५. चरणःरज.
मनुष्य जन्म हा बहुमोल असून आत्म कल्याणाचा योग मनुष्यजन्मातच लाभतो. भगवंताने मनुष्य प्राण्याला वाचा देऊन उपकृत केले आहे. मनुष्य जीवनातच सर्व प्रकारचे ज्ञान व ईश्वरप्राप्ती होऊ शकते. मानवी जन्मात येऊन मानवाने काय केले पाहिजे, मनुष्य जीवनाचे कर्तव्य काय आहे, या सर्व प्रकारच्या गोष्टीचे आकलन मानवाला याच जन्मात होते. तेंव्हा प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे की, निर्माण कर्ता तो स्वयं परमात्मा आहे त्याला विसरू नये. त्याने मनुष्य जन्म देऊन आयुष्याची जगण्याची पूर्ण तयारी करूनच मग जन्माला घातले आहे. मानवप्राणी त्या निर्माणकर्त्या ईश्वरी शक्तीला विसरून इतरत्र स्वैर वर्तन करीत असल्याचे दिसते. मृत्यु लोकात जन्म मिळावा म्हणून स्वर्गातील देवसुध्दा याचना करतात. कारण मृत्युलोकात जे आहे ते अन्य कोठेही नाही. मृत्युलोकात मानवाला गुरूची प्राप्ती होते व गुरुंकडुन परमात्म भक्तीचे ज्ञान होते. त्याच्या जीवनाचे सार्थक याच जन्मात होते. भगवंताची ओळख सद्गुरु कृपेने होते, गुरूच अभक्ताना भक्त बनवतात, त्याला ज्ञान प्राप्त व्हावे म्हणुन ज्ञानोपदेष देऊन कृतार्थ करतात. तो आला कोठुन व कोठे जाणार आहे आणि मानव जन्माला येऊन त्याचे कर्तव्य काय आहे, या सर्व गोष्टीचे ज्ञान गुरू देतात आणि भक्ताला बिजमंत्र देऊन अज्ञानातून ज्ञानाच्या प्रकाशात घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असतात. गुरू शिष्याला शिष्यत्व देतात, नाम देतात व त्याला क्षणोक्षणी सत्संगतीत ठेवतात. सन्मार्ग दाखवून सत्य ज्ञानाचा उपदेश करून दिवसेंदिवस प्रगतीपथावर पोहचविण्याचा प्रयत्न करतात.
गुरू हे भगवंताकडे घेऊन जाणारे एक महान सत्पुरूष आहेत. गुरूकृपेशिवाय मानवाला भगवंतभक्तीचा मार्ग अवगत होत नाही. गुरूच भक्ताला या संसाररूपी भवसागरातून वाहून नेणारे एक महान नावाडी आहेत. गुरू हे एक नामांकित वकिल आहेत. न्यायालयात न्यायाधिशाना भेटायचे असेल तर वकीलाची मदत घ्यावी लागते. तद्वतच भगवंताला भेटायचे असेल, ईश्वरी साक्षात्कार करून घ्यावयाचा असेल तर गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय पर्याय नाही. सद्गुरू हे मनुष्य देहाचे उध्दारक आहेत. गुरू हे दयाळू दिनदुबळयाचे कनवाळु आहेत. जगाच्या वाटेवर जे काही प्राणी आहेत त्या सर्वांचे रक्षक गुरूच आहेत. गुरू अभक्ताला भक्त करून घेतात, त्याला ज्ञान प्राप्त व्हावे म्हणुन प्रयत्न करीत राहतात. गुरूच शिष्याला पुत्रवत् प्रेम देतात. आणि त्याला आपल्या सान्निध्यात ठेऊन शास्त्र पुराण अनेक प्रकारचे ग्रंथ व वेदोक्त ज्ञान देऊन अक्षय सुख प्रदान करतात. जे भक्त अनन्य भावाने भक्ती करतात, निष्काम गुरूसेवा करतात, गुरूनी दिलेल्या नामाचा अखंड जप करतात, गुरूचरणावर अंतःकरणातून विश्वास ठेऊन, गुरूचरणाचे दर्शन घेतात,अशा भक्तांना भगवंत नित्य सहायक बनतात. एकदा का गुरूंची प्राप्ती झाली व मंत्र दीक्षा लाभली की भाग्यरेषा बदलते. पण गुरू कसेही असो,आत्मविश्वास ढळता कामा नये ते परम पवित्र परमात्माच आहेत. असा दृढनिश्चय करावा. गुरू हे स्वयंप्रकाशित स्वयं सिध्द आहेत. गुरू जे सांगतात ते काम शिष्याने अत्यंत प्रेमाने, निष्काम भावनेने, गुरू सेवा समजून निर्मळ अंतःकरणाने केले पाहिजे. गुरूसेवेसाठी देहाची राखरांगोळी झाली तरी मागे पुढे पाहु नये. इतका गुरूंवर दृढविश्वास असावा. गुरूआज्ञा होणे व त्या आज्ञेचे तंतोतंत पालन होणे ही सोपी गोष्ट नाही.
कधी काळी गुरू हे शिष्यांची परिक्षा घेण्यासाठी शिष्याना अतोनात कष्ट देतात व त्यांचे आत्म परिक्षण करतात अशावेळी देहाची पर्वा न करता न ढळता आत्म संतोषाने शांत राहीले पाहिजे. गुरू महिमा अघाध आहे गुरूंची थोरवी महान आहे. गुरूंच्या मोठेपणाची तुलना पृथ्वीतलावर कोठेही करता येत नाही. गुरू हा शब्द अपरंपार असून महाज्ञानाचा सागर आहे. सागराचा अंतपार जसे कोणत्याही मानवास लागू शकत नाही. त्याहीपेक्षा गुरूज्ञान हे ब्रम्हांडात न सामावणारे आहे. गुरू साक्षात ज्ञानमूर्ती आहेत. ते जाणण्यासाठी गुरूमुखातून (प्रणवोवाच्य) उपदेश घेऊन, गुरूकृपा संपादन करून घ्यावी लागते. एवढयासाठी संतसेवा, गुरूसेवा व अखंड सत्संग घडावा लागतो. तेंव्हाच बहुकालाच्या सत्संगतीने हा सुयोग लाभतो. तेंव्हा ज्ञान मिळण्याची संधी लाभते. गुरू प्रत्यक्षात ज्ञानाचे भांडार आहेत, गुरूंची प्रकृती रोमरोम ज्ञानमय प्रकाशाने विलसत असते. चरणापासुन ते मस्तकापर्यंत पिंड देहात कणाकणात ज्ञानमय तंतु विलसत असतात. ते ज्ञान अब्जावधी भक्ताना जरी वाटले, तरी ते संपणारे नाही. म्हणुनच म्हंटले जाते गुरू हे ज्ञानाची मूर्ती आहेत.
एवढेच नव्हे तर गुरू हे त्रिकालज्ञ आहेत, त्यांच्या ठायी तिन्ही काळाचे ज्ञान सामावलेले आहे. गुरू आणि शिष्यांचा ऋणानुबंध आहे. म्हणजे जन्मोजन्मीची गुरूशिष्य भेट होत राहते. तेच गुरू व तेच शिष्य पुन्हा पुन्हा जन्म घेऊन भेटतात. गुरू शिष्यांचा ऋणानुबंध अक्षय आहे व तो कधीही तुटत नाही पण आपण ते ओळखू शकत नाही, महाराज एकेकाळी म्हणाले ‘‘अरे, माझा आणि तुमचा अनेक जन्मांचा संबंध आहे. मी ओळखतो, पण तुम्ही ओळखू शकत नाही, तुमचे व माझे असे अगणित जन्म झाले व अंत झाला. बहुकाळाचा ओघ लाभला हाच गुरू शिष्याचा ऋणानुबंध आहे.’’ आपल्या प्रिय शिष्यांना, याप्रमाणे खोल जाऊन स्थितप्रज्ञ अवस्थेत या ज्ञानाचे भांडार उघडून ज्ञानदान देत असत.
