श्री. सद्गुरु चरित्रामृत - अध्याय चौदा

अध्याय चौदा..
तिन्ही तत्व ज्यांच्या ठायी वसलेले आहेत त्या साक्षात दत्तात्रेयाचा अवतार असणारे सद्गुरु काशीनाथ महाराज आरंभीच्या काळात अनेक ठिकाणी फिरत असत..जनउद्धारार्थ तिर्थाटन करीत असत ....असेच फिरत फिरत ते दक्षिणेकडील  नारायणगाव या ग्रामी पोचले....अनेक ठिकाणी फिरत असल्यामुळे खूप शिष्य सद्गुरुंच्या दर्शनासाठी येत असत..त्यातच एक शिष्य कायम सद्गुरुंच्या सेवेसाठी येत असे त्यांच्या घरी सद्गुरु पोचले..सद्गुरु अचानक असे दारी आलेले पाहून ते गृहस्थ मनोमन आनंदीत झाले..त्यांनी सद्गुरुंना बसावयास आसन दिले..यथायोग्य षोडशोपचारे त्यांचे पूजन केले...सद्गुरु काही दिवस त्यांच्याच घरी वास्तव्यास राहिले...तेंव्हा अनेक जन सद्गुरुंच्या दर्शनासाठी येत असत...त्यांच्या मनीचे भाव बघून सद्गुरु त्यांना उपदेश करत..अनेक दाखले, कथा सांगून त्यांच्या मनीचे समाधान करत असत व त्याद्वारे ते नामस्मरणाचे महत्वही त्यांना समजावून सांगत..एकदा असेच सद्गुरुंनी भगवतभक्तीचे आख्यान सांगण्यास सुरवात केली..
भगवंत हा भक्तीचा भूकेला असतो..त्याला अंतःकरणापासून साद घातली की तो आपल्या भक्तासाठी धावतो...नामःस्मरणाने तो प्रसन्न होतो..भक्तांवरील विघ्नांचे तो स्वतः येऊन निवारण करतो..याचविषयीची ही कथा सद्गुरुंनी सांगण्यास सुरवात केली...पूर्वी पांडवांनी राजसूय यज्ञ केला होता..तेंव्हा मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले जात होते..अनेक ऋषी, मुनी, ब्राह्मण यांच्या नित्यनेमाने पंक्ती उठत होत्या..व स्वतः द्रौपदी या सर्वांना वाढत होती....जिच्या पाठीशी साक्षात श्रीकृष्ण कायम उभा होता त्या याज्ञसेनीचे तेज काही आगळेच होते....ती साक्षात अन्नपूर्णाच होती..आणि साक्षात श्रीकृष्ण स्वतः जातीने सगळीकडे लक्ष देत होता...एकदा पंक्तीत सारे कौरव बसलेले होते....द्रौपदी विजेच्या चपळाईने सा-यांना वाढत होती..वासनांध कौरव केवळ तिची परिक्षा पाहण्यासाठी नानाविध अन्नपदार्थ एकावेळी मागत होते..पण तरीही ती सगळ्यांची इच्छा पूरी करीत होती..ही धावाधाव करताना अचानक तिच्या वस्त्रांची गाठ ढिली होते..लज्जा रक्षणासाठी ती हातही घेऊ शकत नसते..कारण तिच्या दोन्ही हातात अन्नपदार्थांचे भांडे असतात..तिची उडणारी धांदल कौरव कुचेष्टेने पाहत असतात..या कठीण प्रसंगी आता एकमेव तोच तारणहार आहे हे ती जाणते..म्हणूनच ती मनोमन  कृष्णाला साद घालते..आपल्या लज्जा रक्षणार्थ धाव असे ती आपल्या सख्याला सांगते...एवढ्यात तिच्याच शरीरात अजून दोन बाहू निर्माण होतात, ज्यांच्या सहाय्याने ती आपले वस्त्र सावरते..हे सारे क्षणार्धात घडून जाते आणि आता दुप्पट उत्साहाने ती अन्न वाढण्यास सुरवात करते....भक्त जेंव्हा जेंव्हा संकटात सापडतो तेंव्हा नानाविध मार्गांनी भगवंत त्यांच्या रक्षणार्थ धावतोच....एवढे सांगून....सद्गुरु दत्तात्रेयाचा जोरात जयजयकार करतात व आपले निरुपण संपवतात..उपस्थित सर्व भक्तगण आता सद्गुरुंच्या दर्शनासाठी येत होते..हरेएक जण सद्गुरुंच्या चरणांवर माथा टेकत होता..त्यात अबाल वृद्ध, महिला पुरुष सारे होते...सद्गुरु आशिर्वादाच्या रुपात प्रत्येकाच्या भाली कुंकुम तिलक देत होते....भगवंत जेंव्हा आशिर्वाद देत असतो तेंव्हा तो पाहत नाही की ती स्त्री आहे की पुरुष कोणताही भेदाभेद त्याच्याठायी नसतो..जसे वृक्ष फक्त छाया देण्याचे काम करत असतो..मग त्याच्या छायेत कोण उभा आहे यामुळे त्याला काहीही फरक पडत नाही...तत्सम सद्गुरुही सा-यांच्या भाळी कुंकुम तिलक देत होते..त्यामध्ये असणा-या काही विधवांच्या भाळीही त्यांनी कुंकुम तिलक लावला..आणि त्या स्त्रीयांनीही तो आशिर्वाद समजून  स्विकारला..पण भक्तगणांत जसे काही सज्जन लोक होते तसेच काही टवाळ लोकही उपस्थित होते..आता तर त्यांच्या हाती कोलीतच आले होते..लगेच त्यांनी कुंकुम तिलकावरुन गदारोळ करण्यास सुरवात केली..ते महाराजांना म्हणाले “ महाराज विधवांच्या भाळी तुम्ही कुंकुम तिलक दिला त्यामुळे त्या सौभाग्यवती थोड्याच होणार आहेत...किंवा स्वार्गात गेलेले त्यांचे पती परतून थोडेच येणार आहेत..मग का तुम्ही असा अनर्थ केला....”
त्यावर सद्गुरुंनी हसून उत्तर दिले “ अरे या जगात अविनाशी असे काय आहे...हे  नश्वर शरीर तर कधी तरी संपणारच आहे..पंचमहाभूतात विलीन होणारच आहे..अमर आहे तो आत्मा..तो चिरंतन आहे....ज्यांचे पती मरण पावले असे म्हणता त्यांचे आत्मे तर चिरंतन आहेत..विश्वास वाटत नसेल आताच आपण त्यांना बोलावू..”
सद्गुरुंच्या या बोलण्यावर टवाळखोर अजून टिंगल करतात व म्हणतात “ महाराज मेलेला माणूस परतून कसा येईल .....”
आता या टवाळखोरांच्या तोंडी न लागता महाराज यजमानास म्हणतात “ सर्वजण भुकेले आहेत पंक्ती वाढावयास घ्यावे..या विधवा महिलांनाही भोजन वाढावे...व त्या प्रत्येकीच्या पानाजवळ एक पान वाढून ती जागा रिक्त ठेवावी...”
यजमान सद्गुरुंचे निस्सीम भक्त होते...त्यांनी सद्गुरुंची आज्ञा मानली व जसे त्यांनी सांगितले अगदी तशीच मांडणी केली..
सद्गुरुंनी हातात जल घेऊन त्या आत्म्यास अवाहन केले..सद्गुरुंच्या अवाहनाबरोबर त्या स्त्रीयांचे मृत पती सगुण रुपात अवतरले..आपल्या पतीस सजीव पाहून त्या स्त्रिया आनंदीत होतात..व आनंदाने आपल्या पतीसमवेत बसून त्या भोजन करतात..
हे दृश्य पाहून ते टवाळखोर अत्यंत भयभीत होतात...ज्यांची आपण टिंगल करत होतो ते कोणी सामान्य नसून साक्षात दत्तात्रेयाचा अवतार आहेत याची त्यांना खात्री पटते व ते सद्गुरुंच्या चरणावर माथा टेकतात...सद्गुरु आज्ञेवरुन आलेले मृत आत्मे पुन्हा परतून स्वर्गस्थ होतात...व समस्त भक्तगण सद्गुरुंचा जोरात जयघोष करतात...
”अवधुत चिंतन श्री. गुरुदेव दत्त !!,श्री. समर्थ सद्गुरु काशीनाथ महाराज की जय!! “

“निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे..
आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी..”

अनुवाद – सौ. सुजाता कुलकर्णी

टिप्पण्या