श्री. सद्गुरु चरित्रामृत - अध्याय एकोणीस

अध्याय एकोणीस..
सद्गुरु रामवाडीत वास्तव्यास होते, तेंव्हा एके दिवशी सीताराम नावाचे एक सद्गृहस्थ आले..सद्गुरुंची महती त्यांनी ऐकलेली होती..तेंव्हा दर्शनाच्या ओढीने ते आले होते..अंतरी तळमळ दाटलेली होती..योग्य गुरु भेटावा म्हणून ते अनेक ठिकाणी हिंडत होते..आता इथे तरी आपली मनिषा पूर्ण व्हावी व योग्य मार्ग दाखवणा-या गुरुंची भेट व्हावी अशी अपेक्षा ठेवून ते आले होते...ते आश्रमात आले तेंव्हा महाराज स्वहस्ते लिंबाच्या झाडाचे रोप लावत होते..वृक्ष हे आपल्यासाठी जीवनदायी असतात..त्यात हे कडूनिंबाचे झाड तर अत्यंत उपयुक्त असे..सद्गुरु मग्न होऊन हे उत्तम काम करीत होते..हे सीतारामांनी पाहिले..तेंव्हा ते विचार करु लागतात... “हे तर संन्यासी मग हे असे काम करण्याची काय गरज???भगवी वस्त्रे परिधान केली आहेत मग अशा गोष्टींमध्ये अडकण्याची काय गरज??? मी तर यांची महती ऐकून इथवर धावत आलो..एखादा उत्तम गुरु मजला इथे प्राप्त होईल...पण हे सारे पाहून असे वाटते माझी इथेही घोर निराशाच होणार बहुधा..” अशा विचारात ते गढलेले असताना सद्गुरु त्यांना पाहतात व हसून त्यांना म्हणतात... “ या या सीताराम, एवढ्या दूरुन इथवर धावत आला..पण मनीचा संभ्रम काही मिटलेला दिसत नाही अजून तुमच्या..अहो..बारा वर्षे असेच भटकत आहात..ईश्वर शोधात पण अजून काही ज्ञान प्राप्त झाले नाही....मनी असा संभ्रम कायम असेल तर तो भगवंत कसा भेटेल..श्रद्धा ठेवा...”
सद्गुरुंचे हे बोल ऐकून..सीतारामांचे अंतरंग प्रकाशमान होते..ती खूण पटते..आणि ते धावत जाऊन सद्गुरुंच्या चरणावर लोटांगण घेतात.व म्हणतात “ तुम्ही साक्षात त्रयमुर्ती आहात पण मी आपणांस ओळखू शकलो नाही..मनी विकल्प धरिला..मला क्षमा करा महाराज....आतापर्यंतचे माझे आयुष्य व्यर्थ गेले..आता तुम्हीच मला योग्य मार्ग दाखवा..मी अज्ञानी आहे..मज ज्ञानामृत पाजून माझा उद्धार करावा..” असे बोलत ते पुन्हा पुन्हा सद्गुरुंचे पाय धरु लागतात..त्यांच्या मनीचे ते भाव व तळमळ पाहून सद्गुरु प्रसन्न होतात...व त्यांना म्हणतात “ चित्ती शुद्ध भाव असेल तर सर्व कामना पूर्ण होतात...दृढ विश्वास असेल तर अज्ञानी सुद्धा ज्ञानी होतो जसे आडभंग नाथाचे झाले..उत्तम ज्ञान प्राप्त होऊन त्यांचा उद्धार झाला..” सद्गुरुंचे हे बोलणे ऐकून सीताराम महाराजांस विनंती करतात “ महाराज मला ती आडभंगनाथाची कथा ऐकवा..कसा त्यांचा उद्धार झाला हे मला जाणून घ्यायचे आहे..आपण मला त्याचे निरुपण करावे....” सीतारामांच्या विनंतीवरून सद्गुरु सांगू लागतात...संत गोरक्षनाथ एकदा भ्रमण करत करत गोदातटीच्या एका अरण्यात येऊन पोचतात..अत्यंत क्षुधेने ते व्याकुळ झालेले असतात..शोधत शोधत ते एका शेतात येऊन पोचतात...त्या शेताचा कृषीवल..माणिक असे त्याचे नाव असते.दहा वर्षाचा तो सुकुमार नुकताच भोजनास बसलेला असतो..आता मुखात घास घेणार एवढ्यात एका यतीचे काही शब्द त्याच्या कानी पडतात..तो हातातला घास तसाच पात्रात ठेवतो,समोर गोरक्षनाथ भगव्या कफनीमध्ये उभे असतात..त्यांना पाहून तो विचारतो... “महाराज आज आपण इकडे कसे येणे केले??,” त्यावर गोरक्षनाथ म्हणतात... “ मी क्षुधेने अत्यंत व्याकुळ झालो आहे..तुझ्या कडे जे अन्न असेल ते मला दे मी क्षुधाक्रांत आहे...” तो सुकुमार लगेच धावतो व वाढलेले पात्र तसेच त्यांच्या समोर ठेवतो..व पाण्याचा एक कुंभ भरुन त्यांच्या जवळ ठेवतो..क्षुधाक्रांत झालेले गोरक्षनाथ पोटभर जेऊन तृप्त होतात..व आता ते त्या सुकुमारांस त्याचे नाव विचारतात....त्यावर तो म्हणतो..” आता कशाला माझे नाव विचारता..तुम्ही भुकेले होता..तुम्हास अन्न प्राप्त झाले आता नसती उठाठेव कशास हवी..तुमचे काम झाले आता तुम्ही पुढील कार्यास जाऊ शकता...” त्यावर गोरक्षनाथ त्यांस म्हणतात “ मी अत्यंत भुकेला होतो तेंव्हा तू अन्न देऊन मला तृप्त केलेस मी तुझ्यांवर प्रसन्न आहे..सांग तुझी कोणती मनोकामना मी पूरी करु ..तू जे मागशील ते मी तुजला देईन..” त्यावर हसून तो कृषीवल म्हणतो.. “ तुम्ही तर दारोदार भिक्षा मागत हिंडता ..मग तुमच्यासारखा भणंग मला काय देणार..” त्यावर पुन्हा गोरक्षनाथ त्यांस म्हणतात..” तरीही एक दान मी तुज देईनच..तुला काय हवे ते माग.. “ त्यावर परत तो सुकुमार म्हणतो.. “ चल चालू लाग इथून तू काय देणार मला उलट तुलाच काही हवे असेल तर माग मला... “ यावर गोरक्षनाथ विचार करतात, हा अडभंग दिसतो आहे..सरळ सरळ हा काही आता मागणार नाही ....तेंव्हा  आपणच आता यांस काहीतरी मागून याचे हित साधले पाहिजे...असा विचार करुन ते त्या कृषीवलास म्हणतात  “ ठीक आहे आता तू एवढे माग म्हणतो आहेस तर मीच आता एक वचन मागेन ..बघ विचार कर  पुन्हा मागे हटू नकोस...”
त्यावर तो लगेच उत्तरतो “ अहो , एकदा मी सांगितले  की मी आता मागे हटणार नाही..एकदा कुणी काही मागितले की आम्ही काहीही करुन , आणि कसेही ते पुरवतोच..त्यात कंजुषपणा कधीच करणार नाही ...हाच आमचा स्वभाव आणि हेच आमच्यावर संस्कार आहेत...मी यत्किंचितही  मागे हटणार नाही तुम्ही मागा हवे ते”  गोरक्षनाथ मनात विचार करतात आणि म्हणतात  “ ठीक आहे..मग जे तुझ्या मनात येईल ...किंवा जी तुझी मनिषा असेल ते तू करायचे नाही...एवढेच एकमेव वचन तू पाळायचे.” यावर तो कृषीकर्मी बोलतो “ एवढेच ना ठीक आहे..हे वचन मी तुम्हाला देतो..हा धर्म मी आता  पाळणार..” त्याच्या या बोलण्यानंतर गोरक्षनाथ त्या शेतातून पुढे मार्गक्रमण करतात..आता तो माणिक नावाचा कृषीकर्मी शेतात काम करत असतो..थोड्यावेळाने तो वृषभांना मुक्त करतो व औत थांबवतो..व मनात विचार करतो की आता गावाकडे घरी जावे व आपली क्षुधा शांत करावी..एवढ्यात त्याला गोरक्षनाथांना दिलेल्या वचनांचे स्मरण होते..व  जे जे त्याच्या मनात आले होते ते सर्व न करण्याचा तो निर्धार करतो..तो तसाच तिथे जमिनीवर नेत्र बंद करुन उभा राहतो...मनामध्ये तो हरीनाम घेत असतो..काही काळानंतर त्याचे अंग अवघडते व ते हलवावेसे त्याला वाटते..पण तो तेही करत नाही..व वचन पूर्ण  करण्यासाठी तसाच स्थिर उभा राहतो...मग वा-याने काही पानं उडत त्याच्या चेह-यावर उडत येतात..तो त्याचेच भक्षण करुन क्षुधा शांत करतो..पुढच्या वेळीही हेच खावे असे त्याच्या मनात येते..तेंव्हा तो ते ही खाणे टाळतो..फक्त हवेवर तो तसाच दृढ निश्चय ठेवून स्थिर उभा राहतो...असेच दिवस निघून जातात..बारा वर्षानंतर गोरक्षनाथ फिरत फिरत पुन्हा  त्याच भागात पुन्हा येतात तेंव्हा त्यांना माणिकची आठवण येते..ते त्याच्या शेतात येतात..पाहतात तर काय फक्त हाडांचा सापळा असलेली एक व्यक्ती तप करीत स्थिर उभी असते..ते मनोमन प्रसन्न होतात.. व विचार करतात की निश्चय असावा तर असा अडभंगासारखा..व ते त्याच्या समीप जातात व म्हणतात “ आता हे तप करणे पुरे कर..” पण शेवटी तो अडभंग नाथच गोरक्षनाथ जे बोलतील त्याला तो वाकडी उत्तरे  देत असतो..आणि  गोरक्षनाथांस आता लक्षात येते काहीतरी युक्ती  करावीच लागणार ..मग ते म्हणतात.. “ मी आजवर असा मनुष्य प्राणी भूवरी पाहिलेलाच नाही..तुम्ही थोर आहात..एवढी थोर व्यक्ती  माझे गुरु असावेत असे मला वाटते...तेंव्हा मला गुरुपदेश करुन धन्य करावे..”
त्यावर तो हसुन उत्तरतो.. “ एवढा फिरुन आला तरी काही कळत नाही याला म्हणे मला गुरु करा म्हणतो..मग तुच का गुरु होत नाहीस माझा असे म्हणून तो आपला कान गोरक्षनाथांच्या मुखाजवळ नेतो..मग त्या क्षणी ते त्याच्या कानात मंत्र देतात..व त्याला सज्ञान करतात...मंत्र मिळताक्षणी तो अंतरी प्रकाशित  होतो व आपले तप सोडून तात्काळ गोरक्षाच्या चरणावर लोटांगण घेतो..
अडभंगाचे हे चरित्र सीतारामांना सांगून सद्गुरु म्हणतात “ सीताराम मनात कोणताही संभ्रम ठेवू नका..श्री दत्त चरणी लीन व्हा..तयाठायी दृढ भाव ठेवा जीवनाचे कल्याण होईल..” सीताराम सद्गुरुंचे पाय धरतात व म्हणतात “ बारा वर्षे वणवण भटकत होतो..पणा चित्ती समाधान नव्हते...आज आपले दर्शन झाले मी धन्य झालो..अंतरीचा सारा अंधकार मिटला..आता मला आपल्या चरणापासून वेगळे करु नका..आपला वरदहस्त मस्तकी ठेवून मजला अनुग्रहित करावे.” आणि सद्गुरु एका सुमुहुर्तावर गुरुमंत्र देऊन त्यांस अनुग्रहित करतात..पुढे भक्तांच्या अग्रहावरून जेंव्हा मुरुड ग्रामी दत्ताची स्थापना होते..तेंव्हा तिथेच दत्तचरणसेवेत सीताराम निमग्न होतात..धन्य धन्य ते सद्गुरु व धन्य ते त्यांचे परम भक्त..तया चरणी माझे कोटी कोटी प्रणाम..
“ गुरुवीण नाही दुजा आधार..”

“अवधुत चिंतन श्री. गुरुदेव दत्त !!!श्री. समर्थ सद्गुरु काशीनाथ महाराज की जय !!”

अनुवाद – सौ. सुजाता कुलकर्णी

टिप्पण्या