अध्याय सोळा...
भगवंत भक्तीचा भुकेला म्हणतात..तसे ज्याच्या मानसी भगवंत वसतो अशा भक्तांचे तो स्वतः रक्षण करतो..आनंदाने अशा भक्तांचे मनोरथ पूर्ण करतो..असे अनेक शिष्य सद्गुरुंचेही होते..सद्गुरुंची आज्ञाच प्रमाण वाक्य मानून ते आपले कर्म करत असत..अशाच अनेक शिष्यामध्ये एक म्हणजे कवठा ग्रामीचे श्री. चंद्रकांतराव कुलकर्णी, आरळीच्या कुलकर्णी यांचे हे जावई व सद्गुरुंचे परमभक्त श्री. प्रभाकर यांच्या एकमेव भगिनींचे हे पती..ऋणानुबंधाच्या गाठी भगवंतानेच मारलेल्या असतात असे म्हणतात तसे पूर्वपुण्याईने हे सत्शील सद्गृहस्थ यांचे नाते कुलकर्णी घराण्याशी जोडले गेले आणि सद्गुरुंच्या चरणसेवेचे भाग्य यांनाही मिळाले...परंतु जन्मजन्मांतरीचे हे नाते असावे इतक्या दृढभावाने ते सद्गुरुंच्या चरणसेवेत निमग्न असत..नेटाने संसार करत, प्राप्त जमिनीत कष्टाने ते सोने पिकवत असत..व वेळ मिळेल तसे तेही बुधवारी सद्गुरुंच्या दर्शनास जात असत.. कवठा ग्रामी अत्यंत विशाल असा त्यांचा वाडा होता..जमीनजुमला मुबलक असल्यामुळे..आजूबाजूच्या पंचायतीत त्यांचा चांगलाच दबदबा होता..परंतु मनाने ते अत्यंत निर्मळ, सत्शील असे होते व सद्गुरुंचे ते निस्सीम भक्त होते..प्रत्येक गोष्ट ते सद्गुरुंच्या आज्ञेनेच करत असत..असेच एका बुधवारी शेतीतील कामात गुंतल्यामुळे त्यांना सद्गुरुंच्या दर्शनास जाणे होत नाही..पण मनी हुरहुर दाटून राहिली होती...आपली नित्य कर्मे करतानाही ते सद्गुरुंचे नित्य स्मरण करत होते..त्यांची ही तळमळ सद्गुरुंपर्यंत पोचली..आपली सारी कामे पूर्ण करुन सायंकाळी ते घरी परततात..थोड्या वेळात दारात साक्षात सद्गुरु येतात..सोबत श्री. प्रभाकर तथा काही शिष्यगणही असतात..सद्गुरुंना असे अचानक आलेले पाहून श्री. चंद्रकांतराव यांना गहिवरुन येते..आपल्यासाठी सद्गुरु स्वतः आले म्हणून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागतात..धावतच ते सद्गुरुंचे चरण धरतात..व म्हणतात “ महाराज आज प्रापंचिक कामात गुंतलो आणि आपले चरण स्पर्श करण्यास येऊ शकलो नाही..पण एखादी माता आपल्या लेकरांस भेटण्यास धावावी तसे तुम्ही माझ्यासाठी आलात..माझी अंतरीची तळमळ तुमच्यापर्यंत पोचली..आज मी कृतार्थ झालो..माझा दर्शनाचा नित्यनेमही मोडला नाही आणि आपले चरणस्पर्शही माझ्या या घरांस लागले..” असे म्हणून ते पुनःपुन्हा सद्गुरुंचे चरण धरतात..त्यांच्या या निर्मळ भावाने सद्गुरुही प्रसन्न होतात..त्यानंतर कवठेकर उभयंता दांम्पत्याने सद्गुरुंची याथासांग , षोडषोपचरे पुजा केली..व सा -यांसाठी उत्तम भोजनाचा बेत आखलेला असतो...सारे यथायोग्य पार पडल्यावर रात्री सद्गुरु आपल्या शिष्यांस प्रवचन सांगण्यास सुरवात करतात..या प्रवचनात ते भस्म महिमा वर्णन करतात..
पूर्वी कृतायुगात वामदेव म्हणून एक योगी होते..काम, क्रोध या षडरिपुंवर त्यांचे उत्तम नियंत्रण होते..म्हणूनच ते अत्यंत शांत व निस्पृह असे होते..सर्वांगास भस्म विलेपन करुन व केवळ वल्कले परीधान करुन ते अनेक तिर्थे हिंडत असत..असेच फिरत फिरत ते एकदा दंडकारण्यात पोचले..तिथे एक भयानक ब्रह्मराक्षस वास करुन होता..तो मनुष्यास जिवंतच भक्षित असे..अशा या घोर अरण्यात वामदेव पोचले..ब्रह्मराक्षसाने त्यांस पाहिले..या ब्रह्मराक्षसाच्या भितीने कुणीही मनुष्य तिकडे फिरकतच नसे त्यामुळे बरेच दिवसांत त्यांस काहीच खाण्यास मिळाले नव्हते..अशा क्षुधाक्रांत राक्षसास समोर सावज बघून अत्यंत आनंद झाला..त्यास पाहून तो करकरा दात खाऊ लागला..व आपले विशाल मुख पसरुन तो वामदेवाकडे धावला....राक्षसास पाहून वामदेव निःशंक उभे होते..आपले सावज घाबरुन न पळता स्थिर उभे आहे म्हणून राक्षसही संतोषला..व त्याने धावत येऊन वामदेवाला घट्ट पकडले..घट्ट पकडताच वामदेवांच्या अंगाचे भस्म त्याच्या अंगास लागते व त्या राक्षसाचे जन्मोजन्माचे पातक संपून जाते व क्षणार्धात तो एक दिव्य ज्ञानी होतो..परीस स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे तद्वत भस्माच्या स्पर्शाने एका आक्राळ विक्राळ राक्षसाचा एक ज्ञानी पुरुष होतो..तो लगेच वामदेवांच्या चरणी लागतो व म्हणातो “ तुमच्यामुळे माझे जन्मजन्मांतरी पातक संपले..तुम्ही महान आहात ..” स्वतः भगवान शंकर ही आपल्या सर्वांगास चिताभस्म लावतात असेच भस्माचे अजून एक आख्यान सद्गुरुंनी सांगण्यास सुरवात केली..कोण्या एका राज्यात विप्र राहत होता..जन्माने विप्र असला तरी तो अत्यंत आचारहिन काम करत असे..असंगाशी संग करुन कर्मभ्रष्टासारखा वर्तत असे..आणि केवळ याचमुळे समस्त विप्र वर्गाने त्यास बहिष्कृत केले होते..त्याचे आप्तस्वकीयांनीही त्याच्याशी सारे संबध तोडले होते..त्यामुळे तो तस्करी करुन आपला उदरनिर्वाह करीत असे...अतिशय उन्मत्तपणे तो वागत असे..असेच एके रात्री चौर्य कर्म करत असताना एका क्षुद्राने त्याचा वध केला..व त्याचे प्रेत लांब गावाबाहेर नेऊन टाकले..तिथेच जवळ काही श्वान भस्मावर बसले होते..प्रेताच्या वासाने ते क्षुधाक्रांत श्वान फिरत फिरत त्या प्रेताजवळ येतात..व प्रेतावर बसून आपले क्षुधानिवारण करत असतात..आधी भस्मावर बसलेले असल्यामुळे त्या श्वानाच्या अंगी लागलेले भस्म त्या प्रेताच्या कपाळास व सर्वांगास लागते....तो विप्र मृत झाल्यावर त्याचे प्राण नेण्यासाठी काही यमकिंकर आलेले असतात..त्याच्या आयुष्यात त्याने केलेल्या अधर्माचे हेच फलीत असते..परंतु तेवढ्यात तिथे शिवलोकीचे शिवदुत येतात..प्रेतास लागलेले भस्म पाहून ते याचे प्राण यमकिंकराने का नेले म्हणून ते त्यांना मारण्यास धावतात..शिवदुतांना आलेले पाहून यमदुत पळून यमपुरात पोचतात व यमास सारा वृत्तांत सांगतात की, अधर्मी विप्राचे प्राण आणण्यास आम्ही गेले असतात शिवदुत धावून मारावयास आले..व विप्राचे प्राण आम्हांकडून हिसकावून घेतले..हे ऐकून यम अत्यंत क्रोधीत होतो व असे का केले हे विचारण्यास तो शिवदुताकडे धावतो..शिवदुताजवळ गेल्यावर तो त्यांना विचारतो की का यमकिंकरास मारुन पिटाळून लावले..हा तर आधर्मी विप्र होता याचे कर्म पाहता तो यमपुरीस येण्यासच पात्र होता असे असताना का तुम्ही त्याचे प्राण नेत आहात??यमाचे हे क्रोधित बोलणे ऐकून शिवदुत त्यांस विस्तारुन सांगतात “ याच्या कपाळावर व अंगास भस्म लागले होते..आणि ज्याची भस्माकिंत तनु असते त्यास कैलासपदच प्राप्त होते..यापुढे तुम्ही यमदुतास सांगा..ज्याच्या अंगास भस्म लागते त्याचे सर्व दोष निवारण होते..व त्याने कितीही अधर्म केला तरी त्यास शिवदुतच नेतात..शिवदुताचे हे बोलणे ऐकून यम निघून जातो..
सद्गुरु या दाखल्यासह आपले भस्ममहिमानाचे निरुपण संपवतात..सारे शिष्यगण सद्गुरुंचा जोरात जयजयकार करतात.. “ अवधुत चिंतन श्री. गुरुदेव दत्त, सद्गुरु श्री. काशीनाथ महाराज की जय “
दुसरे दिवशी प्रातःकाळी..आपली सर्व नित्यकर्म अटोपून श्री. चंद्रकांतराव सद्गुरुंना घेऊन आपल्या शेतात जातात..त्यांची कष्ट करून पिकवलेली हिरवीगार शेती, आमराई हे सारे पाहून सद्गुरु आनंदित होतात..पण चंद्रकांतराव सद्गुरुंना सांगतात “ महाराज शेतीस पाणी कमी पडत आहे..एखादी कुपनलिका शेतात घेण्याचा विचार आहे..पण येथील पाण्याची पातळी खोल आहे..खर्च फार होईल शिवाय एवढे करुन पाणी लागेलच याची खात्री वाटत नाही..काय करावे सुचत नाही..आता तुम्हीच यावर काहीतरी मार्ग सांगा..” त्यांचे हे बोलणे ऐकून सद्गुरु पूर्ण शेतात एक फेरफटका मारतात..व शेतामध्ये एका ठिकाणी ते थांबतात..व चंद्रकांतरावांना सांगतात या ठिकाणी कुपनलिका खोदा..त्यांचे बोल ऐकून चंद्रकांतराव अत्यानंदित होतात..व लगेच श्रीफळ मागवून मुहुर्त करुन घेतात..पुढे सर्व साहित्य मागवून त्या ठिकाणी कुपनलिका खोदली जाते व त्यात अपार जल प्राप्त होते..जेंव्हा सद्गुरु आपला वरदहस्त मस्तकी ठेवतात तेंव्हा कमतरता ती कशाची भासेल..आपला फक्त दृढविश्वास पाहिजे..
पुढे काही दिवासांनी श्री. सद्गुरु पुन्हा एकदा कवठा ग्रामी येतात तेंव्हा कवठेकरांच्या वाड्यात डागडुजींचे काम चालू असते..श्री. चंद्रकांतराव सद्गुरुंना वाड्याचे बांधकामाचे जे काम चालू आहे ते दाखवतात..ते पाहून सद्गुरु त्यांना म्हणतात..” हे काम तर उत्तमच चालू आहे..परंतु शेतातही एखादे घर असावे..तेथे राहून पीकसंवर्धन उत्तम केले जाते..तेंव्हा तिथेही काहीतरी थोडे बांधून घ्या.कधीतरी त्याचाही उपयोग होतो..”
सद्गुरुंच्या आज्ञेप्रमाणे श्री. चंद्रकांतराव शेतातही एक विशाल गोठा बांधून घेतात..पुढे त्र्याण्णव सालात मोठा धरणीकंप कवठा ग्राम व आजुबाजूच्या परिसरात होतो..गावेच्या गावे बेचिराख होतात..कवठेकरांच्या वाड्याला काहीही होत नाही पण आजूबाजूचे गाव बेचिराख झाल्यामुळे त्यांना तो वाडा सोडून सगळ्यांसारखे शेतात येऊन राहावे लागते..प्रत्यक्ष काहीही नुकसान होत नाही पण जगासमवेत या आपत्तीच्या झळा काही प्रमाणात या कवठेकर कुटुंबालाही सोसाव्या लागतात...पण जिथे सद्गुरु स्वतः आपल्या भक्ताच्या पाठीशी असतात..तिथे भय यत्किंचितही उरत नाही...फक्त वेळोवेळी भविष्यातील संकटाची ते किंचीतसी नकळत जाणीव करीन देतात..त्याक्षणी ते सर्वसामान्य माणसाच्या मनांस कधीच उमगणार नाही..पण वेळ आल्यावर त्यांचे बोल निश्चितच आठवतात..नियतीने भाळी लिहीलेल्या काही अप्रिय गोष्टीतून जावे जरी लागले तरी..एखाद्या पाण्यातील कमळाप्रमाणे सद्गुरु अलगद आपल्याला या सा- या संकटातून बाहेर काढतात..
“ सद्गुरु सारिखा, पाठीराखा आता, कैसी उगा चिंता, मनी वसे “
“अवधुत चिंतन श्री. गुरुदेव दत्त !!! श्री. समर्थ सद्गुरु काशीनाथ महाराज की जय !!”
अनुवाद – सौ. सुजाता कुलकर्णी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा