श्री. सद्गुरु चरित्रामृत - अध्याय सतरा

अध्याय सतरा...
सद्गुरुंनी अनेक गावी दत्तगुरुंच्या पादुकांची स्थापना केली..गावोगावीच्या लोकांमध्ये भक्तीमार्गाचा प्रसार केला..त्यामुळे सद्गुरुंच्या दर्शनाची आस अनेक लोकांना राहिलेली असे..सद्गुरुंची महती ऐकून कानाकोप-यातून लोक सद्गुरुंकडे धाव घेत असत..सद्गुरुही त्यांच्या मस्तकी वरदहस्त ठेवून त्यांची मनिषा पूर्ण करत... 
असेच एकदा सद्गुरु रामवाडीत असताना..लखन ग्रामचे गृहस्थ श्री. शहाजी पाटील आणि श्री. कदम असे दोघे..सद्गुरुंच्या दर्शनाच्या ओढीने आले..सद्गुरुंची महती त्यांनी  ऐकली होती..अंतरंगी ओढ जाणवत होती म्हणूनच वाट शोधीत सद्गुरुंकडे आले..आल्यावर त्यांनी सद्गुरुंच्या चरणी मस्तक ठेवले..तेंव्हा सद्गुरु हसून त्यांना म्हणाले “ बरे झाले पाटील तुम्ही आलात..अहो जन्मोजन्मींचे नाते आपले..शेवटी सरिता सागरात विलीन होण्यास धावतेच तसेच भक्तांचे नाते असते..माझे असणारे सारे घरी परतणारच”
सद्गुरुंचे हे बोलणे ऐकून पाटील विस्मयचकित झाले..प्रथम भेटीतच सद्गुरुंनी आपले नाव जाणले..व अंतरंगीचे भावही जाणले..म्हणून त्यांना गहिवरुन आले..सद्गुरुंनी त्यांच्या मस्तकी हस्त ठेवून त्यांना अनुग्रहित केले..पाटील काही दिवस सद्गुरुंच्या सहवासात तिथेच आश्रमात राहिले..व नित्य सद्गुरुंची चरणसेवा करीत असत..
सद्गुरुंच्या आज्ञेने कांही दिवसांनी ते लखनग्रामी आपल्या घरी परतले..सतत सद्गुरुंना स्मरत ते आपल्या प्रपंचात रममाण झाले..ब-याच दिवसांनंतर त्यांना एक स्वप्न पडले....स्वप्नात त्यांना सद्गुरु लखनग्रामाबाहेर एका विशाल वृक्षातळी ध्यानस्थ बसलेले दिसले..वरुन जलधारा बरसत होत्या सद्गुरु चिंब भिजले होते तरीही डोळे झाकून ते ध्यानमग्न होते..धो धो कोसळणा-या जलधारांमुळे सरितेला पूर आला होता व चहुबाजूने पाणी भरले होते..तेवढ्यात एक भुजंग तेथे आला व त्याने फणा काढून सद्गुरुंच्या मस्तकावर छत्र धरले....हे दृश्य..साक्षात नारायण शेषशय्येवर..क्षीरसागरात निमग्न बसलेले आहेत असेच भासत होते..आणि तेवढ्यात पाटील खडबडून जागे झाले..कितीतरी वेळ ते दृश्य त्यांच्या डोळ्यापुढे येत होते..व त्यांनी ताबडतोब जाऊन सद्गुरुंचे दर्शन घ्यायचे ठरवले..त्यांचे मन रामवाडीकडे ओढ घेत होते..त्यामुळे ते तात्काळ निघाले....रामवाडीत पोचल्यावर ते लिंगन आईस विचारतात..  “ सद्गुरुंच्या दर्शनाच्या  ओढीने मी धावत आलो आहे..कुठे आहेत सद्गुरु ?? “
लिंगन आई म्हणाल्या “ सद्गुरु दोन दिवसांपूर्वीच लखनगावला गेलेले आहेत..व जाताना म्हणाले की माझ्या शिष्यांस दृष्टांत झाला..तो चिंतीत आहे..म्हणून जातो आहे..”
