श्री. सद्गुरु चरित्रामृत - अध्याय आठ

अध्याय आठ...
आरळी ग्रामीच्या लोकांना महाराजांनी स्वमुखाने आपले पूर्वचरित्र वर्णन केले..शिष्याच्या ठायी निर्माण झालेल्या जिज्ञासचे निराकरण केले..व तसेच अनेक दाखले देऊन त्यांना ज्ञानामृतही दिले..जनउद्धारार्थ अवतार घेतलेल्या सद्गुरुंना एके ठिकाणी निवास करणे शक्यच नसते..अनेक जणांची जबाबदारी असणा-या त्या जगतनियंत्याला फिरावेच लागते....असेच फिरत फिरत एकदा धाराशीव ग्रामीच्या एका शेतात ते पोचले..तेथील शांत व प्रसन्न वातावरण सद्गुरुंना भावले..मग तिथे स्थान निश्चित करुन ते ध्यानस्थ बसले...पाहणा-यास कळणारच नाही की कैलास पर्वती ध्यान करणारे पिनाकपाणी आहेत की शेषशय्येवर ध्यानस्थ झालेला नारायण..तिन्ही तत्व जिथे एकवटले त्या दत्तात्रयाचे ते साक्षात अवतारच होते....तेच तेज त्यांच्या सभोवती जाणवत होते....तेवढ्यात तिथे त्या भूमीचा मालक व धाराशीव ग्रामीचे थोर व सत्शील व्यक्तीमत्व कुमुदराजे निंबाळकर तिथे आले...दुरुनच त्यांनी पाहिले होते की एका वृक्षातळी कोणीतरी एक योगी ध्यानस्थ बसलेले आहेत..ते तेजःपुंज तपस्वी पाहूनच त्यांना खात्री पटली होती की हे कोणी सामान्य संन्यासी नसून एक महान अवतारी पुरुषच असणार..डोईवरील जटा, चेहे-यावरील दैदिप्यमान तेज असे हे सगुण रुप पाहून प्रत्यक्ष दत्तात्रेय अवतरले असावेत असेच वाटत होते...राजे सद्गुरुंच्या समीप आले व त्यांनी चरणी मस्तक ठेऊन सद्गुरुंना वंदन केले....आपल्या शेतात हे महान तपस्वी ध्यानस्थ झालेले पाहून ते मनोमन आनंदीतच झाले होते....पुन्हा एकदा महाराजांना वंदन करुन ते दोन्ही हात जोडून सद्गुरुंच्या समोर उभे राहिले...महाराजांनी नेत्र उघडून प्रसन्न चित्ताने राजेंना आशिर्वाद दिला.. राजे महाराजांना म्हणाले “ महाराज आपण कोठून आला आहात?? आणि इथे येण्याचे काही खास कारण?? आपणांस माझ्याकडून कोणत्या प्रकारची सेवा अपेक्षित आहे..आपण मला सांगा..”
राजेंचे बोलणे ऐकून महाराज त्यांना म्हणाले “ प्रथम आपण इथे शांत चित्ताने बसा मी आपणांस सर्व काही सांगेन..आणि महाराजांनी कुमुदराजेंना आपले पूर्वचरित्र कथन केले..जे त्यांनी आरळी ग्रामीच्या शिष्यांना  सांगितले होते..”
ते चरित्र ऐकून कुमुदराजे सद्गदित झाले...व म्हणाले “ आज माझे पूर्वजन्मीचे पुण्य फळा आले..आणि आपले दर्शन मजला झाले....आता या चरणांची सेवा करण्याची इच्छा आहे..तेंव्हा तुम्ही माझ्या घरी चला..आज माझ्या या भूमीला आपले चरणकमल लागले ही भूमी धन्य झाली..आता माझे घर पावन करा...व आपली यथोचित सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या या पामराला द्या..तुम्हीच मला साक्षात दत्त भासलात आता माझ्या मस्तकी वरदहस्त ठेवून माझा उद्धार करा..”
कुमुदराजेंची ही कळकळीची विनवणी ऐकून सद्गुरु प्रसन्न झाले..व म्हणाले “ राजे माझा आशिर्वाद कायम तुमच्या पाठीशी असेल...मी संन्यासी आहे..आता तुमच्या घरी नाही येत..पण वेळ आली की निश्चित आपल्या घरी येईन..पण आता मला ही जागा खूप भावली आहे..तेंव्हा काही दिवस येथेच निवास करण्याची इच्छा आहे...”
सद्गुरुंचे हे बोलणे कुमुदराजेंनी मान्य केले व त्यांनी सद्गुरुंना त्या स्थानी एक पर्णकुटी बांधून दिली..व ते नित्यनेमाने सद्गुरुंसाठी फळफळावळ आणत व मनोभावे त्यांच्या चरणांची सेवा करत ..असेच एकदा कुमुद राजेंनी सद्गुरुंना विचारले..” महाराज आपल्या जीवनाचे कल्याण कसे करावे..ज्या कारणासाठी मानवी जन्म प्राप्त झाला ते कारण साध्य कसे करावे..व कितीही केले तरी चित्ती समाधान काही लाभत नाही तरी हे समाधान कसे मिळवावे...आपण थोर तपस्वी आहात....आता तुम्हीच मला य प्रश्नांची उत्तरे द्या..” त्यावर हसून महाराज बोलले..” राजे अहो सर्व दुःखाचे मुळ हे मनच तर आहे..मनोनिग्रह करुन जो पंचेद्रियांवर ताबा मिळवतो..तोच मनालाही वेसण घालू शकतो..हे मनच आपल्या ताब्यात ठेवावे..व कशाचीही लालसा करु नये तेंव्हाच समाधान लाभते..पण सहजासहजी हे मन ताब्यात येत नाही ..त्यासाठी त्याला कायम भगवंताच्या नामस्मरणात रमवावे...आणि आपली कर्मे निस्वार्थ बुद्धीने करावीत..या कलीयुगात मानवासाठी अन्न हेच प्राण आहे....कृता, त्रेता व व्दापार युगात मानवाला आयुष्य भरपूर होते..त्यामुळे ते आपला देह कष्टवून साधना करत व ईश्वरचरणी लीन होत...पण या कलीयुगात मानवांस अल्प आयुष्य लाभले..तेंव्हा सत्कर्म व नामजप करुनच त्याचा उद्धार होईल...याच कलीयुगाचे लक्षणे मी आता तुम्हाला सांगतो...जेंव्हा कृता, त्रेता व व्दापार यांचे दिवस संपले तेंव्हा ब्रह्माने कलीयुगाला पाचारले..व भुमीवर जाण्यास सांगीतले..हेच कलीयुग एखाद्या पिशाच्चासारखे भासत होते, त्याने मुख खाली केलेले होते, वृद्ध आणि कळाहिन असे ते होते..कलह व व्देष हे दोन्ही त्याच्या सोबत होते..व डाव्या हातात त्याने लिंग धरले होते..असे हे कलीचे ध्यान ब्रह्मासन्मुख नाचत होते..त्याच्या तोंडी शिव्या होत्या..पुण्यपाप एकत्रितच त्याचे ठायी होते...त्याचे ते रुप पाहून ब्रह्माने त्यांस विचारले “ तू लिंग व जिव्हा का धरली असे”
त्यावर कलीने उत्तर दिले “ जे लिंग व जिव्हा याचे रक्षण करतील त्यांना मी हारेन..मी कोणालाही भीत नाही..”
त्यावर ब्रह्माने त्यांस सांगितले “ आता तू भूमीवर जा.. तुझ्या गुणांचा प्रभाव आता मनुष्यलोकांवर असेल “  यावर कली बोलला “ आता तुम्ही मला भूमीवर पाठवतच आहात तर मी माझी स्वभाव वैशिष्ट्ये सांगतो, मी भूमीवर जाऊन धर्माचा उच्छेद करेन तसेच परद्रव्य व परस्त्रीवर डोळा असणारे कायमच मला प्रिय असतील..मत्सर आणि द्वेष अंगिकारणारे माझे प्राणसखेच असतील..पण जे पुण्यवान असतील ते मात्र माझे वैरी असतील..”
“हेच तुला सांगत आहे” ब्रह्मा म्हणाले कलीला  “ कलीयुगात मानवाला आयुष्य फारच कमी असेल..त्यामुळे आधीच्या युगातील मानवाप्रमाणे अनेक दिवस तपश्चर्या करावी लागणार नाही..जे  जप आणि अनुष्ठान करतील त्यांना लगेच परमार्थ प्राप्त होईल..तेंव्हा जे जन नेहमी भगवंत भक्तीत रममाण असून पुण्यकर्म करतील व जे साधूजन असतील त्यांना तू छळू नकोस..”
