श्री. सद्गुरु चरित्रामृत - अध्याय नऊ

अध्याय नऊ...
जे मंदीर महाराजांनी स्वप्नात पाहिले होते..त्या नृसिंह मंदिरी महाराज पोचले...अतिशय रम्य व शांत असणारे ते मंदिर महाराजांना अनुष्ठानास योग्य असेच वाटले..व तेथे येऊन सद्गुरुंनी अनुष्ठान केले..पुढे श्रावण महिन्यातही पूर्ण महिना अनुष्ठान करण्याचे महाराजांनी योजिले...सद्गुरु नृसिंह मंदिरी असता..कुमुदराजे तेथेही दर्शनास येत असत..जेंव्हा त्यांना समजले कि महाराज पूर्ण श्रावणमास अनुष्ठानात असतील तेंव्हा त्यांनी त्याकाळात येऊन सेवा करण्याची इच्छा महाराजांकडे व्यक्त केली..आणि महाराजांनी आनंदाने त्यास होकार दिला..महाराजांनी होकार दिल्यामुळे कुमुदराजेंनाही मनोमन आनंद झाला...
आषाढमासाच्या शेवटच्या दिनी रात्री सर्व भक्तगण तल्लीन होऊन भजन किर्तन करत होते..मनोभावे त्यांनी सद्गुरुंचे पुजन केले..तो आनंदसोहळाच न्याराच होता..सद्गुरुचे मुखकमल अत्यंत प्रसन्न भासत होते..जणू प्रत्यक्ष दत्तात्रेयच धरणीवर आवतरले असावेत...पहाटे ब्राह्म मुहुर्ती सा-यांनी महाआरती केली..प्रसाद वाटप झाले..आणि महाराज अनुष्ठानास बसले..पूर्ण श्रावणमास ते एकांतात अनुष्ठान करत..केवळ दत्तचरणी मन एकवटून ते त्या काळात योगमुद्रेत असत..दररोज रात्रौ बारा वाजता उठून सचैल स्नान करुन केवळ एक वाटी जल ते प्राशन करीत असत..मग पुजा आरती करुन ते पुन्हा पद्मासनात ध्यानस्थ होत...सद्गुरु अनुष्ठानात असता नृसिंह मंदीरी अनेक भक्तगण येत..तेथेच राहून काहीजण सेवा देत असत.. माध्यान्ही सारे भक्तगण विसावलेले असता..कुमुदराजे त्यांना सद्गुरुंच्या अनेक कथा सांगून सद्गुरु महिमा वर्णन करीत असत..आणि तेही सारे कानात प्राण आणून सद्गुरु महिमा श्रवण करत.. एकदा सद्गुरु धाराशीव ग्रामी असतानाची गोष्ट कुमुदराजेंनी सांगितली....महाराज नेहमीप्रमाणेच आपल्या भक्तमंडळींना प्रपंच व परमार्थ याचे निरुपणा करुन उपदेश करीत होते..नाममहिमा सांगत होते..सारे भक्तगण तल्लीन होऊन सद्गुरुंचे निरुपण ऐकत होते..तेवढ्यात तेथे यवन लोक आले..तेंव्हा निजामाचे राज्य होते..सारीकडे त्यांचीच हुकुमशाही चाले..हे यवन लोक आले व त्यांनी ताबडतोब किर्तन बंद करण्यास सद्गुरुंना सांगितले..व ते सद्गुरुंना म्हणाले  “ हे ईश्वराला भजणे ताबडतोब थांबवा..असा आमच्या सुलतानाचा आदेश आहे..केवळ अल्लाचे नामस्मरण करा..बाकी हे सारे व्यर्थ आहे...केवळ भगवी कफानी घालून काहीच साधत नाही...तुम्ही कधीतरी कुराण पढले आहे का??आणि विनकारण ही आळवणी करता....”
त्याचे ते बोल ऐकून हसून सद्गुरु त्यास म्हणाले “ आम्ही कुराण पढले नाही..परंतु काय आहे असे कुराणात ते तुम्ही तरी आम्हाला सांगा..आम्हालाही ऐकायचे आहे कुराण..सा-या धर्माचे शास्त्र पुराण आम्हास प्रिय आहे...आम्हाला ते ऐकावयास आवडेलच..तेव्हा आपणच आम्हाला कुराण कथन करा..”
सद्गुरुंचे हे बोल ऐकून तो यवन रझाकार विस्मीत झाला..त्याला तरी कुठे कुराण ठाऊक होते...तो केवळ निजामाचा एक सेवक..तो सांगेल तसे वागायचे एवढेच त्यास माहित होते..त्यामुळे सारे स्तब्ध होऊन सद्गुरु सन्मुख उभे होते..ते मौन झालेले पाहून सद्गुरुंनी स्वतःच कुराण कथन करण्यास सुरवात केली..त्यातील प्रत्येक कवन सांगून ते त्याचा अर्थ सगळ्या भक्त गणांना सांगू लागले...शेवटी धर्म कोणताही असो...तो ईश्वर सा-या ठायीच वसलेला..त्याची शिकवण सा-यांना सारखीच..मानव त्यांच्यात भेद करतो..आणि आपल्या सोयीनुसार त्याला रुप देतो..जसा आपल्या मनी भाव तसाच देव आपल्याला भासतो..सा-या चराचरात एकच शक्ती आहे..फक्त काहीजण त्याला अल्लाह म्हणतात तर काही जण ईश्वर...कोणी लहान मोठा असे नसते..त्यामुळे कोणताही धर्म लहान किंवा मोठा नाही..सा-यांचा आपण तेवढाच आदर करावा..सद्गुरुंच्या मुखातून हे सारे कथन भक्तगण तल्लीन होऊन ऐकत होते..तसेच ते यवन सेवकही हे सारे ऐकत होते..परंतु त्यांचा अधिकारी बोलला.. “ ते काही नाही आम्हाला वरुन आदेश आहे  तेंव्हा तुम्ही ताबडतोब हे बंद करा..”
सद्गुरुंनी त्याला हसून प्रत्युत्तर केले.. “ आमचे कथन आता पूर्ण झाले आहे...किर्तनही संपले आहे..आम्ही आमच्या स्व स्थानी जातो..पण असे किर्तन अर्धवट बंद करणे योग्य नाही...ज्या निजामाचे सेवक म्हणून तुम्ही मिरवता...ती निजामशाहीच आवघ्या सहा महिन्यात संपुष्टात येईल..आणि सारे मोकळा श्वास घेतील..या भूमीवर तिरंगा फडकेल..”
सद्गुरुंचेच बोल हे व्यर्थ कसे जाणार जसे बोलले अगदी तसेच झाले..आणि ही भारतमाता स्वतंत्र झाली..कुमुदराजेंनी सर्व भक्तांना सांगितले...जे भविष्यमान सद्गुरुंनी वर्तवले अगदी तसेच झाले..ही कथा श्रवण केल्यावर सा-या भक्तांनी महाराजांचा जोरात जयजयकार केला... “ श्री. सद्चितानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय...” श्रावण वद्य अमावस्येच्या रात्री भक्तगण भजन किर्तनात तल्लीन होत असत..अनुष्ठानाचे उद्यापन करुन महाराज पहाटे किर्तनात दाखल होत..त्यांची ती तेजःपुंज काय पाहून भक्तांचे डोळे दिपून जात..योगसाधनेचे तेज त्यांच्या सभोवताली जाणवत असे..मग महाप्रसादाची पर्वणी भक्तांसाठी असे..सारे यथोचित करुन महाराज अनुष्ठानाची सांगता करीत असत..श्रावणमासीचे हे अनुष्ठान संपवून महाराज रामवाडी नजीक एका जागी येऊन राहू लागले..अतिशय ओसाड अशी ती भूमी होती..ते एका कोळ्याचे शेत होते..त्याला काहीसे मुल्य देऊन महाराजांनी ती जागा मठासाठी घेतली..तिथेच कुडाच्या भिंती घेऊन आश्रम स्थापन केला..स्वतः श्रमदान करुन महाराजांनी त्या ओसाड जमिनीत नंदनवन फुलवले..आणि हाच संदेश त्यांनी आपल्या भक्तांनाही दिला..कष्ट करा.. कष्टाची भाकरी केंव्हाही गोडच लागते..असाच त्यांनी लोकांना कष्टार्जित भक्तीमार्ग दाखवला..आता या मठावर काही माता भक्तगणही येऊन राहिल्या होत्या..त्या या सगळ्यांना आनंदाने भोजन बनवून देत असत..सद्गुरु तिथे मुक्कामी असताना दूरुनदूरुन भक्त सद्गुरुंचा महिमा ऐकून येत असत..एकदा एका भक्ताने सद्गुरुला विचारले “ महाराज आपण तर संन्यस्थ आहात..मग हे कष्ट करुन धान्य कोणासाठी पिकवता..आपल्या काखेला झोळी आहे..दोन घरी भिक्षा मागितली तरी होईल..मग हे कष्ट का घेता...”
सद्गुरुंनी हसून त्यास विचारले “ तुम्हाला सुत किती आहेत??,”
त्यावर त्याने सांगितले “ मला दोन सुत, आणि त्यांच्यासाठीच मी रात्रंदिन कष्ट घेतो..”
आता सद्गुरु त्यांस म्हणाले “ तुम्हाला दोनच सुत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही रात्रंदिन कष्ट घेता..मला लाखोनिशी सुत आहेत..मोठ्या मायेने प्रेमाने ते लांबून माझ्या दर्शनासाठी येतात..त्यांची तहान भूक भागवणे माझे कर्तव्य आहे..प्रत्येक वेळी मी झोळी घेऊन भिक्षामागत कसा फिरु..त्या माझ्या भक्तांसाठीच मी हे कष्ट करतो..आपल्या सुखदुःखाची कहाणी सांगण्यास ते माझ्याकडे येतात..” सद्गुरुंचे हे बोल ऐकून तो भक्तही गहिवरला..आपल्या भक्तांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा तो भगवंत धन्यच..
असेच एकदा रात्री सद्गुरु आपल्या भक्तांसमवेत भोजन करत होते..रात्रीची वेळ होती..मठासमोर मोठे प्रांगण होते..परमार्थिक गोष्टी करत चंद्रप्रकाशात सारे भोजन करत होते..तेवढ्यात तिथे एक मोठा भुजंग आला..त्याला पाहून बरेच जण नाग नाग म्हणत आपले भोजन अर्धवट टाकून पळाले..तरीही सद्गुरु शांतपणे भोजन करत होते..पण सारे घाबरुन लांब जाऊन उभे होते..साक्षात अत्रीनंदन ते त्यांच्या ठायी भय कसे असेल..ते शांतपणे भोजन करत होते..त्यांच्याच जवळ वैजनाथ मुरुडकर म्हणून एक भक्त होते..सद्गुरु तिथेच बसलेले पाहून तेही तसेच भोजन करु लागले..भोजन पूर्ण झाले..त्यानंतर सद्गुरु त्या नागांस बोलले “ अरे का माझ्या भक्तांस घाबरवले..सारे भोजन सोडून पळाले आता तू जा आपल्या स्थानी परत..”
सद्गुरुंचे बोल ऐकून नागराज तिथून परतला.. आता सद्गुरुंनी वैजनाथाला विचारले “ काय भोजन झाले का चांगले..”
त्यावर वैजनाथ बोलले “ हो महाराज, आज भाजी अतिशय स्वादिष्ट होती..”
महाराजांनी पुन्हा विचारले “ वा..मग सांग बरं आज कोणती भाजी होती”
वैजनाथ घाबरुन बोलले “ महाराज खरे तर मी खूप घाबरलो होतो..पात्रात काय वाढले होते याकडे माझे लक्षच नव्हते.त्यामुळे काय जेवलो मज आता ठाऊक नाही “
सद्गुरु हसून त्यास म्हणाले “ बरोबर, तुझे लक्ष भोजनकडे नव्हतेच..तुझे लक्ष त्या सर्पाकडे होते..तुझे मन बुद्धी स्थिर नव्हती..तुझ्या ध्यानी केवळ सर्पच होता..म्हणूनच पात्रात काय वाढले तुला आठवत नाही..असेच दृढ अंतःकरण भगवंत चरणी असावे...मन बुद्धी स्थिर करुन केवळ भगवंतालाच स्मरावे..जेंव्हा तुम्ही भगवंत चरणी लीन होत तेंव्हा सा- या प्रपंचाचा विसर पडतो..आपल्या सद्गुरु चरणी कायम दृढ श्रद्धा ठेवावी..जो काया वाचा मने सद्गुरुस शरण जातो त्यांस मृत्यू भय उरत नाही”..अशाच लहान लहान गोष्टीतून महाराज आपल्या भक्तांना जीवनाचे सार समजावत असत...

“अवधुत चिंतन श्री. गुरुदेव दत्त!!!श्री. समर्थ सद्गुरु काशीनाथ महाराज की जय!!!”

अनुवाद – सौ. सुजाता कुलकर्णी

टिप्पण्या