लिंगनमातेचे ते बोलणे ऐकून पाटील सद्गदित होतात..आपल्यासाठी सद्गुरु धावत गेले म्हणून जोपर्यंत आता सद्गुरुदर्शन होत नाही तोपर्यंत अन्नग्रहण करायचे नाही असे ठरवून ते आल्या पावली लखनगावी परततात..व धावत कदम यांच्या घरी जाऊन विचारतात.. “ सद्गुरु लखनग्रामी आले आहेत भेटले का तुम्हाला ??मी रामवाडीला गेलो तेंव्हा तिथे मला समजले..”
पाटील यांचे बोलणे ऐकून कदम म्हणतात..” सद्गुरु लखनग्रामात नाही आले..”
हे ऐकताच पाटील धावत नदीकिनारी जातात..तर तिथे त्यांना एक मोठा नाग फणा काढून बसलेला दिसतो व त्याने सद्गुरुंच्या खडावावर छत्र धरलेले असते..आणि क्षणात हे दृश्य नाहिसे होते...पाटील या सा-यामुळे पुरते गोंधळून गेलेले असतात..ते पुन्हा रामवाडीला धावत जातात..तिथे जातात तर सद्गुरु त्यांना शेतात दिसतात..ते धावतच जाऊन त्यांचे चरण धरतात.. अखंड आश्रुधारा त्यांच्या डोळ्यातून वाहत असतात..सद्गुरु ममतेने त्यांना उठवतात..व म्हणतात “ आम्ही लखनग्रामी जाऊन आलो पण आपली भेट झाली नाही....तुम्ही जो भुजंग स्वप्नी पाहिला ते म्हणजे आमचे आजेगुरु श्री. सिद्धलिंग महाराज..त्यांनी फार पूर्वी या स्थानी अनुष्ठान केले होते...व त्या ठिकाणी आपल्या खडावा ठेवल्या होत्या..तुम्हाला आज सक्षात सिद्धलिंग महाराजांचे दर्शन झाले..”
सद्गुरुंचे हे बोलणे ऐकून पाटील सद्गदित झाले..व यांनी सद्गुरुंच्याचरणी मस्तक ठेवले...त्यानंतर त्यांनी लखनग्रामात त्या पावन ठिकाणी श्री, सिद्धलिंग महाराजांचे  मंदिर बांधले..व लखनग्राम पावन केले..
सद्गुरुंच्या अनेक परम शिष्यात लिंगनमाता या एक साध्वी होत्या..आश्रमात जे कोणी सद्गुरुंच्या दर्शनास येत असे त्यांच्यासाठी त्या उत्तम स्वैंपाक करुन प्रेमाने खाऊ घालत असत..बारा वर्षे त्यांनी अशीच सद्गुरुचरणी सेवा केली आणि त्यांनंतर देह ठेवून त्या अनंतात विलीन झाल्या..त्यांच्या जाण्यामुळे सर्व भक्तगण दुःखी झाले..तेंव्हा सद्गुरुंनी सगळ्यांना समजावून सांगितले ते म्हणाले..” अरे, लिंगन देह सोडून मुक्त झाली तिच्या आयुष्याचे सोने झाले..मग तुम्ही का व्यर्थ दुःखी होता..या जगात शाश्वत असे काहीच नाही..पाण्यावर निर्माण होणा-या बुडबुड्यासारखे आपले आयुष्य असते..क्षणात विरुन जाते..हे शरीर पंचमहाभूतांचे बनलेले असते..जेंव्हा हा देह कारणी लागतो तेंव्हा ही पंचमहाभूते पुन्हा अनंतात विलीन होतात..जोपर्यंत ते देहात असतात..तेंव्हा ते मायापाशात गुंतले असतात..व वेगवेळ्या गुणांनी ते युक्त असतात....प्रत्येकाची लक्षणे वेगवेगळी असतात...देवत्वाच्या ठायी सत्वगुण असते, जो रजोगुणी तो मनुष्य आणि दानवांना तमोगुण..आणि या गुणानुसार प्रत्येकाचे कर्म असते..आणि जसे जो कर्मे करतो तसे त्याचे फल त्यांस प्राप्त होते..जे काही सुख, दुःख आपल्यास प्राप्त होते ते केवळ कर्माचेच संचित असते..आणि कर्मानुसार प्राप्त झालेले भोग त्यांस भोगावेच लागतात..यातुन कोणीही सुटलेला नाही..अगदी ऋषी, मुनी सुद्धा मग सामान्य मनुष्याचे ते काय..” असे आत्मज्ञान सद्गुरु आपल्या शिष्यांस सांगतात..
एकदा सद्गुरुंचे शिष्य व परमभक्त असणारे स्टेशन मास्तर पाटोळे महाराजांच्या दर्शनांस येतात..प्रातःसमयी सद्गुरुंचे दर्शन करुन मग आठ वाजता स्टेशन गाठावे असा विचार करुन ते आलेले असतात..त्यांना आलेले पाहून सद्गुरु त्यांना म्हणतात “ आता भोजन करुनच मग स्टेशनवर जा..” आणि सद्गुरु आग्रहाने त्यांना भोजनास बसवतात...व स्वतः बाजूला उभे राहून त्यांना ज्ञानेश्वरीतील ओव्या व त्याचे विवेचन सांगू लागतात...ते अत्यंत सुंदर निरुपण ऐकण्यात पाटोळे भोजन करण्याचेही विसरुन जातात..कितीतरी वेळ ते तसेच मग्न होऊन निरुपण ऐकत असतात..ब-याच वेळाने त्यांच्या लक्षात येते..तेंव्हा ते पटकन भोजन अटोपतात महाराजांची आज्ञा घेऊन  तातडीने निघतात..तिथून स्टेशन चार कोस दूर असते व जवळपास कोणतेही वाहन उपलब्ध नसते....आकरा वाजता तर गाडी स्टेशनमध्ये येणार असते..वेळेत पोचणे केवळ अशक्य असते..ते स्टेशनकडे धावतच जातात..
इकडे दहा वाजता मास्तर स्टेशन मध्ये येतात, तिकीट खिडकी उघडून पांथस्थास तिकीटे देतात तसेच बरोबर अकरा वाजता गाडी स्टेशनमध्ये येते..तेंव्हा गाडीला सिग्नल देऊन पाठवून देतात..
थोड्या वेळात घामाघुम झालेले मास्तर स्टेशनमध्ये पोचतात..व घाबरून शिपायास विचारतात गाडी गेली का?? आणि प्रवाशांस तिकीटे कोणी दिली ??
शिपाई विस्मयचकित होतो..व तो म्हणतो कि तुम्हीच तर दहा वाजता येऊन खिडकी उघडली, तिकीटे दिली व गाडीस सिग्नलही दाखवले..
मास्तर आश्चर्यचकित होतात..आपण तर दहा वाजता आश्रमातच होतो मग इथे कसा आलो..आणि त्यांच्या क्षणार्धात सारे लक्षात येते ही तर सद्गुरुंची कृपा..आणि त्यांचीच ही आगाध करणी...त्यांच्या डोळ्यात नकळत अश्रु येतात..आपल्या भक्तांसाठी देव किती कष्टतो हे त्यांना जाणवते..ते मनोमन सद्गुरुंना नमन करतात..धन्य ते सद्गुरु आणि धन्य त्यांची अगाध करणी..

“ अवधुत चिंतन श्री. गुरुदेव दत्त!!.श्री. समर्थ सद्गुरु. काशीनाथ महाराज की जय.!!..”

अनुवाद – सौ. सुजाता कुलकर्णी

टिप्पण्या