श्री. सद्गुरु चरित्रामृत - अध्याय बारा

अध्याय बारा...
गुरुनाथ रामवाडीच्या मठावर छान रमले होते..सद्गुरु समवेत श्रमदान करायचे..नित्य नामस्मरण, सद्गुरुंच्या मुखातून कथा किर्तन श्रवण व सद्गुरुंचा अनमोल असा सहवास..या सा-यामध्ये ते एवढे मग्न झाले की दिवस भराभर कसे सरले त्यांनाच कळले नाही..बघता बघता चार वर्षे पूर्ण झाली..भक्तीमार्ग व श्रमदान याच्या सुरेख संगमात ते निमग्न झाले...एवढ्यात त्यांचे जेष्ठ बंधु माधवराव रामवाडीच्या मठावर येतात..माधवराव तथा बाळप्पा यांना पाहून सद्गुरुंनाही आनंद होतो..भगवंताच्या भेटीने जसा भक्तास आनंद होतो तसाच भक्तभेटीचा आनंद साक्षात भगवंतासही तेवढाच होतो..बाळप्पा तर सद्गुरुंचे परमभक्त...ते सहर्ष बाळप्पांचे स्वागत करतात..लगेच आपल्यासोबत भोजनासही आमंत्रित करतात..भोजनानंतर निवांतक्षणी ते सद्गुरुंना म्हणतात “ महाराज माझ्यावर कुलकर्णी वतनाच्या कामाचा भार आहे..शिवाय शेतीतील कामे दोन्हींचा मेळ साधणे आता अवघड झाले आहे..आता तर सुगीचे दिवस शेतीतील कामेही तितकीच मोलाची आणि कुलकर्णी पणाचे ओझे तर आहेच..तेंव्हा आता गुरुस आरळी ग्रामी घेऊन जावे म्हणतो..तेवढीच शेतीकामात मदत होईल शिवाय आपली आज्ञा असेल तर आता त्याचे लग्न करुन त्यास संसार थाटून द्यावा म्हणतो...तेंव्हा आता परवानगी द्यावी..”
गुरुनाथ त्यांचे बोलणे ऐकत असतात..ते महाराजांना म्हणतात “ महाराज मी आता शेतीतील कामात मदत म्हणून जातो..ती कामं अटोपली की लगोलग मी परतून येईन..मला लग्न वगैरे करुन मोहपाशात आडकायचे नाही..आपल्या चरणाची सेवा हेच माझे ध्येय..आपल्या चरणीच आता माझे स्थान..”
त्यांचे हे बोलणे ऐकून सद्गुरु म्हणतात “ अरे आता कसला परततोस..आता बारा वर्षेपर्यंत तू काही यायचा नाहीस..संसारात रमून जाशील पुत्रपौत्रांनी तुझे घर भरुन जाईल..मग कसला परमार्थ स्मरेल तुला..”

त्यावर गुरुनाथ म्हणतात “नाही नाही महाराज मी परतून येणारच..आपले चरणकमल कसा विसरेन..”
यावर सद्गुरु त्यांना काहीच उत्तर देत नाहीत..त्यानंतर बाळप्पांना एकांतात नेऊन ते काही गोष्टी समजाऊन सांगतात..काही काळ त्या दोघांची चर्चा चालते व पुढील कार्यास जावे असा आदेशही सद्गुरु बाळप्पांस देतात व त्यानंतर दोघेही बंधु आरळी ग्रामास जाण्यास निघतात.. आरळी ग्रामात येऊन एक महिनाच झालेला असतो..की कॉल-याच्या साथीचे निमीत्त होऊन माधवरावांचे निधन होते..विधीलिखीत कोणासच टळत नाही..सद्गुरुंच्या आदेशाप्रमाणे...आपला देह सांडून ते अनंतात विलीन होतात..मागे आपली पत्नी व मुलांची जबाबदारी गुरुनाथांवर सोपवून ते निघून जातात..गुरुनाथही ही जबाबदारी अत्यंत मायेने पार पाडतात..कालांतराने ते स्वतःही विवाहबद्ध होतात..भार्या अनुसुये सोबत ते संसारात रममाण होतात..आणि सद्गुरुंचे बोल खरे होतात..बारा वर्षे ते आपल्या संसारात निमग्न असतात..माणसाच्या दृष्टीला केवळ आजचे दिसते...पण सद्गुरु त्याच्याही पुढचे पाहू शकतात..त्यामुळे त्यांच्या मुखीचे बोल कधीच व्यर्थ जात नाहीत ते सारे जाणत असतात..
एका श्रावणमासांत महाराज पद्मसिंह पाटील यांच्या घरी अनुष्ठान करतात..पद्मसिंह पाटील म्हणजे धाराशीव ग्रामीचे बडे प्रस्थ..सद्गुरुंचे थोर भक्त..त्यांच्या विनंतीवरुन महाराज त्यांच्या घरी अनुष्ठानास बसतात..याकाळांत ते केवळ योगसाधनेत निमग्न असत..त्यामुळे कोणासही सद्गुरु दर्शन देत नाहीत
आरळी ग्रामात, प्रभाकर कुलकर्णी नावाचे सद्गुरुंचे एक परमभक्त होते..कुलकर्णी वाड्यातील कुलकर्णींच्या वटवृक्षाच्या दुस-या फांदीचा हा विस्तार..सद्गुरु ज्यांना माता म्हणून संबोधत असत त्या राधामाईचे यांचे  हे नातवंड व रुक्मीणीमातेची अपत्य  प्रभाकर आणि उषा..लहानपणी अध्यात्माची बीजं रोवली गेल्यामुळे..प्रभाकरांच्या मनी सद्गुरुंविषयी दृढभाव होता..अत्यंत मनोभावे ते सद्गुरुंचे चरण सेवत असत..जसा भक्त प्रल्हादाचा नारायणाचरणी भाव आगदी तसाच दृढभाव त्यांचा सद्गुरुचरणी नित्य असे..सद्गुरुंनी दाखवलेल्या भक्तीमार्गावरच ते चालत होते..ग्रामीचे सारे जन त्यांना मालक म्हणून संबोधत असत..जसा भाव तसा देव म्हणतात तसेच इकडे अनुष्ठानात निमग्न असताना प्रभाकरांना दृष्टांतात सद्गुरुंचे दर्शन होते..भगवंत भक्ताच्या मनीचा दृढभाव पाहून तसेच फळ आपल्या भक्ताला देत असतो..दृष्टांतात त्यांना जाणवते की सद्गुरु एका भक्ताच्या घरी अनुष्ठानात मग्न आहेत..सद्गुरुंना स्वप्नी पाहून  प्रभाकरांना सद्गुरुंच्या चरणाची ओढ लागते म्हणूनच ते धावत धाराशीव ग्रामी पोचतात...प्रभाकरांना असे अचानक आलेले पाहून सारेच आश्चर्यचकित होतात....प्रभाकर आलेले पाहून सद्गुरु त्यांना अनुष्ठान गृहात बोलावून अनुग्रहित करतात..अतिशय पुण्य अशा अनुष्ठान काळात प्रभाकरांच्या मस्तकी वरदहस्त ठेऊन सद्गुरु  त्यांचे जीवन पावन करतात..एकमेकांच्या अंतरीचे जाणणारे हे दोन्ही भक्त आणि भगवंत खरोखर धन्य धन्य....
अनुष्ठान संपवून सद्गुरु पुन्हा रामवाडी आश्रमी परतात..तेंव्हा अनेक भक्त महाराजांच्या दर्शनाला येत असत..तसेच प्रभाकरही प्रत्येक बृहस्पतीवारी नित्यनेमाने महाराजांच्या दर्शनास येत असत..
एकदा गुरुपौर्णिमेला सद्गुरु प्रभाकरांस म्हणतात “ चला आपण शिर्डीला जाऊन येऊ...श्री. साईनाथांचे चरणी माथ टेकून येऊ..अनेकांकडून  शिर्डीचे महिमान ऐकले आहे..प्रत्यक्ष बघून येऊ ती पुण्य नगरी..तुम्हांसही दर्शन घडेल..”
प्रभाकरांसहित सारेच भक्त आनंदित होतात..व लगेच महाराजांसमवेत शिर्डीस जाण्यास निघतात..राज्य परिवहनच्या बसने ते शिर्डी बसस्थानकात पोचतात..तेवढ्यात एक वृद्ध गृहस्थ काठी टेकत सद्गुरुंच्या समिप येतात..दोघेही एकमेकांकडे हसून ओळखीच्या भावाने बघतात..ते वृद्ध गृहस्थ हात जोडून वंदन करतात..तर सद्गुरु त्यांना अलिंगन देतात..व ते वृद्ध गृहस्थ निघून जातात हे दृश्य प्रभाकर पाहत असतात..मनात त्यांनाही आश्चर्य वाटते..या अनोळखी ठिकाणी कोण असे परमभक्त सद्गुरुंना भेटले..असतील कोणी तरी असे वाटून ते काही सद्गुरुंना त्याबद्दल विचारत नाहीत..साईनाथाच्या दर्शनास जाण्यास इतर भक्त मंडळी  तयार होत असतात..प्रभाकरही आपली सारी नित्य कर्मे आटोपून सा-यासमवेत सद्गुरुंपाशी येतात..व सद्गुरुंना म्हणतात  चला आता दर्शनांस जाऊ..तेंव्हा सद्गुरु हसून म्हणतात..” तुम्ही जाऊन या माझे दर्शन झाले..शिर्डीत पोचताच साईनाथ मला भेटले..” सद्गुरुंचे हे बोलणे ऐकताच प्रभाकरांना लगेच लक्षात येते..थोड्यावेळापूर्वी आलेले वृद्ध गृहस्थ दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात साईनाथच होते..ज्यांच्या भेटीसाठी स्वतः साईनाथ आले..असे सद्गुरु धन्य धन्य..तयांच्या चरणी माझे  कोटी कोटी प्रणाम...
सद्गुरुंच्या मठात राहून अनेक शिष्य सेवा करीत असत..त्यातच  अत्यंत सत्शिल असे एक शिष्य होते..सारेजण त्यांना मास्तर आण्णा म्हणत असत..संसार व आपल्या सर्व कामकाजातून निवृत्त होऊन ते मठातच राहत असत..सद्गुरुंच्या चरणांची सेवा यातच ते रमून जात..असे अनेक दिवस गेल्यावर एके दिवशी त्यांच्या गावाहून टपाल येते...मास्तर आण्णांच्या पत्नींची तब्येत बरी नसल्याचा निरोप त्यात लिहीलेला असतो..ते पाहून सद्गुरु त्यांना सांगतात..की आपल्या धर्मपत्नी ठीक नाहीत तरी तुम्ही गावी जा..त्यांच्याकडे लक्ष द्या..आवश्यक औषधोपचार करा.”.यावर मास्तआण्णा म्हणतात  “ महाराज आता श्रावण महिना नजीक आला आहे..आपण अनुष्ठानांस बसाल..त्या पवित्र काळात आपल्या चरणांची सेवा करण्याचे भाग्य असे माझ्यापासून हिरावून घेऊ नका...आपणच तारक आहात..मी आपले चरण सोडून कुठेही जाणार नाही..”
इकडे मटकी गावात विठाबाईंचा म्हणजे मास्तर आण्णांच्या पत्नींचा आजार बळावत जातो..वैद्य नाना उपचार करीत असतात..पण आराम काही पडत नाही..आणि एके दिवशी पहाटे विठाबाई प्राण सोडतात..मास्तर आण्णांच्या घरात एकच आकांत होतो..ही वार्ता वा-यासरशी सद्गुरुंपर्यंत पोचते..सद्गुरु लगेच एका भक्तांस सांगतात “ लगोलग भस्माच्या पुड्या घेऊन मास्तरआण्णांच्या घरी जा आणि त्यातील भस्म मधासहित विठाबाईंना चाटवा..काही विपरीत होणार नाही त्यांना दिर्घायु आहे..जातील कुठे..”
सद्गुरुंचे हे बोल ऐकून तो भक्तही विस्मयचकित होतो..पण सद्गुरुंवरील दृढ विश्वासामुळे तो ताबडतोब महाराजांच्या आज्ञेप्रमाणेच वागतो..विठाबाईंना मधुसहित भस्म चाटवताच त्या हळूवार नयन उघडतात...अशी ही अविश्वसनीय घटना बघून सारेच सद्गदित होतात..आणि अश्रुपूर्ण नयनांनी सद्गुरुंचा केवळ जयजयकार करत राहतात...

“अवधुत चिंतन श्री. गुरुदेव दत्त!!, श्री. समर्थ सद्गुरु काशीनाथ महाराज की जय...!!!”

अनुवाद – सौ. सुजाता कुलकर्णी

टिप्पण्या