श्री. सद्गुरु चरित्रामृत - अध्याय चोवीस

अध्याय चोवीस..कळसाध्याय..
भक्तजन उद्धारार्थ मानवी देह धारण करणा-या भगवंत रुपी श्री. सद्गुरुंनी कायम आपल्या भक्तांना “कष्ट करा” हाच संदेश दिला..”कष्टाविण दुजा नसे अन्य मार्ग..कष्टाच्या भाकरीची गोडी हाच धरेवरील खरा स्वर्ग..” हेच मनी नित्य बिंबवले..
आरळी, रामवाडी, ईर्ला, लखनगाव, शिराढोण, उमरगा, मुरुड अशा विविध ठिकाणी श्री.सद्गुरुंनी आपल्या भक्तांसाठी आश्रम स्थापन केले..आणि त्या त्या भागातील लोकांना स्वतः कष्ट करुन..कष्टाचा मार्ग दाखवला..
एकोणीसशे शहाऐंशी साली..श्री. सिद्धरामेश्वरांना मुगळखोडच्या गादीवर बसवून..श्री. गुरु यल्लालिंगस्वामी आनंदाने समाधिस्त झाले..जर्जर झालेले देहाचे आवरण टाकून तो पवित्र आत्मा भगवंतरुपात विलीन झाला..मुगळखोडहून परतल्यावर श्री. सद्गुरुंनी गंगाखेडी आश्रम स्थापन केला..आणि आपल्या पुढील कार्यास आपल्या परमभक्त प्रभाकराला पाठवून..जड अंतःकरणाने त्यांना अखेरचा निरोप दिला..त्यांच्या कुळाची सारी जबाबदारी स्वतःच्या शिरी घेऊन आपल्या लाडक्या भक्तास या मोहमायेतून कायमचे सोडवले..
गंगाखेड आश्रमी त्यांनी अत्रीनंदन श्री. दत्तात्रेयाच्या मुर्तीसमवेत आपले गुरु श्री. यल्लालिंगस्वामी व आजेगुरु श्री. सिद्धलिंगस्वामी यांच्या मुर्ती स्थापन करुन तो आश्रम पावन केला व पूर्वनियोजीत संकल्पाप्रमाणे त्या पवित्र पावन भूमीत स्वसमाधीचे बांधकाम सुरु केले..या सा-या गोष्टी सामान्य भक्ताच्या आकलना पलिकडच्या होत्या..केवळ गुरुआज्ञा शिरोधार्य मानून सारे भक्तगण फक्त काम करत होते..
साधारण एकोणीसशे नव्वद सालापासूनच ब-यापैकी श्री. सद्गुरुंनी मौन धारण केले होते..महत्वाच्या गोष्टी सोडल्या तर ते फक्त हात उंचावून आशिर्वाद देत असत..धारण केलेला देह सांडून आपला आत्मा ब्रम्हांडात विलीन करण्याची सुरु झालेली ही प्रक्रिया सामान्य जनांस उमगणे शक्यच नव्हते..अद्भुत आणि आलौकिक तेजाच्या या सा-या लीला सामान्य जीवाला कशा समजणार..सारेच केवळ अनाकलनीय होते..शिराढोण आश्रमी असताना सारे भक्तगण नित्याप्रमाणे सद्गुरुंच्या सेवेत निमग्न होते..पण सद्गुरुंनी मात्र आता आपला पुढचा मार्ग ठरवला होता..आणि अखेर एकोणीस जून दोन हजार एक साली..शिवरात्रीच्या पवित्र दिवशी सद्गुरुंनी आपला देह ठेवला व ते समाधिस्त झाले..देहाने जरी नसले तरी मनाने ते कायम आपल्या भक्तांच्या सोबत आहेत हे त्यांनी पदोपदी अनेक दाखले देऊन पटवून दिले..आपल्या पोरक्या झालेल्या भक्तगणांना ते कायमच सांभाळत आले आहेत आणि निर्गुण रुपात ते त्यांना दर्शन देत आले आहेत..
   “नको नको आता, देहात गुंतणे | अंतरंगी जाणे, माझे रुप ||“
असा हा श्री. गुरु दत्तात्रेयाचा चोवीसावा अवतार..भक्ताकारणे देह धारण केला व त्यांना उत्तम शिकवण देऊन सन्मार्गास लावून अनंतात विलीन झाला..
“ अवधुत चिंतन श्रीगुरुदेव दत्त!!, श्री. समर्थ सद्गुरु काशीनाथ महाराज की जय !!”
आता सद्गुरु चरित्रामृताचे थोडक्यात सार..
पहिल्या अध्यायात श्री. सद्गुरुंचे आरळी ग्रामी कुलकर्णी वाड्यात आगमन झाले..जन्मोजन्मींच्या ऋणानुबंधाच्या गाठींची जाणीव करुन दिली..व समस्त कुलकर्णी परिवाराच्या मस्तकी वरदहस्त ठेवून त्यांना कृतकृत्य केले..
दुस-या अध्यायात श्री सद्गुरुंनी आपल्या भक्तांना सत्शिष्याचे लक्षणे सांगितली व दाखला म्हणून शिष्य दिपक व गुरुवर्य वेदधर्म यांचे आख्यान सांगितले..तसेच तिथे अवतरलेल्या भुजंगासही उपदेशून स्वस्थानास जाण्यास सांगितले..
तिस-या अध्यायात यशवंतरावांची उदरव्यथा दूर केली, राधामातेस आरळीत बसून प्रत्यक्ष पंढरीच्या विठूरायाचे दर्शन घडवले, व तसेच कुलकर्णी कुटुंबाच्या पूर्वजांची कथा कथन केली..आरळी ग्रामी अवतरलेल्या गाणगापुरीच्या दत्तात्रेयाला चरणपादुकांच्या रुपात स्थापित केले..
चौथ्या अध्यायात श्री. सद्गुरुंनी स्वतःचे पूर्वचरित्र आपल्या भक्तांना सांगितले..स्वामी समर्थांच्या कृपेने काशीरमण कसे अवतरले हे सांगितले..
भगावंताची ओढ लागून काशीरमण हिमालयी पोचले व तिथे त्यांना प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन कसे झाले हे निरुपले पाचव्या अध्यायात...
सहाव्या अध्यायात..श्री.सद्गुरु यांना श्री.गुरुंची भेट झाली व ते अमृतकुंडी तपसाधनेसाठी पोचले..
सातव्या अध्यायात, श्री. सद्गुरुंनी नित्य दर्शनास येणा-या मेंढपाळाची भक्ती पाहून त्यास अनुग्रहित केले..व मच्छिंद्रनाथ व गोरक्ष या गुरु शिष्याची कथा आपल्या शिष्यास सांगितली...
आठव्या अध्यायात कलीचा महिमा वर्णन केला व कुमुदराजेंना अनुग्रहित केले..
नवव्या अध्यायात नृसिंह मंदीरी अनुष्ठान केले व तेंव्हा आडवण्यास आलेल्या निजाम सेवकांस कुराण कथन केले..रामवाडी ग्रामी आश्रम स्थापून तिथे नंदनवन फुलवले व आपल्या शिष्यांस सर्प भयाचा दाखला देऊन जीवनाचे वर्म सांगितले..
दहाव्या अध्यायी गुरुनाथांस स्वतःच्या पात्रातील घास देऊन पावन केले..श्री.दत्तात्रेय जन्माची कथा सांगितली
अकराव्या अध्यायी अपस्मारी व्यधा जडलेल्या गोपाळांस कृपेच्या जलवर्षावाने स्वस्थ केले..व बाळप्पांना लच्चाण ग्रामी नेऊन प्रत्यक्ष दत्त दर्शन घडविले..व त्रिविक्रम भारतीचे आख्यान कथनही केले..
बाराव्या अध्यायात, बाळप्पांस मोक्ष दिला..व आपला भक्त प्रभाकरांस अनुष्ठानाच्या पवित्र काळात दर्शन दिले..
तेराव्या आध्यायात, श्री. सद्गुरु आपल्या गुरुंसोबत तिर्थाटनांस गेले व एका ब्राह्मण पुत्रांस जीवदान दिले..व अवताराचा गहन अर्थ कथित केला..
चौदाव्या अध्यायात, दौपदीचे वस्त्रहरण व कृष्णाचे भक्तसंकटनिवारण सांगितले व विधवांच्या पतींना भोजन दिधले..
पंधराव्या अध्यायात साहित्य सामुग्री काहीही नसता तीस साधूंस भोजन दिधले व भक्त प्रभाकराला प्रत्यक्षस्वामी समर्थांच्या रुपात दर्शन दिधले
चंद्रकांत कुलकर्णी , कवठेकर या आपल्या थोर भक्ताला अवचित दर्शन दिले व त्यांना विभूतीचा महिमा सांगितला व त्यांचे संकटहरण केले..सोळाव्या अध्यायात...