असाच एक प्रसंग.
श्री सद्गुरू काशिनाथ महाराज इ. सन. १९७२ साली मुरूड ता. लातुर जि. उस्मानाबाद. येथे श्री मुरूडेश्वर मंदिराचा सभामंडप बांधण्याचे काम चालू असताना मंदिराच्या दरवाज्याच्या उजव्या बाजुला आसन टाकून बसले व बांधकामाचे मार्गदर्शन करीत होते. अडीच ते तीन वाजण्याची वेळ होती. एकदा महाराज एकदम शांतचित्त झाले आणि दोन्ही नेत्र बंद करून भाववेशात येऊन म्हणाले, ‘‘अहो तुळशीराम भाऊ हे मंदिर सातशे वर्षापूर्वी आपणच बांधले आहे. आणि त्याचा जिर्णाेध्दार आज आपणच करत आहोत. हे पहा इ.सन १८८० साली या मुरूडेश्वर मंदिराच्या शिखरात एक महर्षी दोनशे ते अडिचशे वर्षाचे आयुर्मान असलेले अकरा वर्षे अनुष्ठानास बसले होते, त्यांचा नित्यक्रम असे, फार खडतर नियम पाळत असत व ते केंव्हाही अकरा वर्षाच्या काळात कोणालाही दिसले नाही. रात्री ००.४५ मिनिटानी ते मंदिराच्या शिखरातून बाहेर पडत व समोरच असलेल्या आडात उतरून स्नान करत व एक कमंडलू भरून जल घेऊन अर्धे कमंडलू जल महादेवाच्या पिंडीवर सोडत, अर्धे राहिलेले जल पेटलेल्या धुनीत ओतुन महामंत्राने अग्नि प्रज्वलित करीत व एक अग्निचा लाल तुकडा घेऊन महामंत्राने घोषित करून तो परत त्या जलकुंभात सोडीत आणि राहिलेले जलाचे तीन आचमन करीत. अन्नपाणी न घेता वायुमान प्राण रोखून योगसाधना करीत असत. याप्रमाणे त्या महान ज्ञानी महापुरूषाने सतत अकरा वर्षे योगानुष्ठान याच मुरूडेश्वर मंदिराच्या शिखरात स्थितप्रज्ञ अवस्थेत राहून पूर्ण केले. ते अकरा वर्षाच्या काळात कधी कोणाला दिसले नाहीत. अनुष्ठान संपताच काशी यात्रेला चार ते पाच वर्षे संचार करून तिर्थाटन पूर्ण होताच याच मंदिरात परत येऊन 1 ते 2 वर्षे मंदिराच्या उत्तरेकडे एक पर्णकुटी तयार करून चोवीस तास अन्नपाण्याविना खडतर तपश्चर्या करत राहीले. व याच पर्णकुटीत एक दिवस नमोःकाराच्या जयघोषात बिजमंत्राच्या प्रणवध्वनित निमग्न होऊन निजानंदी विलीन झाले. ‘अहो तुळशिरामभाऊ त्यांचीच समाधी मंदिराच्या उत्तरेकडे आहे’. अशी लिला त्या महाप्रभुची आहे. ज्ञान हे अपरंपार आहे, म्हणुन म्हणतात गुरूज्ञानं गुरूमुर्ती गुरू हे साक्षात परब्रम्ह आहेत. प्रत्येक जिवमात्र त्या परब्रम्ह परमात्म्याचा एक सूक्ष्म अंश आहे.
पर आणि अपार (परात्पर) मानवी प्राण्यात जिव मात्राला पर - अपार - आत्मा - हा आत्मा म्हणजे मानवी जीव व पर - आत्मा हा परमात्मा (ईश्वर) देव भगवंत तो आहे. आणि मानव जीव हा मनुष्य आत्मा आहे. मनुष्यात्मा आणि परमात्मा ही दोन आत्मे म्हणजे जीवरूपात या विश्वब्रम्हांडात विलसत आहेत. जिव आणि शिव ही दोन्ही एकच आहेत. परब्रम्ह स्वरूप परमात्मा गुरू हे सच्चिदानंद स्वरूप देह धारण करून भक्तांच्या कल्याणाकरीता अवतरीत होतात. आणि ज्ञान मार्गाने मानवी जीवावर प्रकाश देतात.
हेच ज्ञान गुरूच्या ठायी भरून उरलेले असते जे उरलेले ज्ञान तेच गुरू भक्ताला देत असतात ते कदापीही संपणारे ज्ञान नाही. फक्त शिल्लक असलेले ज्ञान गुरू देतात व त्यांच्याजवळ भरून राहिलेले ते तसेच शिल्लक रहाते. जमा आणि नावे यांचा हिशोब गुरुंजवळ मुळीच नसतो. नामस्मरणाच्या मार्गाने एक भला मोठा झरा सतत येत राहतो तो अखंड प्रवाहित राहतो. एवढयासाठीच गुरूंची थोरवी चोहीकडे ग्रंथ, पुराण, शास्त्रे, वेद, उपनिषदे व साधुसंत महात्मे वर्णन करतात. अशा महान गुरूंच्या भक्तानी गुरूभक्ती व गुरूसेवा निष्काम भाव ठेऊन केल्याने सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात. या देहाचे कल्याण होते. आणि भक्तावर गुरूची कृपादृष्टी होऊन जीवन कृतार्थ होते. गुरू आपला अंत भक्ताला कधीही कळू देत नाहीत.
।। 🕉 शांती शांती शांती ।।
ईश्वरी महान शक्तीच्या लाटा अनंत रूपातून या संसार रूपी महासागरात उठत असतात. आणि त्यातच अंती एकरूप होतात. संसार म्हणजे जीवन पार पाडण्याचे व जन्म झाल्यापासून पूर्ण आयुष्य कंठित शेवटच्या क्षणापर्यंत या देहातून निघून जाण्यापर्यंत, (मृत्युपर्यंत) जो कांही वेळ आहे. तो म्हणजे आयुष्य. आयुष्य कंठित राहणे म्हणजे फार मोठी तपश्चर्या आहे. संसाररूपी हा महासागरच म्हणावे लागेल. ज्याप्रमाणे समुद्रात लाटामागून लाटा सारख्या क्षणोक्षणी तयार होतात व अंती त्यातच विलिन होतात. त्याप्रमाणे संसारात अनेकवेळा अनेक प्रकारचे सुख दुःख भोगण्याची वेळ येते आणि त्यावेळी मानवाला सुख दुःखाच्या संवेदना होत राहतात.
काही काळाने त्यातच या संवेदना परत समरस होतात, काहीवेळा अनेक प्रकारच्या अपत्ती येतात त्यामुळे मानवी जीवन फार दुःख भोगते व त्या दुःखाने त्राही त्राही होऊन जाते पण वेळ आणि काळ येताच सर्व अपत्ती लय होतात. या प्रमाणे संसाररूपी समुद्रात जीव अनेक प्रकारच्या सुख दुःखाना धैर्याने सामोरे जाऊन....
आलीया भोगाशी असावे सादर.
या उक्तीप्रमाणे, भोग भोगून संपवित असतो अशी कितीतरी व्यथा या मानवी प्राण्यांना भोगाव्या लागतात व अनेक प्रकारच्या संकटाना तोंड देऊन हा संसाराचा गाडा हाकावा लागतो. म्हणजे संसाररूपी महासागरातून तारून जावे लागते. कर्मधर्म योग संयोगाने जर का काळ आणि वेळ आली तर सद्गुरूंची भेट होईल आणि सद्गुरू त्याला निजबोध मंत्रोपदेष करतील. (मंत्रदीक्षा) देऊन क्षणोक्षणी त्याला योग्यतेप्रमाणे ज्ञानाचे व भक्तीचे मार्ग दाखवतील. सुख दुःखाची ओळख करून देऊन गुरू भक्ताला अनंत व्याधितून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील. दुःख काय आहे व सुख कोठे आहे, हे शिष्याला उपदेश करून त्याला सर्व प्रकारच्या व्याधीतून मुक्त करतात.
संसार हा कसा आहे. आणि संसार करतो कोण? हा सर्व ईश्वरी घटनेप्रमाणे चालणारा भासमान व्यवहार आहे. मानव हा मायारूपी जाळयात (आवरणात) पक्का अडकलेला असल्यामुळे, त्याला हे सर्व सत्य भासते जन्म आणि मृत्यु जिवन आणि संसार, आप्त इष्ट मित्र परिवार हे सर्व मायेत गुरफटून (अविद्येत) मायावी जंजाळात मग्न रहातो. आज्ञानरूपी अंधकारात त्याचा हा मायारूपी व्यवहार चालू असतो. आणि त्यातच त्याला हा सर्व व्यवहार सत्य भासतो व अनंत व्याधी सुख, दुःख, प्रेम, माया हे सर्व माझेच आहेत. संपत्ती माझ्या प्रयत्नाने जमवली आहे. घर बांधले, धन, द्रव्य ही सर्व कमाई माझ्या कष्टाची आहे. अशा अहंकारात्मक विचाराने तो पक्का बांधला जातो. व अहंकारातच गढून जातो. माझा प्रयत्न, माझी कमाई, माझी मुले बाळे, माझी पत्नी, सर्व माझे माझे म्हणत अहं ची वाढ होते. आणि यातच मस्त राहून असत्य सुखाचा अनुभव घेत रहातो. सत्य सुखाची त्याला ओळख देणारे एकमात्र सद्गुरूच असतात. गुरू कृपेनेच असत्य व सत्य अज्ञान व ज्ञान इ. गोष्टीची ओळख होते.
गुरूकृपा प्राप्त करून घेण्यासाठी गुरूलाच सर्वभावे शरण जावे लागते. तेंव्हाच गुरूंच्या कृपा दृष्टीचा महान प्रकाशझोत शिष्याच्या रोमरोमात प्रकाशमान होऊन निमिष्यमात्रात शिष्य गुरूपदास पोहंचतो. त्याचवेळी प्रत्याक्षानुभुती होऊन सर्व जग भासमान आहे. याची खात्री होऊन आत्मविश्वास होतो. खरोखरच भगवंतच या जगाचा नियंता आहे. माझे सर्वस्व जे कांही आहे ते गुरूच आहेत. मी कोण हेच मला माहित नाही, मी फक्त माझ्या गुरूना पहातो त्यांचे दर्शन घेतो. त्यांचीच सेवा करतो जे काही घडत आहे ते सर्व ईश्वरी संकेताप्रमाणे होत आहे. या जगात मला कोणीही नाही, गुरूच माझे परमपवित्र माता पिता, देव, सर्व काही जे आहेत ते सर्व माझा मीच व माझे हे प्रभुचे व प्रभु माझा, मी म्हणजे सद्गुरूनाथा गुरूमाऊली हिच महान शक्ती या विश्वब्रम्हांडात अशा अनंत भुमंडळात सामाऊन अंति शिल्लक राहते ती म्हणजे. 🕉 तत्वमसी महावाक्य मुळ बिजमंत्र 🕉 .
क्षमस्व.
श्री समर्थ सद्गुरूनाथ महाराज.
तारीख २४.०७.१९६९. मुरूड मठ.
।। 🕉 ।।
जीवन है अनमोल मनोरा ।।
उसमे चमके अंतिम तारा ।। (सं.क. दास)
देहरूपी मनोरा म्हणजे, देहच जीवन, जिवन हे कंठीत असतो या देहाच्या आयुष्याच्या विचार केला असता ते क्षणभंगुर आहे हे लक्षात येते.
(जीवन) क्षणभंगुर नाही भरवसा ।।
वंदा सदा हो गुरू काशिनाथा ।।
देहधारी जीवन जरी क्षणभंगुर असते. तरी आत राहणारा जिव ब्रम्ह हा, स्वयं व नित्य आहे. तो क्षणभंगुर नसून अखंड व नित्य आहे, अविनाशी आहे. अंतरात्मा जीवब्रम्ह हा या क्षणभंगुर देहात वास्तव्यास आलेला आहे. जोपर्यंत त्याला देहात निवास करण्याची परवानगी आहे तोपर्यंत तो रहातो हा एक ईश्वरी अनुज्ञेप्रमाणे आपले कार्य बजावून या क्षणभंगुर देहातून, ईश्वरी आज्ञा होताच या देहाचा त्याग करून पंचतत्वात विलीन होतो व हा क्षणभंगुर देह मृतवत निस्तेज होतो.
जो जसा येतो तो तसाच जातो, हा मायाबाजार धनदौलत, बायका मुले, माडया, हवेल्या हे सर्व काही इथेच सोडून जातो. त्याक्षणी दिर्घस्वरूपाच्या स्वप्नातून जागा होताच त्याच्या स्मरणात येते की, अरेरे मी हे आजपर्यंत जे काही केले ते सत्य नसून स्वप्नात केले. हे फार मोठे स्वप्न मी अनुभवले, जीवन हे दिर्घस्वरूपाचे फार मोठे स्वप्न आहे हे आता माझ्या लक्षात आले आहे. अरेरे हे प्रभु गुरूदेवा हे जीवन सत्य नसून हा भासमान होणारा महामायेचा पसारा आहे आणि यात अडकून सत्य भासाने सुखोपभोगात, हा प्रभु चिंतनाचा व गुरू भक्तीचा अनमोल वेळ व्यर्थ घालविला, हाय हाय या माझ्या जिवा कसा रे विसर पडला तुला तुझ्या चिंतनाचा. हे प्रभु गुरूमाउली पुढील जन्मी तरी या देहाला जागृत ठेवा, हे प्रभु गुरूमाई कृपा करा आता तरी या अज्ञानी पामराला पदरात घ्या. नामचिंतनाचा अवसर आता तरी कृपा करून या पामराला प्रदान करा.
या सर्व गोष्टीचा क्षणीक विचार येताच, जिवब्रम्ह हा पंचतत्वात निमिष्यमात्रात विलिन होऊन जातो. यालाच म्हणतात विस्मृती. स्मृती आणि विस्मृती पूर्ण आयुष्य जन्मापासुन ते मृत्युपर्यंत भासमान जीवनात स्मृती ही रूपात्मक असते.
मृत्युच्या शेवटच्या क्षणात स्मृतीचा नाश होऊन क्षणार्धात विस्मृती होते. आणि आप्त इष्ट, सगेसोयरे सर्वांचा विसर पडुन प्रभुनामाचा पण विसर पडतो व क्षणमात्रात जिवब्रम्ह हा या देहातुन निघुन पंचतत्वात विलिन होतो. याचसाठी संतमहात्मे सांगतात - शेवटचा क्षण गोड व्हावा.
शेवटचा क्षण जर तुम्हाला गोड करून घ्यायचा असेल तर आत्ताच नामस्मरणाला आरंभ करा, काया वाचा मने अखंड नामातच तल्लीन रहा.
बसता उठता, चालता फिरता, उद्योगात असता, खाता पिता, सदासर्वदा नामातच रहा. रात्री शय्येवर पहुडलेले असताना नामातच निद्रिस्त व्हा ते प्रातःकाळी उठेपर्यंत तुमची सर्व इंद्रिये झोपेतसुध्दा नामाचे कार्य करीत राहतात सवयीने इंद्रियाना पक्के वळण पडेल. नामाचेच कार्य इंद्रियाकडून होत राहील पण यासाठी सुरूवातीला प्रयत्न करत राहणं, आपल्या हाती आहे व यश देणे भगवंताच्या हाती.
पडिले वळण इंद्रिया सकळा।
याप्रमाणे या देहाचे सर्व इंद्रिये फक्त नामाचेच कार्य करत राहतात. आतला व्यवहार होत राहतो पण इहरूपी व्यवहार, परमार्थरूपी व्यवहार मिसळुन जाऊन एकाचवेळी दोन्ही व्यवहार चालु राहतील. या आभ्यासाने हा देह शुध्द व पवित्र हाईल पण वाचा शुध्द व पवित्र होऊन, सत्य सुखाचा अनुभव येऊन, ज्ञान वैराग्य प्राप्त होऊन, सदाचारी जिवन जगण्याची अवस्था प्राप्त होते. आणि नामाचे जे सार आहे.
नाम - नाम विठोबा, नाम तुझे सार,
आदि - मध्य अंती नाम तुझे सार,
निजबिज ओंकार.
सार म्हणजे निजबिज, ओंकार 🕉 हे एकाक्षर व अद्याक्षर (आदिबिज) आहे. 🕉 च्या उच्चाराने नाव हे नावच आहे व नाम हे प्रभुचे नाव आहे. नाम.
जिस नामसे ध्रुव प्रल्हाद तरे, ओ नाम कुछ और. नाव तारक नसुन, नाम तारक आहे. या एकाक्षर बिजमंत्राच्या 🕉 काराच्या प्रणवध्वनी लहरीने ही काया शुध्द होऊन पवित्र होते. याच्या आभ्यासाने या देहधारी मानवाचा उध्दार होतो. मृत्युसमयी नामस्मरणाच्या शेवटचा (अंतिम) श्वास पवित्र ध्वनिलहरीत स्मृतीरूपातुन बाहेर पडतो. इथे मात्र पुर्ण स्मृती जागृत राहाते. स्मृतीभ्रंष न होता पुर्ण जागृतीत शेवटचा क्षण गोड होतो. एवढयासाठी संत महात्मे निक्षुन सांगतात, बाबानो नाम घ्या नाम घ्या.
नामेचि तरले कोटयानकोटी नामेची उध्दरीले कोटयानकोटी. ज्ञानामृत आणि नामामृत याने भरलेला अमृतकुंभ म्हणजे गुरूनी दिलेले नाम या नामरूपी अमृतकुंभात भरलेले भक्तीरूपी धन जन्मोजन्मी न संपणारे अमाप धन आहे. एवढी मोठी देणगी तुमच्या गुरूनी तुम्हाला देऊन पदरात घेतले आहे. एवढे बलाढय तुमचे सद्भाग्य असताना या सर्व गोष्टीना विसरून तुम्ही दुःखसागरात गटांगळया खात आहात व आपल्या नशिबाला दोष देऊन कपाळाला भस्माऐवजी हात लाऊन रडत आहात. यालाच म्हणतात अज्ञान यासाठी नाम घ्या नाम घ्या नाम घ्या. महानयोगी परमपुज्य सद्गुरू काषिनाथ महाराज.
।। पुढील विषय तिर्थयात्रा ।।
श्री समर्थ सद्गुरू काशिनाथ महाराज यांनी तिर्थयात्रा कशी करावी याचे वर्णन तारीख ३०.०९.१९७० साली श्रीक्षेत्र इलाहाबाद प्रयागराज त्रिवेणीसंगम राजस्थान धर्मशाळा दरियागंज प्रयाग येथे चोवीस तास केलेले वर्णन पुढील लेखात दिले आहे तरी वाचकांनी याचे सखोल वाचन करून तेच नियम यात्रेच्या काळात आचरणात आणावे व तिर्थयात्रेचे पुण्य श्री महाराजांच्या आज्ञे प्रमाणे पदरात घ्यावे एवढयासाठी लेखाच्या अगोदर लेखकाने वाचकास सुचना दिल्या आहेत. याचा वाचकवृंदानी लाभ घ्यावा ही विनंती.
।।🕉।।
Sadguru meet is great moment in our Life after that life turns to specific point just like to reaction goes to transition state.
उत्तर द्याहटवाअवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु काशिनाथ महाराज की जय खूप छान पूजा एवढ सुंदर-सुंदर पाठवतेस ना सहज वाचता येईल सर्वांना चरणरज जय सद्गुरू
उत्तर द्याहटवाजय सदगुरू
उत्तर द्याहटवाअंतर्मुख होऊन सदगुरू उपदेश सेवन केले पाहिजे अमृतवाणी ही खरोखर अमृत आहे.