अध्याय बावीस..
अवतारी पुरुष, संत अशा दैदिप्यमान लोकांनी मानवी शरीर जरी धारण केलेले असले तरी..त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय व कार्ये हे आधीच ठरवलेले असते..ज्या कार्यासाठी त्यांना मानवी देह धारण करावा लागलेला असतो..त्याची पूर्ती झाल्यावर किंबहुना होत असतानाच..त्यांनी देह त्यागाचे ठरवलेले असते..त्यासाठीची जागा, वेळ हे सारे पूर्वनियोजितच असते..सामान्य मानवी मनाला हे सारे आनाकलनीय असते..माया मोहात अडकलेला माणूस मात्र आपल्या बुद्धी नुसारच त्याचे अंदाज बांधत असतो...सद्गुरुंनीही आपले समाधीस्थळ पूर्वीच योजून ठेवले होते..गोदातटी गंगाखेड ग्रामी समाधीस्थळ असेल हे पूर्वनियोजितच होते..काही अवधीनंतर जेंव्हा महाराजांसोबत काही परमभक्त होते..तेंव्हा गंगाखेडला जाऊन त्यांनी तिथे भूमी संपादन केली..व त्या पवित्र स्थानी दत्त पादुकांची प्राणप्रतिष्ठा केली..जन उद्धाराचे कार्य चालू असतानाच..श्री. सद्गुरु दूरदृष्टी ठेवून ही सारी कार्य पाडत होते..
ज्या कुलकर्णी वाड्यात सद्गुरुंचे प्रथम आगमन झाले होते..तेथील कुटुंबाचा सद्गुरुंच्या कृपेने विस्तार होत होता..कुलकर्णी घराण्याच्या वटवृक्षावर नवनवीन फांद्या विकसीत होऊन फळाफुलांनी तो बहरत होता..सद्गुरुंचे परमभक्त प्रभाकर व श्री गुरुनाथ कुलकर्णी या दोघांचेही कुटुंबात आपत्यांचे आगमन होऊन गोकुळ बाळ गोपाळांनी भरुन गेले होते...
एकदा गुरुनाथांच्या पत्नी माता अनुसुया आपल्या सुपुत्रास घेऊन सद्गुरुंच्या दर्शनास गेल्या होत्या..आश्रमी पोचताच त्यांनी बालकाचे मस्तक सद्गुरुंच्या चरणांवर ठेवले..त्या बालकाकडे पाहून सद्गुरुंनी स्मितहास्य केले व मायेने बालकाचे नाव काय असे विचारले..श्री. गुरुनाथांनी व माता आनुसुयेने मोठ्या श्रद्धेने बालकाचे नामकरण “दत्तात्रय” असे केले होते..नाव ऐकताच सद्गुरु सुहास्य वदनाने बोलले... “ वा..वा..गुरुचा पुत्र दत्त, व दत्ताचे पिता गुरु..”
सद्गुरुंचा कुलकर्णी घराण्यावर कायमच वरदहस्त होता..आणि या घरातील प्रत्येकाची सद्गुरुंवर अपार श्रद्धा होती..या सा-यांचे मन धाव घेई ते केवळ सद्गुरुचरणी..यांच्या ध्यानी, मनी स्वप्नी केवळ सद्गुरुंचेच नाम असे..
या श्रद्धेतूनच श्री. गुरुनाथ व त्यांची पत्नी अनुसुया यांनी आरळी ग्रामी ज्या ठिकाणी दत्तात्रेयांच्या पादुकांची स्थापना केली होती..ती जमीन सद्गुरुंच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले....त्या ठिकाणी सद्गुरुंच्या हस्ते दत्तात्रेयाची मुर्ती स्थापन करुन तिथे एक उत्तम मंदीर असावे अशीच या दांपत्याची इच्छा होती..या गोष्टीवर मनाचा निर्धार करुन श्री. गुरुनाथ गावातील काही सद्गुरुंच्या भक्तमंडळींना सोबत घेऊन सद्गुरुंकडे धावले....गेली अनेक वर्षे संसारात रममाण झाल्यामुळे सद्गुरुंचे चरण दूर राहिले होते..पण हा विचार मनी आला आणि गुरुनाथ ताबडतोब सद्गुरुंकडे गेले..तेथे गेल्यावर ते सद्गुरु चरणी लीन झाले..अनेक वर्षानंतर आलेल्या आपल्या या परमभक्ताकडे पाहून सद्गुरु बोलले “ अरे, गुरु अनेक वर्षांनी भेटीसाठी आलास??”
यावर गुरुनाथ बोलले “ महाराज, संसारात इतका रमलो की आपल्या चरणांचे विस्मरण झाले..अनेक दुःखे भोगिली तेंव्हा जाणवले आता तुम्हावीण मज कोणताच आधार नाही..माझी पूर्वजन्मीची पुण्याई थोर म्हणून मज आपणासारखे सद्गुरु लाभले..या तेजस्वी ज्योतीचा विसर पडला आणि माया मोहाच्या अंधकारात चाचपडत राहिलो..पण पुन्हा एकदा मनी प्रकाशाचा कवडसा उमटला आणि आपल्याकडे धावलो..आता आपल्या चरणांशी एकच विनवणी आहे आपण स्वतः येऊन माझी भूमी मंदीरासाठी स्विकारावी..आणि एक उत्तम दत्त मंदीर बांधून आरळी ग्राम पावन करावे..” असे म्हणून ते पुनःपुन्हा सद्गुरुंच्या चरणांवर माथा टेकू लागले..सोबत आलेल्या भक्तांनीही सद्गुरुंना हीच विनंती केली..त्यावर सद्गुरु गुरुनाथांस बोलले “ अरे कितीही केलं तरी संसार कोणाला चुकला आहे का?? अपत्यांच्या भविष्याची काळजी करावीच लागते..तुलाही तुझा संसार आहे..मुलंबाळं आहेत..नीट विचार कर..”
गुरुनाथ म्हणाले “ महाराज आता सारे आपल्या चरणांसी अर्पण आहे..आपल्या आशिर्वादाच्या छत्रछायेतच माझी मुलं वाढतील मग मला त्यांची कसली आलीय चिंता..”
गुरुनाथांच्या मनीची ही अपार श्रद्धा व आस बघून सद्गुरुंनी त्यांच्या विनंतीला होकार दिला..गुरुनाथांसहित सारे भक्त आनंदले व त्यांनी सद्गुरुंचा जयजयकार केला. “ श्री सद्गुरु काशीनाथ महाराज की जय!!!”
गुरुनाथ आनंदाने बोलले “ महाराज आता लवकरात लवकर जमीन तुमच्या नावे करतो..मंदिर बांधण्यासाठी..”
त्यावर सद्गुरु बोलले “ अरे नको नको माझ्या नावावर.नको...मी आपला विरक्त संन्यासी...आपण मंदीर बांधू तिथे तुझ्या जमीनीत..”
त्यावर लगेच गुरुनाथ बोलले “ महाराज मला जमीन दान करायची आहे..तुमच्या नावावर केली तरच मला त्याचे समाधान मिळेल..”
सद्गुरु म्हणाले “ ठीक आहे आपण जमीन प्रभाकराच्या नावे करु..तसाही तो तुझाच पुतण्या आहे..आणि तुलाही जमीन दान केल्याचे समाधान व पुण्यही लाभेल..”
गुरुनाथांना सद्गुरुंचा हा विचार पटला व त्वरीत होकार देऊन..त्यांनी सद्गुरुंच्या आज्ञेने निरोप घेतला..
मग एक सुमुहुर्त साधून या कायदेशीर प्रक्रियेसाठी तुळजापुरला जायचे ठरते..जी जमीन मंदीरासाठी दान करायची होती ती गुरुनाथांचे जेष्ठ चिरंजीव नागेश यांच्या नावे होती..त्यासमयी ते वयाने लहान असल्यामुळे त्यांच्यासोबत गुरुनाथ व त्यांच्या पत्नी दोघेही शिवाय प्रभाकर व अन्य काही भक्तगण असे सारे तुळजापुरला पोचतात..बरीच गर्दी होती तिथे..एक एक करुन त्यांचा नंबर येतो..त्यांचे सर्व कागदपत्र तपासली जातात..बागायती जमीन असल्यामुळे त्याचे जे मुल्य निर्धारीत असते ते तिथे प्रक्रियेच्या वेळी देण्यास आधिका-याकडून सांगितले जाते..पण मग बाकीचे भक्तगण अधिका-याला सांगतात..ही जमीन दान दिली जात आहे मंदीरासाठी..मुल्य निर्धारीत नाही..पण आधिकारी म्हणतो की हा प्रक्रियेचाच भाग आहे..तुम्हाला ते द्यावेच लागेल..मी कायद्याच्या विरूद्ध जाऊ शकत नाही अन्यथा माझी नौकरी जाईल..
कितीही समजावले तरी तो आधिकारी काही तयार होत नाही..बघता बघता संध्याकाळ होते..आता ग्रामी परतण्यास कोणतेही वाहन नसल्यामुळे या सर्वांकडे एखाद्या धर्मशाळेत मुक्कामाशिवाय पर्यायच उरत नाही..दिवस उजाडताच ग्रामी जाऊ असा विचार करुन सारे तिथेच मुक्काम करतात..ठरल्याप्रमाणे दुस-या दिवशी सकाळी परतण्यासाठी एसटी स्थानकावर येतात..एवढ्यात कचेरीतील कारकून धावत धावत त्यांच्या कडे येतो..व आपल्या वरिष्ठ अधिका-यांनी तातडीने तुम्हा सगळ्यांना बोलावले आहे असा निरोप देतो..सगळे लगबगीने कचेरीत पोचतात..तर तोच कालचा आधिकारी त्यांना म्हणतो “ तुम्ही तुमची नोंदणी करा..आपण प्रक्रियेस सुरवात करु..माझी काहीही हरकत नाही..” सारेच विस्मयचकित होतात..काल काम होऊ शकणार नाही म्हणून अडवणारा अधिकारी..आज स्वतःहून काम करण्यात सांगतो आहे!! कामाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रभाकर त्या आधिका-यास विचारतात..”असे काय झाले की तुमचा विचार बदलला आणि तुम्ही कार्यपूर्तीस संमती दिली??”
तर तो अधिकारी सांगू लागतो..” अहो काल रात्री माझ्या स्वप्नात एक मुनीवर्य आले..भगवी कफनी परिधान केलेले ते यती अत्यंत तेजस्वी होते..पायात खडावा, काखेला झोळी आसा वेश असलेले ते महाराज माझ्यावर अत्यंत कोपायमान झालेले होते..मला म्हणाले..माझे भक्त कामासाठी तुझ्याकडे आले होते आणि तू त्यांची अवहेलना केलीस??ते अत्यंत रागाने बोलत होते.मी त्वरीत त्यांची क्षमा मागितली व म्हणालो...माझ्याकडून चूक घडली मला माफ करा..त्यानंतर ते योगी शांत झाले व म्हणाले..उद्याच तू त्यांचे काम पूर्ण करून घे.. सकाळ उजाडताच.... मी तुमची चौकशी करुन तुम्हाला निरोप धाडला..”
हे ऐकताच सा-यांना कळून चूकले ही तर केवळ महाराजांचीच लीला..भक्ताच्या मनीची आस सद्गुरु कायमच पूरी करतात..धन्य ती सद्गुरुंची आगाध करणी..
आणि मग एका सुमुहुर्तावर मोजणी करुन..एक सुबक चौरसाकृती ओटा तयार केला व आरळी ग्रामी दत्तात्रेयांच्या चरणांची द्वितीय स्थापना पार पडली..समस्त आरळी ग्रामवासी, महाराजांचे भक्तगण व कुलकर्णी कुटुंबीय सर्व सुना लेकींसहित सगळ्यांनी मिळून माघ चतुर्थीचा उत्सव आनंदात व समाधानात पार पाडला..
“ अवधुत चिंतन श्री. गुरुदेव दत्त!!!..श्री.समर्थ सद्गुरु काशीनाथ महाराज की जय!!...”
अनुवाद – सौ. सुजाता कुलकर्णी
खुप सुंदर वर्णन आहे
उत्तर द्याहटवा