सतराव्या अध्यायात शहाजी पाटील यांना दर्शन देऊन लखनग्राम पावन केले..लिंगणमातेस मोक्ष दिधला व आत्मज्ञान कथन केले..पाटोळे भक्तासाठी स्वतःस्टेशन मास्तर होऊन त्यांचे तारणहार बनले...
अठराव्या अध्यायी, उमरगा ग्रामी आश्रम स्थापन केला..व कृषीधारकांस जीवन प्रदान करुन त्यांस धन्य केले...
एकोणीसाव्या अध्यायात श्री. सीताराम महाराजांचा भास दूर केला व स्वतः अडभंगनाथाची कथा कथन केली..भक्तांच्या मनीची आस ओळखून मुरुड ग्रामी मठ स्थापन केला व श्री. सीताराम महाराजांना तेथे राहण्यास सांगितले..
विसाव्या अध्यायात भक्तांसोबत काशीयात्रा केली..भक्तांवर आलेले विघ्न सहजपणे दूर केले..पाण्यावर स्टोव्ह पेटवून गरजवंताना सहाय्य केले..व परतून येऊन यात्रेचे उद्यापनही केले..
एकविसाव्या अध्यायी परमभक्त शिवसिंग महाराजांचे विघ्न दूर केले..हरीद्वारी भक्तांस नेऊन तेथे प्रत्यक्ष हरीचे दर्शन घडविले..
बावीसाव्या अध्यायात सद्गुरु चरित्रामृताचे ग्रंथकार यांना मस्तकी वरदहस्त ठेवून त्यांना धन्य केले..मामलेदारांस दृष्टांत दाखवून दस्त नोंदविले व गुरुनाथांची जमीन स्विकारुन तेथे दत्त चरणांची स्थापना केली..
गरजवंतास नेहमी हवे ते द्यावे हे भक्त प्रभाकरांस दाखवून दिले..श्री. गुरुंच्या पालकारोहणास जाऊन स्वतःचे शिष्य श्री. सिद्धरामेश्वरांस गादीवर बसविले..हे सारे तेविसाव्या अध्यायात..
चोविसावा अध्याय हा कळसाध्याय..यांत सद्गुरुंनी प्रस्थान केले...व निर्गुणरुपी भक्तांच्या हृदयात स्थानबध्द झाले..
असा हा चोवीस अध्यायांचा महान ग्रंथ..श्री. सद्गुरुंच्या कृपेने ग्रंथकार श्री. संजय कुलकर्णी यांनी पूर्ण केला..श्री. सद्गुरु हे दत्तात्रेयाचे चोविसावे अवतार असावेत असा कयास बांधून त्यांनी ही चोवीस पुष्पांची माला सद्गुरु चरणी अर्पण केली..श्री. सद्गुरुंची महती वाचण्यास व श्री सद्गुरुंचे पुस्तकरुपी सानिध्य प्राप्त करण्यांस मनोमन दृढ विश्वास ठेवून या पवित्र ग्रंथाचे भक्तांनी पारायण निश्चित करावे..तसे तर या ग्रंथाचे मनोभावे नित्य वाचन करावे..पण जर सात दिवसांचे पारायण करायचे असेल तर त्याची पद्धती ही ग्रंथकारांनी इथे नमूद केली आहे..
पहिला दिवस – तीन अध्याय (३)
दुसरा दिवस – सहाव्या अध्याय पर्यंत (४ते६)
तिसरा दिवस – नवव्या अध्याय पर्यंत(७ते९)
चौथा दिवस – तेराव्या आध्याय पर्यंत(१०ते१३)
पाचवा दिवस – सतराव्या अध्याय पर्यंत ( १४ते१७)
सहावा दिवस – एकवीस आध्याय पर्यंत (१८ते२१)
सातवा दिवस – चोवीसाव्या अध्याय पर्यंत (२२ते२४)
श्री. सद्गुरुंच्या कृपाशिर्वादाने व ग्रंथकार श्री. संजय गुरुनाथ कुलकर्णी यांच्या इच्छेप्रमाणे मी या ओवीबद्ध ग्रंथाचा कथारुपात अनुवाद करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला..हा प्रयत्न तन आणि मनाने सद्गुरुचरणी अर्पण..

“अवधुत चिंतन श्री. गुरुदेव दत्त!!!!श्री. समर्थ सद्गुरु काशीनाथ महाराज की जय !!!”

                  ||शुभं भवतु ||

टिप्पण्या