श्री. सद्गुरु चरित्रामृत - अध्याय वीस

अध्याय वीस..
सद्गुरुंनी आपल्या भक्तांना कायम कष्टाचे महत्व पटवून दिले..स्वतःकष्ट करुन त्यांनी हा मार्ग आपल्या भक्तांना दाविला..आधी प्रपंच नेटका करा, उत्तम कर्म करा, मनी सद्विचार ठेवा..असा उपदेश ते कायमच आपल्या भक्तांना करत आले..अनेक दाखले देत त्यांना ते उत्तम प्रकारे पटवूनही दिले..
एकोणीसशे सत्त्याहत्तर सालात श्रावणमासात उद्यापन करुन श्री. सद्गुरु आपल्या काही भक्तगणांसोबत काशीयात्रेस निघतात..त्यात श्री प्रभाकर कुलकर्णी , श्री.दिगंबर मास्तर, श्री. शंकरराव बचाटे आदि भक्तगण मंडळी होती..रेल्वेने प्रवास करुन हे सारेजण खांडवा रेल्वेस्थानकात पोचतात..जवळच्या एका धर्मशाळेत मुक्काम करुन..दुसरे दिवशी ओंकारेश्वराच्या दर्शनास जाण्याचे ठरवितात..प्रातःकाळी उठून पुढील प्रवासासाठी एखादे वाहन करण्याचे ठरवितात..सारे ठरवून निघेपर्यंत दुपारचे तीन वाजतात..आणि सारे जण पुढील ठिकाणांस प्रस्थान करतात..पण थोड्यांच वेळात मेघगर्जनेसह मुसळधार पावसास सुरवात होते..सगळीकडे पाणीच पाणी होते..विजांचा कडकडाट होत असतो..मग भक्त मंडळी कुठेतरी एखादे स्थान पाहून थांबायचे ठरवत असतात..पण श्री. सद्गुरु त्यांना तसे करण्यास परवानगी देत नाहीत..व सत्वर पुढे चलण्यास सांगतात..पण तरीही रस्त्यात एका नदीला पूर आलेला असतो..मग वाहन बाजूला घेण्याशिवाय दुसरा मार्गच नसतो..नदीला महाभयंकर पूर आलेला असतो...रस्त्याच्या दुतर्फा पाण्याचे लोट वाहत असतात..सारे जण चिंतीत असतात...वरुणाने पुरते थैमान घातलेले असते..सगळ्यांना असे घाबरुन बसलेले पाहून सद्गुरु भक्त प्रभाकरांना म्हणतात “ प्रभाकर, इथून जवळच एक छोटे गाव आहे..तिथून दुध घेऊन ये..पावसामुळे सगळीकडे गारवा पसरला आहे..चहा घेतला की सा-यांनाच बरे वाटेल ..चहाचे सारे साहित्य आहे फक्त दुध शिल्लक नाही तेवढे दुध लवकर घेऊन ये..सोबतीला अजून कोणाला तरी घे..”
गुरु आज्ञा शिरोधार्य मानून प्रभाकर आपल्या सोबत अजून एक दोघांना घेतात..व दुध आणण्यासाठी बाहेर पडतात....कुठल्याही कठीण काळात श्री. सद्गुरुच तारणहार आहेत असा मनी दृढभाव ठेवून ते निशंक मनाने पावसातच जाऊ लागतात..पुढे पाहिले तर सगळीकडे पाणीच पाणी भरलेले असते..नदीपार करण्यास वाटच दिसत नव्हती..तिथे असलेले काही लोक त्यांना सांगतात नदीत भरपूर पाणी आहे आणि पाण्याला ओढही फार आहे..तेंव्हा चुकूनही पाण्यात जाऊ नका..ते धोकादायक असेल..काय करावे हे प्रभाकर व भक्त गण यांना समजतच नाही..समोर हा असा धोका दिसत आहे पण रिक्तहस्ते तरी कसे जायचे सद्गुरुंची आज्ञा आहे..त्यांच्या आज्ञेचे अवहेलन कसे करायचे....काय करावे कळतच नसते मग मनातल्या मनात  सद्गुरुंचा धावा ते करतात म्हणतात “ महाराज आता या संकटकाळी तुम्हीच मार्ग दाखवा..तुम्हीच आता आमुचे तारणहार आहात..ही नदी कशी पार करायची ते तुम्हीच सांगा..” 
मनोमन ते सारे जण सद्गुरुंचे स्मरण करीत असतात एवढ्यात तिथे एक वृद्ध गृहस्थ येतात व जवळ येऊन ते भक्तगणांना कोणत्या कारणासाठी ते इथे आले असे विचारतात..भक्तगण त्यांना सारे सविस्तर सांगतात..तेंव्हा ते गृहस्थ म्हणतात “ या मी तुम्हाला मार्ग दाखवतो.”.जिकडे थोडे पाणी कमी आहे अश्या बाजूने ते या सा-यांना घेऊन जातात व नदीपार करुन देतात..नदीपार होताच ते गृहस्थ गुप्त होतात..सा-यांच्या लक्षात येते ही लीला केवळ सद्गुरुंचीच आहे.. सारे जोरात सद्गुरुंचा जयजयकार करतात..मग त्वरेने गावात जाऊन दुध घेतात व सोबत केळीही घेतात..व परतून पुन्हा नदीकिनारी येतात , आताही नदीला तेवढेच पाणी असते पण आता सारे न घाबरता एकमेकांचा हात धरुन सद्गुरुंचा जयजयकार करीत नदी पार करतात..गेल्या गेल्या सद्गुरु त्यांना काळजीने विचारतात “ किती उशीर केलात ?? मला चिंता लागून राहिली होती.पाऊस मुसळधार बरसत होता..नदीलाही पाणी होते परतून यायचे ना...पण..सुखरुपपणे आलात दत्तकृपाच आहे... चला आता चहाचे आदण ठेवा सारे खोळंबले आहेत ...”
मग भक्तगण स्टोव्ह काढतात..पण पाहतात तर काय त्यात थेंबभरही रॉकेल नसते..भक्तगण  सद्गुरु सन्मुख येतात व म्हणतात “ महाराज क्षमा करा आधी पाहिले नाही पण स्टोव्ह मध्ये थेंबभरही रॉकेल नाही..आम्ही पुन्हा गावात जाऊन रॉकेल घेऊन येतो..रॉकेलच नाही तर स्टोव्ह कसा पेटेल ??????” पण सद्गुरु त्यांना म्हणतात “ आता पुन्हा नका जाऊ गावात..पाणी ओता त्यात पेटेल तो..” सारे विस्मयचकित होतात..जल घालून स्टोव्ह कसा पेटेल पण तरीही सद्गुरु सांगतील तसे ते करतात आणि काय आश्चर्य स्टोव्ह चांगला व्यवस्थित प्रज्वलित होतो..
जे प्रत्यक्ष अत्रीनंदनाचा अवतार आहेत त्यांना कुठली गोष्ट कठीण वाटेल..धन्य धन्य ते सद्गुरु...
मग सद्गुरु भक्तगणांना म्हणतात..” मागे पुढे अनेक लोकं अडकून पडली आहेत सा- यांना चहा केळी नेऊन द्या” सद्गुरुंची अशी सर्वांप्रती काळजी पाहून सारे भक्तगण सद्गदित होतात..
त्यानंतर सद्गुरु टेंपो मध्ये बसून ईश्वरांस अवाहन करतात “ हे ईश्वरा तुझ्या दर्शनासाठी माझ्या भक्तगणांना घेऊन येत आहे..आता तुझे हे वरुणराजाचे तांडव थांबव व आम्हाला वाट मोकळी करुन दे ..” विजेचा कडकडाट होतो आणि त्या प्रकाशात सा –यांना सद्गुरुंच्या दैदिप्यमान मुखाचे दर्शन होते..सारे जोरात सद्गुरुंचा जयजयकार करतात..आणि हळूहळू..पाऊस ओसरु लागतो..पुढे गेल्यावर कळते की ओंकारेश्वर येथील रेल्वे स्टेशन पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे..व तेथे अपघात होऊन सारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे..तेंव्हा सा-यांना सद्गुरुंच्या शब्दांची आठवण येते आपण आपल्या  वाहनानेच जाऊ असे सद्गुरु बोलले होते..ओंकारेश्वरला पोचल्यावर सारे मनोभावे दर्शन करतात व पुन्हा परतून खांडवा ग्रामी येतात..व तिथून पुढे वाराणशीला प्रस्थान करतात...धर्मशाळेत मुक्काम करुन प्रातःकाळी सारे विश्वेश्वराचे दर्शन घेतात.पुन्हा दुसरे दिवशी काही भक्तगण विश्वेश्वराच्या दर्शनास जातात..व दर्शन घेऊन सभामंडपात दोन क्षण विसावलेले असतात एवढ्यात एक संन्यासी हातात त्रिशुळ घेऊन त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून येतो आणि कोपायमान होऊन म्हणतो.. “ प्रत्यक्ष भगवंत सोडून इथे कशाला येऊन बसला??” ते पाहून भक्तगण भयभीत होऊन धावतच धर्मशाळेकडे येतात..त्यांना धावत आलेले पाहून सद्गुरु हसून म्हणतात “ त्रिशुळाचा मार बसला वाटतं..” भक्तगण धावत जाऊन सद्गुरु चरणी लोटांगण घेतात..व म्हणतात “ तुम्हीच आमचे काशी विश्वेश्वर आणि तुम्हीच आमचे भगवंत..आता या चरणापाशीच आमुची सेवा..आपणच आमचे तारणहार आहात”

“ अवधुत चिंतन श्री. गुरुदेव दत्त!!! श्री. समर्थ सद्गुरु काशीनाथ महाराज की जय!!!”

अनुवाद – सौ. सुजाता कुलकर्णी

टिप्पण्या