यावर परत कलीने विचारले “ मग साधूजन कसे ओळखावे..त्यांची लक्षणे मला तुम्ही सांगा “
मग ब्रह्म बोलू लागले  “ जे शुद्ध अंतःकरणाचे असून त्यांना कुठलाही लोभ नसतो तसेच जे कायम हरीभक्तीत रममाण झाले असतात व आपल्या गुरुची सेवा करत असतात...गुरुवाक्य प्रमाण मानूनच जे आचरण करत असतात अशा लोकांना तू त्रास देऊ नकोस तसेच जे माता, पिता व गुरुजनांचा आदर करतात व ज्यांच्या मुखी कायम भगवंताचे नाम असते..जे भूकेलेल्यांना अन्न देतात, व ज्यांची आपल्या गुरुचरणी दृढ भक्ती असते, जे सदा परोपकार करतात व हरीकिर्तनात रमलेले असतात अशा जनांना तू काही करु नकोस..” ब्रह्माच्या या आज्ञेवर कलीने मान खाली घालून संमती दिली..
हे कलीयुगाचे निरुपण महाराजांनी कुमुद राजास सांगितले व पुढे म्हणाले “ आद्यगुरुचे अधिष्ठान हे श्री. दत्तात्रेय आहेत तेंव्हा त्यांचे चरण कायम वंदावे..त्यांच्या चरणी दृढ भाव ठेवला की ते आपली मनोकामना पूर्ण करतात..”
सद्गुरुंचे हे अमृतवचन ऐकून कुमुदराजे धन्य झाले व म्हणाले  “ महाराज मी धन्य झालो...माझे जीवन सार्थकी लागले आपले चरण दिसले...माझ्या जीवनाचे तुम्हीच कल्याण कराल अशी माझी आता खात्री आहे..” असे बोलून कुमुद राजेंनी सद्गुरुंच्या चरणावर मस्तक ठेवले..त्यांची दृढ भक्ती व निर्मळ भाव पाहून महाराज कुमुदराजेंना म्हणाले “ चला आता तुमच्या घरी जाऊ” महाराजांचे हे बोल ऐकून राजे मनोमन आनंदित झाले..सद्गुरु नेहमीच आपल्या भक्ताची मानोकामना पूर्ण करतात..फक्त योग्य वेळ येण्याची ते वाट पाहत असतात...
कुमुद राजेंच्या घरी त्यांच्या सुविद्य पत्नी सरुबाई होत्या..दोघांनीही सद्गुरुंचे यथोचित पूजन केले...मनोभावे चरणांची पूजा केली..दोघांच्याही मनीचे दृढ भाव बघून महाराजांनी त्यांना बीजाक्षरी मंत्र दिला...व त्यांच्या मस्तकी वरदहस्त ठेवून त्यांना अनुग्रहीत केले..तिथून पुन्हा फिरत फिरत महाराज तेर ग्रामी आले..गोरोबा काका म्हणजे संत गोरा कुंभार ज्याने विठ्ठल भक्तीत मग्न होऊन आपलेच बाळ पायी तुडवले होते..व त्यांची भक्ती पाहून साक्षात विठ्ठल धावला व बाळास सजीव केले....ते याच तेर ग्रामीचे..इथे त्यांचे एक मंदीर आहे...महाराजांनी मंदीरात जाऊन त्या थोर विठ्ठल भक्ताचे दर्शन घेतले...महाराज तेंव्हा अनुष्ठानासाठी उत्तम स्थान निवडत होते..तेंव्हा त्यांना स्वप्नात एक नृसिंह मंदीर दिसले  जे रामवाडी नजीकच आहे..हेच स्थान उत्तम असेल असा विचार करुन महाराज त्या स्थानी पोचले..अनुष्ठानासाठी अत्यंत शांत असे ते स्थान सद्गुरुंना अत्यंत आवडले..तिथे सद्गुरु असताना आजूबाजूच्या गावचे अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत..
“धन्य धन्य ती गुरुमाऊली, लाभो सदा तयांची कृपा साऊली....”
“अवधुत चिंतन श्री. गुरुदेव दत्त !!!श्री. समर्थ सद्गुरु काशीनाथ महाराज की जय !!!”

अनुवाद – सौ. सुजाता कुलकर्णी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा