4. सद्गुरू काशिनाथ महाराज म्हणतात

 4. सद्गुरू काशिनाथ महाराज म्हणतात.

(रामवाडी आश्रमात दत्तजयंती इ.स १९७८)

          आकाश तत्व हे हवेतील शक्तीचे अव्यक्त रूप आहे. चिदाकाशात आत्म्याची निर्गुण शक्ती आहे व अंतःकरणात सगुण शक्ती वास करते. अंतःकरणाची साठवण चिदाकाशात आत्माच मन बनतो. सगुण बुध्दीत सत्व, रज, तम हे तिनही गुण मिश्रित असतात या प्रमाणे एका आत्म्यापासुन पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश हे पंचमहाभुते व सत्व, रज, तम हे तिन्ही गुण एकत्र होऊन आष्टदा प्रकृती निर्माण झाली. हिलाच परा प्रकृती म्हणतात. पंच महाभुते मन, बुध्दी, अहंकार यासह आपरा प्रकृती बनते व निर्गुणत्वात आत्म्याचे पुर्णत्व असते. त्या पासुन सृष्टीचे अपुर्णत्व तयार होते. निर्गुण म्हणजे बहुगुण या प्रमाणे निर्गुणाचा अर्थ होतो.  (बहुगुण) एकाचवेळी पुर्णत्वात व अपुर्णत्वात रहाण्याची शक्ती फक्त परमेश्वरात आहे व हे आत्म्याचे निर्गुण वैभव आहे. म्हणुनच नराचा नारायण होण्याची प्रत्येक मनुष्याला योग्यता प्राप्त होते.

                                महाप्रलय समयासी ।  सप्तार्णव मिळती जैशी ।।  

                          तैसा या श्वासोच्छवासी  । ईश्वर बैसला असे ।।

           श्वासाच्या आधाराने अव्यक्त परमात्मा अपुर्णत्व स्विकारतो व देहातील इंद्रियापर्यंत पोहचुन निर्गुणत्वाने इंद्रियांच्या सर्व क्रिया करीत असतो. त्यावेळी आत्मा उच्छोश्वासाबरोबर पुन्हा पुर्णत्व स्विकारतो. श्वाच्छोश्वासाची गती फार असल्याने अपुर्णत्व व पुर्णत्व याचे अंतर म्हणजेच दोहोतील ‘अ’ नंतर लक्षात येत नाही. म्हणुनच मी परमेश्वर नसुन मी मानव शरीर धारण केलेला मनुष्य आहे असेच वाटते. असे वाटण्यालाच देह बुध्दी असे नाव आहे. 

           सगुण बुध्दीच्या मदतीने पंचमहाभुताचे विज्ञान पंचज्ञानेंद्रियाने जमा करून आत्माच मन बनतो. श्वास आत घेताना स - असा ध्वनि बाहेर पडतो.  व बाहेर सोडताना हं - असा ध्वनि बाहेर पडतो. स- हे शक्तीचे महान स्वरूप आहे आणि हं- हे शिवाचे महान रूप आहे.  स - हं = सोःहं  होते.  🕉 सोःहं ओंकार 🕉 या बिजाक्षरामध्ये सर्व भुलोक सामावलेले आहे. एवढयासाठी 🕉 चे स्मरण मुखातुन श्वासासोबत सतत ठेवावे. श्वासामुळे आत्मा देह बुध्दीत मिळतो, त्यासाठी त्यातुन सुटण्यालाही आत्म्याला श्वासाचा आधार घ्यावा लागतो. यासाठीच शिष्याने श्वासासोबत नामस्मरण (जप) ध्यान घेण्याचा आधार घ्यावा लागतो. श्वासासोबत नाम स्मरणाने पंचज्ञानेंद्रिये आणि मन यातुन सुटते. व निर्गुन बुध्दी आत्माच स्वस्वरूपी सलग्न होऊन आत्मबुध्दी तेज होते.  (अहंःब्रम्हास्मी)

                              मकार म्हणीजे आपुले मन । त्रकार नाम आपुला प्राण ।।                                                                               मन प्राण एकवटुन । जप करावा एक चित्ते ।।

                    असा जप केला असता मुक्तीचा लाभ होऊन जन्म मृत्युचा फेरा चुकु  शकतो.

                                                         दृष्टांत.

          ज्याप्रमाणे उंबराच्या फळात असंख्य कृमी निर्माण होतात. व त्यातच राहतात व अंति त्यातच त्यांचे जिवन समाप्त होते. याप्रमाणे परमेश्वरामध्ये सर्व जगताची अवस्था आहे.

                                                   ।। चैतन्य = स्वरूप ।।

                            🕉चैतण्यं शाश्वतम् शांतम् ।। व्योमातीतम् निरंजन ।। 

                               नादबिंदु कलातीतं  ।। तस्मै श्री गुरूवे नमः ।।

                                               ।। अर्थ ।।

          🕉 हे चैतन्य स्वरूप आहे, महान प्रकाशमय आहे व शाश्वत असून नित्य आहे, शांत व अखंडत्व या विश्वात सामावलेले आहे, ओम निरंजनातील ज्योतिर्मय स्वरूप आहे, सर्व प्रकारच्या नादब्रम्हात बिंदुच्या स्वरूपात, सर्व कलेत, स्वरात युक्त आहे. नित्य व अखंड आहे नामाच्या अद्याक्षरात मुळ बिज आहे.

            तेच गुरूभक्त श्रेष्ठ आहेत जे आत उठणाऱ्या क्रोधाला ज्याप्रमाणे दग्ध करू शकतात. ज्याप्रमाणे जळत असलेल्या अग्नीला क्षणार्धात दग्ध करू शकतात जाळु शकतात.

            सद्‌गुरु माऊली म्हणतात. या विश्वात अनंत प्रकारचे जिव भगवंताने निर्माण करून जगाची शोभा वाढविलेली आहे. निर्माण करता तोच व विनाशकर्ता तोच आहे. याप्रमाणे जगाचे रहाटगाडगे सतत चालु आहे.

                             ।। पुनरपी जननम् । पुनरपी मरणम् ।।

           असा क्रम चालु आहे. पण विचार केला असता लक्षात येते की, मरतो कोण व जन्मतो कोण हा तर पंचमहाभौतिक जिवात्मा आहे. तो तसा नित्य आहे. तो अखंड आहे, तो अक्षय आहे तो जन्म घेत नाही व मरत नाही जीव हा ब्रम्ह नित्य आहे तो पिंडी आहे तो ब्रम्हांडी आहे व अजर अमर आहे, जो जसा आहे तसाच आहे, जीव ब्रम्ह हा निर्गुण निराकार असुन जिवाला कसल्याही प्रकारचा रंग नाही रूप नाही किंवा आकार नाही जिव हा सुक्ष्म तत्व रूपातुन हा देह धारण करतो आणि ईश्वरी  घटनेप्रमाणे कार्य करीत रहातो कार्य संपताच या देहाला  (घराला) सोडुन नवीन देह धारण करतो, नविन इमारतीत वास्तव्य करतो हा त्याचा नित्य क्रम कधीही बंद पडत नाही याप्रमाणे विश्वात  अनंत देह धारण करून ईश्वरी सत्तेप्रमाणे आपआपले कार्य पार पाडीत असतात. साधुसंत आचार्य ज्ञानी, थोर महापुरूष, योगी, महर्षी अनेक प्रकारचे शास्त्रोक्त महापंडीत आपआपल्या कार्यात नियतीच्या नियमाप्रमाणे इश्वरी घटनेनुसार कार्य पार पाडीत असतात. त्याचप्रकारे.......

                                                           ।। दृष्टांत ।।

          महान तपस्वी श्री गौतम महर्षी त्र्यंबकेश्वर येथे गंगामाईच्या उगमस्थानी पर्णकुटीत रहात असत. शेतीवर अनेक प्रकारचे धान्य निर्माण करीत असत व वैदिक पध्दतीने शेतीचा विकास व जास्तीत जास्त धान्य कसे तयार होईल यासाठी काय करावे लागेल या सर्व गोष्टीचा विचार करून शेतीची मशागत करून रात्रंदिन प्रत्यक्ष श्रम करीत असत. आणि शेती हा निष्पाप उद्योग समजून आवडीने प्रेम देऊन सतत उद्योगात तन्मय रहात असत, व भरपूर धनधान्य निर्माण करीत. आणि जगाला पण हाच उपदेश करीत असत. प्रजाजनानाही प्रभुच्या कृपेने आपल्याला मानव जन्म प्राप्त झालेला आहे आपण प्रभुची इच्छा म्हणून ही भूमाता समजून त्या भूमातेला दररोज वंदन करा व तिला स्वच्छ ठेवा. काबाड कष्ट करून त्या भूमातेला प्रेम द्या आणि तिच्या कडुन प्रेम घ्या. ती अत्यंत दयाळु आहे. तुमच्या श्रमाचा श्रध्देचा कष्टाचा मोबदला शेकडो हातानी देणारी आहे. भूमातेला वंदन करा व तिचा आशिर्वाद घ्या. याप्रमाणे गौतम महर्षी प्रजाजनाना उपदेष करीत असत.  श्री सद्‌गुरु काशिनाथ महाराज सुध्दा याप्रमाणे शेतीवर अविश्रांत परिश्रम करीत असायचे. आणि येणाऱ्या धान्यातुन महाप्रसाद व यात्रा महोत्सव साजरा करीत असत. येणाऱ्या भक्ताना हेच सांगत की बाबानो शेतीवर अविरत परिश्रम करा शेती ही भूमाता आहे. तिला पुन्हा पुन्हा वंदन करा.                

रामवाडी आश्रम इ.सन १९७८.

श्री सद्‌गुरु काशिनाथ महाराज रामवाडी आश्रमात असताना मार्गशीष शुध्द १५ पोर्णिमा श्री दत्त जन्मोत्सव चार ते पाच दिवस येऊन ठेपला. महाराजांचे बरीच शिष्यवृंद जन्मोत्सवासाठी लांब लांबुन येऊन दाखल झाले व प्रत्येकजण जे जे झेपेल ते काम करीत असत. आश्रमाची साफसफाई रंगरंगोटी सामानाची ने आण आपआपल्या परीने करीत. मार्गशीष मासाची कडक थंडी मी म्हणत होती. बरीच मंडळी रात्रीचे सात वाजले की शेकोटी जवळ करायचे. तशातच सर्व कामे करीत असत. रात्री दोन वाजता महाराज डाॅ. शंकररावला म्हणाले ‘‘अरे डाॅ. तु स्नान कर व मंदिर धुवून घे’’. महाराजांची आज्ञा होताच डाॅ. शंकरराव बचाटे मुरूडकर लगबगीने कपडे उतरून हौदावर जाऊन स्नान करून ओले वस्त्र नेसुन मंदिर प्रवेश केला. प्रभु दत्तात्रयाना नमस्कार करून सोडा, पाणि, ब्रश घेऊन साफ करू लागले. थंडीने दात कडकडत आहेत व हात थर थर कापत आहेत, एवढयात फिरत फिरत महाराज जवळ आले व डाॅक्टर भक्ताची अवस्था पाहुन महाराजानी श्रीरंग पेंटर भक्ताला व दिगंबर गायकवाड भक्ताला हाक मारून म्हणाले, अहो दोघेही भक्तराज कपडे काढा ओले वस्त्र परिधान करा व मंदिर प्रवेश करा. आरे डाॅक्टर थंडीने काकडला आहे तो एकटाच धुवत आहे. त्याला थोडे गरम होऊ द्या.  हे महाराजांचे शब्द ऐकताच दोघेही अंघोळ करून मंदिरात आले व धुण्यास आरंभ केला.

       श्री दत्तप्रभुंचे सिंहासन धुवत असताना एक भले मोठे नागराज चार ते सहा फुट लांबीचे केशरी लाल वर्ण फणा काढुन प्रभु दत्तात्रयाच्या मुर्तीच्या मागे एक हात उंच फणा काढुन डोलत आहेत. नागराजाना श्रीरंग भक्ताने पहाताच घाबरून बाहेर पळत सुटले. डाॅक्टर व दिगंबर हेसुध्दा घाबरून बाहेर आले त्यांना पाहुन महाराज म्हणाले, अरे तेवढयासाठीच तुम्हा तिघाना आत पाठविले. आरे तुम्ही कच्या गुरूचे चेले आहात का? भिता कोणाला तो तर महाराजा आहे. राजाचे कर्तव्य असते प्रजेचे पालन करणे चला आत आपल्या कामास लागा. असे म्हणुन आम्हाला घेवुन आत गेले. व महाराजानी काठीने एक रेघ ओढली त्याक्षणी नागराजाने फणा खाली करून सरळ रेषेत हळुवारपणे बाहेर पडले. व उंबरठयावर डोके ठेवत नागराज क्षणार्धात अदृष्य झाले. पण चमत्कार कांही वेगळाच झाला, बाहेर लोकाना दिसत आहे की, महाराज नागराजाला काठीवर घेऊन कुंपणाच्या जाळीत सोडत आहेत. सोडताच त्याने वेटोळा घालुन तीन ते चार फुट उंच होऊन फणा बाहेर काढुन महाराजांच्याकडे पहात डोलु लागला व थोडयाच वेळात हळु हळु एका वारूळात प्रवेश केला. तेंव्हा श्री गुरू महाराज म्हणाले, अरे आज नागराजानी तुमची भाव भक्ती पाहुन दर्शन दिले. तो शिव भोळा भगवंत केंव्हा कुठल्या रूपातुन येईल व तुमची परिक्षा पाहील ते सांगता येत नाही. आरे वेडयानो तुम्ही मुर्ख आहात. मंदिर स्वच्छ मोकळे आहे कोठेही मुंगी जाईल असे छिद्र नाही आणि तो नागराज आत येईल कसा? एक तास झाला आतच आहे. तो सर्व खेळ त्या भगवंताचा आहे. त्याला तुम्ही ओळखु शकत नाही परमपिता परमात्मा भक्तीचा व भावाचा भुकेला आहे. त्याला जाणण्यासाठी परा भक्ती आहे. परमात्मा भक्ताला आशिर्वाद देण्यासाठी अनेक रूपातून प्रगट होतो. व आशिर्वाद देऊन त्यांचे आत्मकल्याण करतो. परंतु मनुष्य प्राणि मृत्युला भीत रहातो. अरे या जगात जे कांही निर्माण झाले आहे ते एक दिवस जाणारच आहे. इथे रहाण्यासाठी कोणीही येत नाही. सर्व जाणारच आहेत. येणे व जाणे हा क्रम या जगाचा सतत चालूच आहे. मग भिती काय? परंतु खरे पाहीले तर जिव ब्रम्हः हा निर्भय निर्गुण निराकार आहे. त्याला भय नाही गुण नाही किंवा आकार नाही. तो साडेतीन मात्रीकेत गुप्तरूपाने निराकारात निवास करतो. ओंकारात निवास रहाता देहातील असणारा आत्मा परिपूर्ण असुन सर्वज्ञ आहे. अज्ञान हि देहातीत आहे. व ज्ञान हे आत्मवत आहे. या सर्व गोष्टीचा विचार न केल्याने या देहाला सुख दुःखाच्या संवेदना होत राहतात. याची ओळख आत्म्याला नसते. या ज्या ज्या सर्व संवेदना अनुभवास येतात त्या सर्व याच देहातून निर्माण होतात. आत्म्यातून फक्त ज्ञानाचा प्रवाह प्रवाहीत रहातो त्याचसाठी योगी महात्मे म्हणतात.  

 नहि ज्ञाणेन सद्रषम् । पवित्रमिह विदमह ।

प्रथमावस्थेत ज्ञान आणि द्वितियावस्थेत आत्मज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे.


      

टिप्पण्या