेही काही चालत नाही..तत्सम आम्ही सारे हे स्विकारले...आता मनी एकच इच्छा आहे..आमच्या या गादीचा वारसा चालवण्यासाठी तुझ्याचसारखा एक शिष्यशिरोमणी आम्हांस हवा आहे..परंतु ही गादी ब्रम्हचारी आहे.तेंव्हा तूला जरी शक्य नाही झाले तरी तूच आता असा एक शिष्योत्तम निवड आणि जो गादीचे पावित्र्य राखून आमचे हे सत्कार्य पुढे चालवणारा वारसदार असावा....” सद्गुरुंनी आपल्या गुरुंच्या या आज्ञेवर मनोमन विचार करुन त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून आपले अचलेर ग्रामीचे शिष्य श्री. सिद्धरामेश्वर यांना ताबडतोब पाचारण केले..व सर्व विधीवत सोपस्कार करुन श्री. सिद्धरामेश्वरांना आपल्या श्रीगुरुंच्या गादीवर स्थानापन्न केले..श्री. सद्गुरु श्री. सिद्धरामेश्वरांना म्हणाले “ ही अत्यंत अवघड पण सर्वोत्कृष्ट जबाबदारी मी आपणावर सोपवत आहे..हे कार्य महान आहे..पण ध्यानात असू द्या जया अंगी मोठेपण तया यातना कठीण..प्रत्येक क्षण हा सत्वपरीक्षेचा असतो..आणि गुरुवर्य आपली परिक्षा घेत असतात..त्यात खरे उतरायचे असते..याच विषयीची एक कथा मी आपणांस सांगतो....
श्री. मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ अनेक तीर्थे करत पृथ्वीभ्रमण करीत होते..त्यांच्या समवेत बालक मीननाथही होते..फिरत फिरत ते एका ग्रामी आले व तिथेच मुक्कामांस थांबले..नित्याप्रमाणे गोरक्षनाथांनी झोळी घेतली व ग्रामात भिक्षा मागण्यासाठी गेले..ग्रामातील घराघरांत भिक्षा मागून ते परत मुक्काम स्थानी पोचले..आल्यावर मच्छिंद्रनाथ त्यांना बोलले “ मी मीननाथांस एके ठिकाणी शौचास बसविले आहे..तू त्वरित तेथे जा व त्यांस घेऊन ये” गुरुआदेश स्विकारुन गोरक्षनाथ त्वरित मीननाथाकडे गेले..पाहतात तर काय अजाण मीननाथाने आपले सारे अंग विष्ठेने भरवून घेतले होते..त्याचे ते सारे कृत्य पाहून गोरक्षनाथाच्या मनात येते आपल्या गुरुसारखे मोठे संन्याशी का या आजाण आणि मूर्ख बालकात आले मन अडकवून आहेत..एखाद्या संन्याशाला कशाला हे मोहात अडकणे..असो...ते तसेच मीननाथाला घेऊन मच्छिंद्रनाथाकडे येतात..मीननाथाचा तो अवतार पाहून मच्छिंद्रनाथ गोरक्षास म्हणतात “ अरे यांस नदीत नेऊन स्वच्छ धूवून आण..” गुरुआदेश मानून गोरक्षनाथ मीननाथाला घेऊन नदीत येतात..व त्यामध्ये एक खडक पाहून ते तिथेच बसतात..मनी विचार करतात आता या अजाण बालकाला आपण अंतर्बाह्य स्वच्छ करु..आणि तत्क्षणी ते मीननाथाचे पाय पकडून त्यांचे मस्तक एखाद्या वस्त्रासारखे धुण्यासाठी खडकावर आपटतात..मीननाथ क्षणात गतप्राण होतात..व त्यांच्या शरीरातील रुधीर सारे नदीप्रवाहात मिसळले जाते..रुधीराच्या वासासरशी अनेक जलचर भक्षासाठी तिथे धावतात..भूकेने व्याकूळलेल्या त्या जीवांना पाहून गोरक्षनाथांनी मीननाथाची फक्त त्वचा काढून घेतली बाकीचे सारे जलचरांना खाण्यास प्रवाहात टाकून देतात..व ती त्वचा घेऊन ते मच्छिंद्रनाथांकडे परततात..गोरक्षास एकटेच आलेले पाहून मच्छिंद्र त्यास मीननाथांबद्दल विचारतात..तेंव्हा गोरक्ष सांगतात कि त्यांस भिंतीवर वाळत घातले आहे..त्यांचे हे असे विपरीत उत्तर ऐकून मच्छिंद्रनाथ बाहेर धावतात व शोधू लागतात कोठे आहे मीननाथ..भिंतीवर वाळत घातलेली त्वचा पाहताच ते धरणीवर आपले अंग टाकतात...व ते प्रचंड आलाप करु लागतात..मीननाथांची त्वचा कवटाळून ते गायीप्रमाणे हंबरडा फोडून जोरजोरात रुदन करु लागतात..त्यांचे रुप पाहून गोरक्षास आश्चर्य वाटते..ते मच्छिंद्रनाथांस म्हणतात “गुरुवर्य आपण केवढे महान यती..आणि या क्षुद्र बालकासाठी एवढे अपार रुदन करता..अहो कोण कोणाचा पुत्र..का असे अज्ञानाचे वस्त्र आपण पांघरत आहात..आपल्याला तर सारे ज्ञात आहे तरीही असे मोहात का अडकता??” पण तरीही मच्छिंद्रनाथांचे रुदन काही थांबत नाही..मग शेवटी गोरक्षनाथ चिमटीत भस्म घेऊन संजीवनी मंत्राने मीननाथांना जीवंत करतात...पण तरीही गोरक्षाच्या मनात एक किंतु शिल्लक राहतोच..असे शत मीननाथ जिवंत करणारे माझे गुरुवर्य असे प्रलाप का करत आहेत..आणि ते पुन्हा मच्छिंद्रनाथांस विचारतात “ गुरुवर्य आपण असे का वागला??कोणासाठी आपण एवढे रुदन केले??”
त्यावर मच्छिंद्रनाथ हसून त्यांस म्हणतात “ हे शिष्योत्तमा मी तुझी परिक्षा पाहिली..तुझ्या ठायी किती मायालेश बाकी आहे हे मला पाहवयाचे होते..व त्यासाठीच हे सारे घडविले...”
या कथानकासोबत श्री. सिद्धरामेश्वरांना सुयोग्य असे निरुपण करुन सद्गुरु उमरगा ग्रामी परततात..क्षणोक्षणी सद्गुरु आपल्या शिष्याची परिक्षा घेत असतात..प्रत्येक प्रसंगातून तावून सुलाखून ते शिष्याला उत्तमोत्तम शिकवण देत असतात..व प्रत्येक परीक्षा पार करण्याचे बळही तेच देत असतात..धन्य धन्य श्री. सद्गुरु..
“ अवधुत चिंतन श्री. गुरुदेव दत्त.!!..श्री. समर्थ सद्गुरु काशीनाथ महाराज की जय!!!”
अनुवाद – सौ. सुजाता कुलकर्णी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा