अध्याय तेरा...
आरंभीच्या काळात जेव्हा सद्गुरु आपले गुरु श्री. यल्लालिंगस्वामी यांच्या समवेत होते तेंव्हा एकदा श्री. सद्गुरु यल्लालिंगस्वामी आपल्या शिष्यास म्हणजे सद्गुरु काशीनाथ महाराजांना म्हणतात...”आपली तपोसाधना जनउद्धारार्थ कार्यी लागावी हेच आपले कर्तव्य...त्यासाठी तिर्थाटन करणे आवश्यक असते..अनेक ठिकाणचे जन आपण पाहिले की त्यांचा मानस आपणांस समजून येतो..त्यांचे सुख दुःख जाणवतात..जवळून पाहायला मिळतात..तेंव्हा आपण दोघेही आता तिर्थाटनास जावे असे मला वाटते..”
गुरुंच्या या इच्छेवर सद्गुरु लगेच होकार देतात व ते दोघेही तिर्थाटनास निघतात....नानाविध ठिकाणी फिरुन ते उत्तरदेशीच्या एका ग्रामात पोचतात..तेथे असणा-या एका शिवमंदीरात ते मुक्कामास राहतात..त्यावेळी गावोगावचे अनेक जन दर्शनास येत असत..त्यात एक ब्राह्मण गृहस्थही होते...ते नेहमी आपल्या तेरा वर्षीय कुमारासहित गुरुंच्या दर्शनांस येत असत..एके दिवशी ते श्री. गुरु यल्लालिंग स्वामी व सद्गुरु यांना आपल्या घरी येण्याची विनंती करतात..त्यांच्या मनीचा भाव बघून श्री. गुरुही त्यांच्या विनवणीस होकार देतात..व हे दोघेही त्या गृहस्थांच्या घरी जातात..घरी गेल्यावर ते गृहस्थ व त्यांची पत्नी यांचे यथायोग्य पुजन करतात..व मनोभावे स्वागत करतात..त्यांचा पुत्रही अत्यंत विनयशील व सुकुमार असतो..सद्गुरु काशीनाथ महाराजांना तो खूप भावतो..काही दिवस या गृहस्थांच्या घरचे आतिथ्य स्विकारुन ते पुढील प्रवासास निघतात..पुढील वर्षभर अनेक ठिकाणी तिर्थाटन करुन..ते पुन्हा त्याच ग्रामी परततात..तिथे आल्यावर त्यांना ब्राह्मण भक्ताची आठवण येते..व ते थेट त्यांच्या घरीच जातात..पण इकडे ब्राह्मण भक्ताच्या घरी अघटित घडलेले असते...त्यांचा एकुलता एक सुकुमार पुत्र बरेच दिवसांपासून विषमज्वराने आजारी होता..अनेक उपाय त्यावर केले पण काहीही फायदा होत नाही .आणि श्री.गुरु यल्लालिंगस्वामी व सद्गुरु काशीनाथ महाराज हे दोघे त्या ब्राह्मण गृहस्थांच्या घरी येण्याच्या काही क्षण पूर्वीच तो सुकुमार हे जग सोडून गेलेला असतो..हे असे घडते आणि हे दोघेही त्यांच्या घरात प्रवेशतात...या दोघांना आलेले पाहून ते ब्राह्मण गृहस्थ आपला शोक आवरतात..व ते आपल्या पत्नीसही तसेच सांगतात ते म्हणतात “आपल्या दारी हे दोन यती आलेले आहेत..त्यांना या घटनेबद्दल काहीही सांगायचे नाही...नाहीतर ते रिक्त हस्ते परततील...आणि घरी चालून आलेल्या यतींचे पूजन न करता ते परतले तर आपल्याला महापातक लागेल......तेंव्हा आपल्याला मनोभावे यांचे पूजन करावे लागेल...आपले दुःख बाजूला करुन तू ऊठ आता..” आणि खरोखरच ते उभयंता आपले दुःख बाजूला करुन हसतमुखाने श्री. गुरुंना सामोरे जातात...त्यांना बसण्यास उत्तम आसन देऊन उत्तम फळफळावळ त्यांना अर्पण करतात..तेवढ्यात सद्गुरु काशीनाथ महाराजांना त्यांच्या सुकुमार पुत्राची आठवण येते..व ते ब्राह्मण गृहस्थांना त्याच्याबद्दल विचारतात...या त्यांच्या प्रश्नावर जरा अडखळतच ते गृहस्थ उत्तरतात “त्याची विषमज्वराची व्याधी बळावली आहे...तो दुर्धर आजाराने पिडीत आहे..म्हणून आतल्या खोलीत आराम करत आहे..”त्यांचे बोलणे ऐकून सद्गुरु त्यांना म्हणतात “ मी आता जाऊन त्यास उठवून आणतो “ त्यावर सत्य परिस्थिती माहिती असल्यामुळे ते गृहस्थ घाबरुन सद्गुरुंना म्हणतात...” नको नको त्यांस आराम करु द्यावा...” पण त्यांचे काहीही न ऐकता सद्गुरु म्हणतात “ मी आता जाऊन पाहून येतो..” इकडे ध्यानस्थ झालेल्या श्री. यल्लालिंगस्वामींना अंतर्यामी दिसते की तो पुत्र मृत पावलेला आहे....आणि त्याच्या आत्मा नेण्यास यमसेवक तयार आहेत तेवढ्यात सद्गुरु काशीनाथ माहाराज तिथे प्रवेशतात..समोर सुकुमाराचा निष्प्राण देह पाहून सद्गुरु हळहळतात..मग तात्काळ आपल्या गुरुंचे स्मरण करुन ते त्या सुकुमाराच्या मस्तकी हस्त ठेवतात..व त्यास म्हणतात “ बाळा उठ पटकन, तुझे जनक जननी तुझी वाट पाहत आहेत..” सद्गुरुंची हाक ऐकता क्षणी देहापासून विलग झालेले पंचप्राण परतून देहात अवतरतात...व निष्प्राण देहांत चैतन्य जागते....व तो सुकुमार त्या क्षणी उठून बसतो....समोर सद्गुरुंना पाहून तो धावतच जाऊन त्यांच्या चरणी लागतो...सद्गुरु त्याला हाताला धरुन बाहेर घेऊन येतात...व त्याच्या माता पित्यास म्हणतात “ हा घ्या तुमचा नंदन..त्याची सारी व्याधी आता निघून गेली आहे..” कांही क्षणांपूर्वी गतप्राण झालेला आपला नंदन असा हसत सामोरी आलेला पाहून त्या दोघांच्याही नयनातून अश्रुंच्या धारा वाहू लागतात...व श्री गुरुं व सद्गुरुंच्या चरणावर ते पुन्हापुन्हा आपले मस्तक ठेवतात व म्हणतात “ तुमच्या कृपाशिर्वादामुळेच केवळ माझा नंदन परतून आला...आपण साक्षात भगवंत आहात...”
व ते या दोघांची षोडशोपचारे पुजा करतात..पंचपक्वांनांचा महाप्रसाद करतात..त्यांनी केलेल्या आदरातिथ्याचा यथोचित स्विकार करुन व त्यांना आशिर्वाद देऊन हे दोघेही तेथून निघतात....गावाबाहेर आल्यावर श्री. गुरु यल्लालिंगस्वामी तेथील जंगलातील एक निरगुडीची ओली काठी काढतात....त्याने जोरजोरात ते सद्गुरुंना फटके लगावतात..सद्गुरु काशीनाथ महाराज जमिनीवर गडबडा लोळत असतात....अतिशय कोपायमान झालेले श्री गुरु म्हणतात “ तू आज विधीचे विधान खंडित केलेस..आणि तुझ्या या गोष्टीसाठी मला माझे तपःसामर्थ्य वापरावे लागले..त्या ब्राह्मण पुत्राचे आयुष्यमान तेवढेच होते..व तुझ्याशब्दासाठी मला माझे पूण्यकर्म वापरावे लागले...आपला जन्म हे असे चमत्कार करण्यासाठी नाही..लोकांना निती शिकवून त्यांना सन्मार्ग दाखवण्यासाठी आहे...नियतीने योजलेल्या कुठल्याही गोष्टीत आपण बदल नाही करायचा...विधीचे विधान कधीच खंडित करायचे नाही...प्रत्यक्ष ब्रह्माने मला हे सांगितले आणि म्हणूनच कोपायमान होऊन मी तुला ताडण केले...”
आणि श्री गुरु सद्गुरुंना उठवून आपल्या हृदयाशी कवटाळतात...आता सद्गुरुंना त्यांची चुक कळलेली असते...ते आपल्या गुरुंच्या चरणावर नतमस्तक होतात व झाल्या प्रकाराबद्दल क्षमायाचना करतात...आईच्या मायेने व धाकाने आपल्या शिष्याला सांभाळणारे व शिकवणारे धन्य धन्य ते श्री गुरु..व धन्य धन्य ते शिष्य..
“गुरु साक्षात परब्रह्म लाभे मला जन्मोजन्मी सेवा त्यांची घडावी मला”
“अवधुत चिंतन श्री. गुरुदेव दत्त !!!!श्री. समर्थ सद्गुरु काशीनाथ महाराज की जय !!”
अनुवाद – सौ. सुजाता कुलकर्णी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा