अध्याय दहा
रामवाडी आश्रमात सद्गरु असताना नित्य नामस्मरण होई तसेच श्रमदान व अधात्म या दोन्हींचेही धडे महाराज आपल्या शिष्यगणांना देत होते..जे प्रत्यक्ष सद्गुरुंसोबत श्रमदान करत व ज्यांना सद्गुरुंचा अनमोल सहवास लाभला असे धन्य धन्य ते सारे शिष्य गण..इकडे आरळी ग्रामी माधवराव कुलकर्णी हे कायम दत्त पुजेत मग्न असत..सद्गुरुंनी दाखवलेल्या मार्गावरुन ते चालत होते..त्यांचे कनिष्ठ बंधु गुरुनाथ कुलकर्णी यांनी शिक्षण पूर्ण केले व ते आपल्या ग्रामी आरळीस परतून आले..व आपल्या बंधूस ते शेतीकामात मदत करीत असत..पण त्यांचे मन सद्गुरुचरणी धाव घेत होते..सद्गुरुंकडे जाऊन मठावर काही दिवस राहण्याची इच्छा मनी दाटली होती..एके दिवशी त्यांनी आपल्या वडिल बंधूना हे सांगितले व जाण्यासाठी परवानगी मागितली....आणि त्यांचा होकार मिळताच त्यांनी धावतच रामवाडी गाठली..तिथे पोचताच गुरुनाथानी सद्गुरुंच्या चरणी मस्तक ठेवले..महाराजांनी मायेने त्यांची चौकशी केली...आरळी ग्रामीच्या शिष्यांवर महाराजांची अधिकच माया होती त्यामुळे आरळीहून कोणी आले की महाराज त्यांची आपुलकीने चौकशी करत..आरळीच्या इतर शिष्यांचेही ते ममतेने कुशल विचारत असत..त्यांची ही ममता म्हणजे जणू एखाद्या माहेरवाशीणीचा जसा आपल्या माहेरच्या माणसांवर थोडा अधिकच जीव असतो अगदी तशीच भासे..पूर्वपुण्याई थोर म्हणूनच आरळीच्या शिष्यांना महाराजांच्या हृदयीचे स्थान प्राप्त झाले होते.आहे..आणि कायम असेल.....गुरुनाथांनी पुन्हा एकदा सद्गुरुंना वंदन केले व म्हणाले “ महाराज आता काही दिवस आपल्या चरणी राहून सेवा करण्याची इच्छा आहे....आपल्या छत्र छायेत राहीन..व आपण सांगाल ती सेवा करीन..आपण मला इथे राहण्यास अनुमती द्यावी.. “
गुरुनाथांच्या मनीचे हे दृढभाव ओळखून महाराजांनीही त्यांना राहण्यास अनुमती दिली व सांगितले कि इथे राहायचे असेल तर श्रमदान करावेच लागेल नित्य भगवंताच्या नामस्मरणासोबत शेतीत कष्टही करावे लागतील..गुरुनाथांनी लगेच होकार दिला....आणि मग गुरुनाथांचा दिनक्रम सुरु झाला..पहाटे उठून..ते शीतल पाण्याने स्नान करुन आपले नित्य कर्म आचरत असत व त्यानंतर सद्गुरु समवेत शेतीतील मशागतीची कामं ते पूर्ण करीत असत..सद्गुरु स्वतः सगळ्यांसोबत शेतीची कामं करीत असत..ज्यांची गुरुमाऊली अशी कष्टत होती..त्यांचा शिष्यवर्ग तर कष्ट करणारच..सद्गुरुंसोबत काम करताना एक वेगळी उर्जा त्यांना प्राप्त होती..सद्गुरु मातेप्रमाणे हाताला धरुन आपल्या शिष्यांना हे कष्टाचे धडे शिकवत असत..कष्टाची भाकरी कशी गोड लागते हे प्रात्यक्षिकातूनच जणू सांगत होते..आणि मग माध्यान्ही या सा-या शिष्यांना घेऊनच ते भोजन करीत असत..इतर शिष्यांप्रमाणे गुरुनाथही सद्गुरु समवेत भोजन करीत असत..क्षणोक्षणी सद्गुरुंचा सहवास लाभत असल्यामुळे ते मनोमन आनंदी होते...पहाटेपासून शेतीत कष्ट केल्यामुळे दुपारचे हे सद्गुरुंसमवेत भोजन त्यांना अत्यंत रुचकर लागे..प्रत्येक पदार्थाचा ते अस्वाद घेत असत..परंतु ते पाहत होते पात्रात काही वाढले भाजी, भाकरी वरण तरी सद्गुरु त्या सा-याचा एकत्रितच काला करीत व त्यात थोडे जल घालून सारे एकजीव करुन मग ते अन्न सेवन करीत असत..सद्गुरुंचे हे असे भोजन ते नित्यच पाहत होते..काहीही असो अन्न सेवनाची ही एकच पद्धत..हे पाहून कित्येकदा गुरुनाथांच्या मनात येत असे..सद्गुरु हे असे सेवन का करतात..पात्रीचा प्रत्येक पदार्थ निराळा त्याची रुची निराळी मग सगळे एकत्रितच का करतात??शिवाय त्यात भरीस थोडे जलही मग काय रुची राहत असेल त्या अन्नास..एकदा धैर्याने गुरुनाथांनी सद्गुरुंना विचारलेच “ महाराज हे असे जलयुक्त अन्न काला करुन का सेवन करीता???, त्यास कशी चव राहील आणि मग असे अन्न खाऊन आपल्या भुकेचे निवारण कसे होते ??”
सद्गुरुंनी हसून त्यास उत्तर दिले “ अरे गुरु, या कलीयुगी अन्नमय प्राण आहे..म्हणून भोजन करावे लागते पण भोजन हे जगण्यासाठी करावे..भोजनासाठी जगू नये..नित्य विविध रुची जर रसनेस पुरवल्या तर..रसना समाधानी राहत नाही तिला नित्य निरनिराळ्या चवीची ओढ लागते आणि तिचे चोचले जर आपण पुरवत गेलो तर इंद्रियदमन कसे होणार..ही इंद्रिये मग आपल्या ताब्यात नाही राहणार..आणि इंद्रिये मोकाट सुटली की ते रोगांना आमंत्रण देणारच..तेंव्हा भूक शमन करण्यासाठी आवश्य भोजन करावे पण रसनेचे चोचले पूरवू नयेत..अन्यथा मन एकाग्र होणार नाही..नित्य एकच चव अनुभवली की रसनाही अन्य काही मागणार नाही..म्हणून मी हे असे जलयुक्त अन्न प्राशन करतो..पण हेही तितकेच रुचकर लागते बघ तूच” असे म्हणून महाराजांनी आपल्या पानांतील एक घास गुरुनाथांना दिला..व खाण्यास सांगितले..सद्गुरुंच्या पानातील घास म्हणजे भगवंताचा प्रसादच तो..त्याच्या पुढे अमृताची गोडी ही फिकी पडावी एवढी मधुर चव त्यास होती..आणि अशी चव गुरुनाथांनी अद्याप चाखली नव्हती..आणि मग त्या चवीच्या ओढीने दुसरे दिवशी गुरुनाथांनीही अगदी तसेच केले, महाराजांसारखे जल ओतून काला तयार केला व ते अन्न प्राशन केले..पण प्रथम घासातच त्यांच्या लक्षात आले ते अन्न अत्यंत पांचट लागत होते..ती मधुर चव यांस नव्हती....गुरुनाथाच्या चेह-यावरील भाव पाहून सद्गुरु हसले व म्हणाले “ अरे तुला असे अन्न गोड लागणार नाही तु आपला नित्याप्रमाणे भोजन कर..मी संन्यस्थ वृत्तीचा आहे हे सारे माझ्यासाठी ठीक..तू आपला व्यवस्थित अस्वाद घेऊन भोजन कर..” आणि महाराजांनी गुरुनाथासाठी दुसरे पात्र मागवले..असा सद्गुरुंचा अगाध महिमा..गुरुनाथ आता रामवाडी मठावर छान रमले होते....काही दिवसांतच दत्तजयंती आली..सद्गुरु दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत असत..त्यासाठी अनेक भाविक भक्त दुरुन येत असत..यावेळेसही सारी तयारी मोठ्या उत्साहात सारे करत होते..रात्री किर्तनासाठी स्वतः महाराज उभे राहिले..आपल्या गुरुंना वंदन करुन त्यांनी दत्त जन्माचे निरुपण सांगण्यास सुरवात केली...ज्या ब्रह्माने ही सारी सृष्टी रचिली त्यांस सात पुत्र होते दक्ष. मरिची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, वशिष्ठ, पुलहस्तु यातील अत्री ऋषींपासून दत्तगुरु पीठाची सुरुवात झाली..त्यांच्या पत्नीचे नाव अनुसुया..जी अतिशय रुपवान होती..तसेच ती दृढ पतीव्रता होते..ती मनोभावे पतीची सेवा करीत असे..तिच्या ठायी वसलेला दृढ पतीव्रता भाव यामुळे सारेच भयभीत होत होते..कारण त्याचे तेज अपार होते..तिची विनयशीलता, सात्विकता यामुळे ती सा-या सृष्टीवर राज्य करेल अशी भिती इंद्रासहित सगळ्यांनाच वाटत होती..यावर काहीतरी उपाय करणे आवश्यक होते म्हणून इंद्र व सारे सुरवर ब्रह्मा, विष्णु व महेश या त्रयमुर्तीकडे जातात..मुळात अत्री ऋषी हे कठोर योगसाधना करणारे तेजस्वी तपस्वी होते व त्यांची पतीव्रता स्त्री अनुसुया ही कठोर तपस्वी होती..प्रखर पातीव्रत्याचा भाव तिच्या ठायी होता..तिच्या या तेजापुढे आप, तेज, जल, वायू, पृथ्वी सारेच भयभीत होत होते..तिचे तेज या सा-यांना झाकोळत होते..आणि म्हणून ती या चराचरात सर्वोच्च स्थान प्राप्त करेल असेच वाटून सारे देव सुरवर यांना असुरक्षित वाटत होते..याचे निराकरण करण्यासाठीच ते त्रयमुर्तींकडे गेले होते..अनुसुयेची महती ऐकून तिन्ही देव आचंबित होतात..एवढी तेजस्वी स्त्री भूतलावर आहे याचे त्यांना आश्चर्यच वाटते..आता त्या स्त्रीचे पातिव्रत्य भंग करावेच लागेल असा विचार करुन ते तिघेही भिक्षुकाचे रुप घेऊन अत्री ऋषीच्या आश्रमी पोचतात..त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी गेलेले असतात...व अनुसुया माता एकट्याच आश्रमात असतात..त्यांना पाहून तिन्ही देव म्हणतात आम्हाला खूप भूक लागलेली आहे..तेंव्हा त्वरेने आम्हांस भोजन वाढ..तुम्ही इच्छा भोजन देता असे ऐकले म्हणूनच तुमच्या दारी आलो तेंव्हा त्वरेने आमची क्षुधा निवारण करा..त्यांचे बोलणे ऐकून अनुसुयेने त्यांना पाटावर बसवले व ताटात नानाविध अन्नपदार्थ वाढले व त्यांच्यासमोर ठेवले..राहिलेले वाढणार एवढ्यात ते म्हणतात “ हे ललने, तुझ्या सौंदर्याची ख्याती ऐकून आम्ही इथवर आलो तेंव्हा तू आम्हास नग्न होऊन अन्न वाढावे अशी आमची इच्छा आहे..तुझा नकार असेल तर आम्ही उपाशीपोटीच इथून जाऊ व विप्र उपाशी जाण्याचे पातक तुझ्या माथी लागेल तेंव्हा सांग..काय करायचे?? त्यांचे ते बोलणे ऐकून क्षणभर अनुसुया गोंधळते..पण पुढच्याच क्षणी ती विचार करते हा माझ्या परिक्षेचा क्षण आहे..माझे मन निर्मळ आहे..व माझ्या पाठीशी माझ्या पतीचे तपोफळ आहे...तेच मला या विवंचनेतून तारेल..असा विचार करुन ती तिन्ही देवांना नग्न वाढण्यास होकार देते.......स्वयंपाक गृहात जाऊन मनोमन पतीच्या चरणाचे चिंतन करते व आपले वस्त्र काढून अन्न घेऊनबाहेर येते..बाहेर येऊन पाहते तर तर तिन्ही भिक्षुकांच्या ठिकाणी तीन बाळे खेळत असतात...ती त्वरेने पुन्हा वस्त्र घालून तिन्ही बाळांना स्तनपान करवून त्यांची क्षुधा निवारण करते....त्या पतिव्रतेचे महात्म्य एवढे होते की तिच्यासाठी तिन्ही देवांना बाळ व्हावे लागते....माध्यान्ही अत्री ऋषी अनुष्ठान अटोपून अश्रमात येतात पाहतात तर तिथे तिन्ही बाळे खेळत असतात..ते दृश्य पाहून ते विस्मयचकित होतात व अनुसुयेला विचारतात तेंव्हा त्यांना सारा वृत्तांत कळतो..त्यांच्या ज्ञानी दृष्टीला हे कळते की ते तिन्ही देवच आहेत...तेवढ्यात बाळे पाळण्यातच राहतात व तिन्ही देव ब्रह्मा, विष्णु, व महेश तिथे साक्षात प्रकटतात..धन्य ती अनुसुया माता....आणि तिन्ही तत्व एकवटलेला त्यांचा हा सुत म्हणजेच दत्तात्रेय...जी साक्षात तिन्ही देवांची माता झाली त्या अनुसुया मातेच्या चरणी साष्टांग दंडवत...
एवढे सांगून महाराज आपले निरुपण संपवतात..दुसरे दिनी दत्तमुर्तीस पालखीत घालून सा-या ग्रामात मिरवणूक काढली जाते, काला फोडून महाप्रसाद करुन दत्तजन्माचा उत्सव अतीव आनंदात सारे भक्तगण साजरा करतात..सारा आसमंत भक्तीमय झालेला असतो.....
” अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त !!श्री. समर्थ सद्गुरु काशीनाथ महाराज की जय !!”
अनुवाद – सौ. सुजाता कुलकर्णी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा