श्री. सद्गुरु चरित्रामृत - अध्याय पंधरा

अध्याय पंधरा....
प्रारंभीच्या काळत जेंव्हा महाराज रामवाडीच्या आश्रमात वास्तव्यास होते..तेंव्हा मठावर फारसे साहित्यही उपलब्ध नव्हते..पण महाराजांच्या सेवेत असणारे अनेक शिष्य त्यातच आनंदाने राहत होते..जिथे साक्षात भगवंताचा सहवास उपलब्ध होता..तिथे हे ऐहिकाचे चोचले कशाला आठवतील..जेवणास ताट, वाटीही पुरेसे नव्हती त्यामुळे सर्वजण जेवणाचे पात्र म्हणून एरंडाचे पानच घेत असत व भोजनास बसलेल्या ठिकाणी जमीन खोल करुन त्यात पान ठेवून ते वाटीसारखे भाजीसाठी करायचे..व एखादा पत्र्याचा डबा किंवा मातीचे खापर पाणी पिण्यास वापरले जायचे..पण महाराजांसमवेत श्रम करुन थकलेल्या शिष्यवर्गाला हीच कष्टाची आमटी भाकरी गोड लागायची..आणि त्यातच ते अत्यंत समाधानी असायचे..महाराजांसोबत त्यांच्याच पंक्तीला बसून भोजनाचा आनंद काही निराळाच होता..
त्यावेळी महाराजांच्या दर्शनास अनेक भक्त येत असत..एकदा माहूरगडावरुन काही साधू सद्गुरुंच्या दर्शनास आले...सद्गुरुंची ख्याती त्यांच्यापर्यंत पोचली होती आणि म्हणूनच दर्शनाच्या ओढीने ते एवढ्या लांब आले होते..साधारण पंचवीस ते तीस लोकांचा समुह होता तो....त्यांनी सद्गुरुंचे दर्शन घेतले व म्हणाले..” आपल्या दर्शनाच्या ओढीने एवढ्या लांबून आम्ही आलो आहोत..आणि क्षुधेने व्याकुळ आहोत व आपल्या आश्रमात भोजनाची इच्छा आहे..शिवाय प्रसाद म्हणून पंचपक्वानाच्या भोजनाची आस मनी आहे...तेंव्हा क्षुधातृप्तीसाठी लाडूभोजन आम्हा सर्वांना द्यावे ही विनंती आहे..आपण कृपाळू आहात आमची एवढी मनिषा पूर्ण करा..” त्यावर सद्गुरु बोलले “ आतिथी देवो भव..या उक्तीप्रमाणे या आश्रमात आतिथींचे कायमच स्वागत आहे..आपली इच्छा नक्कीच यथोचित पूर्ण होईल..आपण आपले स्नानादी कर्मे उरकून भोजनास सज्ज व्हा..”
महाराजांच्या बोलण्यावर साधूंनी आश्रमाबाहेर एक तंबू ठोकला व आपली कर्मे उरकण्यास ते गेले..
इकडे मठावरील भक्तवर्ग चिंतीत झाला..आश्रमात फारसे धान्यही शिल्लक नव्हते..२५ ते ३० लोकांना पक्वानाचे भोजन द्यावे एवढी भोजनसामुग्रीही शिल्लक नव्हती..एकीकडे वाटत होते की महाराजांनी स्वतः क्षुधातृप्तीचे वचन दिले आहे म्हणजे तेच या सा-यातून मार्ग काढतील ..तेच तारणहार आहेत हे माहित होते पण वेडे मन कधीतरी भयभीत होते..एवढ्यात सद्गुरुंनी भोजन बनवणा-या मातांना बोलावले व लाडू भोजनास लागणारे सारे साहित्य पर्णकुटीतून काढून दिले व त्वरेने भोजन बनवण्यास सुरवात करा असे सांगितले..हे पाहून सारे भक्तगण विस्मीत झाले..काहीही धान्य शिल्लक नसतानाही सद्गुरुंनी सारे साहित्य पर्णकुटीतून काढून दिले होते..सद्गुरुंचा जयजयकार करुन सारे तयारीस लागतात..सर्व साधूही मिष्ठान्न भोजनाने तृप्त होतात..तेही विस्मयचकित होतात..आश्रमात तर कुठेच एवढे धान्य व इतर सामुग्री दिसत नाही तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर मिष्ठान्न भोजन कसे बनवले..उत्सुकतेने ते सारी पर्णकुटी फिरुन बघतात पण कुठेच त्यांना काही दिसत नाही...शेवटी न राहवून ते सद्गुरुस विचारतात “ महाराज आश्रमात कुठेच आम्हाला विपुल प्रमाणात धन धान्य दिसले नाही मग..आम्हा सा-यांना मिष्ठान्न देऊन तृप्त कसे केले..” सद्गुरु हसून म्हणतात..माझे गुरु श्री. यल्लालिंगस्वामी कायम माझ्या पाठीशी असतात..मी मनोभावे त्यांचे स्मरण केले..आणि त्यांनीच मला हे सारे पुरवले..आपल्याला दिलेल्या वचनाची पूर्ती व्हावी म्हणून ते माझ्या मदतीस धावले व त्यांनी माझा मानस पूर्ण केला...नेहमी आपल्या गुरुचरणी दृढभाव ठेवावा..मनी विश्वास असू द्यावा व नेहमी जाणून असावे की आपल्या समवेत आपले सद्गुरु कायम असतात..अंतःकरणापासून त्यांना हाक दिली की शिष्याच्या मदतीस ते धावतात “
सद्गुरुंचे हे बोलणे ऐकून साधू सद्गुरुंच्या पायावर लोटांगण घेतात व म्हणतात “ आपण धन्य आहात..आपला महिमा अगाध आहे..” 
यावर सद्गुरु आत्मज्ञान सांगतात “ जो आपल्या सद्गुरुंच्या वचनाची अवहेलना करेल तो देवक्षोभास पात्र होईल..आणि त्याच्या चित्ती कदापि समाधान लाभणार नाही...एखाद्याच्या घरी अचानक विघ्ने येऊ लागली, एखाद्या गोष्टीसाठी धन व्यवस्थित ठेवले पण योग्य वेळी ते मिळत नसेल, कितीही प्रयत्न केला तरी कार्य सिद्धी होत नसेल, अशा सर्व विपरीत परिस्थितीचे कारण केवळ देवक्षोभच समजावा..आणि याचे मुळ आहे गुरुआज्ञा ज्याचे उल्लंघन केल्यासच केवळ देवक्षोभ होतो..तेंव्हा आपल्या सद्गुरु चरणी दृढभाव असू द्यावा..तेंव्हाच चित्तास समाधान प्राप्त होते व समस्त कामना पूर्ती होते..सद्गुरुंनी निरुपणातून सा-या गोष्टी नीट समजावून सांगितल्या..समाप्तीनंतर सा-यांनी सद्गुरुंचा जयजयकार केला..साधूही तृप्त व समाधानी होऊन आपल्या इच्छित स्थळी परतले..ज्या ज्या शिष्यांना सद्गुरुंचा प्रत्यक्ष सहवास लाभला व प्रत्यक्ष त्यांच्या मुखातून असे निरुपण ऐकले ते सारे शिष्यगण धन्य धन्य होय..
एकदा सारे शिष्य सद्गुरुंस म्हणतात “ महाराज चला पंढरपुरास जाऊ..तेथे जाऊन विठूरायाचे दर्शन घेऊ..सारे म्हणतात जन्मा येऊनी एकदातरी, पहावी विठूरायाची पंढरी “
सद्गुरुंनी लगेच होकार दिला..मातेसमान आपल्या शिष्यांचा हट्ट पूरी करणारी धन्य ती गुरुमाऊली..मग सगळेच पंढरीस जाण्यास निघतात सोबत नेहमी बुधवारी दर्शनास येणारी काही भक्त मंडळीही होती..श्री.बागल, श्री. देवकते ही मंडळी कायम बुधवारी सद्गुरुंच्या दर्शनास येत असत..त्यातच आरळीचे प्रभाकर कुलकर्णी  हे ही होते..यथासांग विठूरायाचे दर्शन करुन सर्व भक्तमंडळी व सद्गुरु आश्रमी परतत असतात वाटेत बार्शी ग्रामी ते एका भक्ताच्या घरी मुक्कामास थांबतात..सद्गुरु बाजेवर आराम करत असतात.व प्रभाकर त्यांची चरणसेवा करत असतात..अंगात थोडी कणकण असूनही ते महाराजांची सेवा करत असतात..कारण गुरुसेवेइतके पुण्याचे काम दुसरे कुठलेही नाही..जो निर्भेळ आनंद आपल्या सद्गुरुंच्या चरणसेवेत असतो तो इतर कशातही नाही हे ते जाणत असतात..त्यामुळेच मनोभावे सद्गुरुंच्या चरणाशी बसून त्यांची सेवा करत असतात व मुखाने नामस्मरणही अखंड चालूच असते...एवढ्यात अचानक तिथे सभोवती दैदिप्यमान प्रकाश चोहीकडे पसरतो..या अद्भुत तेजाकडे प्रभाकर विस्मीत होऊन पाहू लागतात..तर त्यांना सद्गुरु काशीनाथ महाराजांच्या जागी साक्षात स्वामी समर्थ दिसतात..तेजपुंज शरीर असणारे स्वामी समर्थ हात उंचावून आशिर्वाद देतात..हे पाहून क्षणार्धात प्रभाकर त्यांच्या चरणी लोटांगण घेतात...तेवढ्यात सद्गुरु पुन्हा आपल्या मुळ स्वरूपात दिसायला लागतात..कधी स्वामी समर्थ तर कधी साक्षात श्री. दत्तात्रेय तर कधी मुळ मानवी रुप अशी वेगवेगळी रुपे प्रभाकरांना सद्गुरुंच्या ठायी दिसू लागतात..हे अद्भुत विलोभनीय दृश्य पाहून प्रभाकरांच्या डोळ्यातून आश्रुधारा वाहू लागतात व ते क्षणोक्षणी सद्गुरुंच्या चरणी नतमस्तक होतात...सद्गुरु त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवतात..ज्याप्रमाणे नृसिंह सरस्वतींनी त्रिविक्रम भारतीला विश्वरुप दर्शन दाखवून स्वरुपाची ओळख करुन दिली अगदी तसेच सद्गुरुंही आपल्या परमभक्ताला मुळ रुपात दर्शन देऊन स्वरूपाची ओळख करुन देतात...आपल्या शिष्याला आपल्या मुळरुपात दर्शन देणारे धन्य धन्य ते सद्गुरु आणि अद्भुत आणि विलोभनीय रुपाचे दर्शन प्राप्त होणारे धन्य ते शिष्योत्तम प्रभाकर..दोघांच्याही चरणी कोटी कोटी दंडवत..

“अवधुत चिंतन श्री. गुरुदेव दत्त !!!श्री. समर्थ सद्गुरु काशीनाथ महाराज की जय !!” 

अनुवाद – सौ. सुजाता कुलकर्णी

टिप्पण्या