2. श्री यल्लालिंग महाराज

2. श्री यल्लालिंग महाराज.

             ध्यानमुलं गुरूरमुर्ती । पुजामुलं गुरूर पदम् । म्ंत्रमुलं गुरूर वाक्यं । मोक्षमुलं गुरूर कृपा ।।
          शब्दांच्याद्वारे गुरूंच्या अस्तित्वाचा साक्षात्कार होतो. श्री महाराज म्हणाले, भगवंत पूजा करणाऱ्यांच्या ठायी तिर्थ यात्रा करणाऱ्यांच्या ठायी नाही. यज्ञयाग जपतप करणाऱ्यांच्या यांच्या ठायी नाही. तर जेथे माझे परम भक्त शुध्द भावनाप्रधान निष्काम भाव असणारे माझे गुणगाण गात असतात त्यांच्या ठायी मी उभा आहे. 
          आपण जे जे पहातो, हे जगत विश्वब्रम्हांड हा पसरलेला संसाररूपी महासागर, ब्रम्हमय असुन, पृथ्वीतलावर असणारे सर्व जीवमात्र जलचरे वनचरे मुंगीपासुन औक्षोहिनी जीवमात्र सृष्टीचे स्वरूप सर्व दृष्यमय वस्तु, ईश्वररूप आहेत. प्रभुची महान शक्ती माया आहे.
          हे जग म्हणजे एक विशाल कारखाना आहे. या कारखान्यात आपण चाकर आहोत. मॅनेजरच्या आज्ञेप्रमाणे, उत्पादन करीत आहोत व आपली चाकरी बजावत आहोत.  उत्पादन झालेल्या मालाची विक्री करून ते धन मालकाच्या स्वाधीन करीत आहोत. चाकरी संपताच  निश्चितपणे पेन्शन घ्यावी लागते. व कारखान्याला राम राम ठोकावा लागतो. गुरूनी दिलेल्या नामाचे ध्यान करणे. केवळ गुरूंची प्रतिमा समोर ठेवुन अथवा तशी कल्पना करून नाम घेत राहणे हेच ध्यानाचे मुळ आहे.
                                            ।। ध्यानमुलं गुरूर मुर्ती ।
          प्रत्यक्ष गुरूमूर्ती समोर असताना, किंवा तशी कल्पना मूर्तीच्या ठायी एकरूप करून ध्यान करावे. अथवा श्री गुरूंचा फोटो समोर ठेवुन प्रतिमेवर ध्यान एकाग्र करणे. मनाला स्थिर करून मन अंतःकरणाच्या ठायी स्थिर करणे. आणि आत्मसंतोषाच्या गाभाऱ्यात जाऊन आत्मसंतोषाने नाम घेत रहाणे. ही अवस्था गुरूंच्या व नामाच्या ध्यानाचे मुळ आहे.
                                               पूजामूलं गुरूर पदम् ।।
          मातृपूजा, पितृपुजा, देवपूजा इत्यादी पूजेचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक भक्ताचा पुजा करण्याचा उद्देश वेगवेगळया प्रकारचा असतो. कोणी कामिक पुजा करतात तर अनेक प्रकारच्या मनोकामना धरून पुजा करतात. कांही पुरोहितांच्या सांगण्यावरून इच्छापुर्ती साठी पुजा करतात. या प्रकारे केल्या जाणाऱ्या पुजा कामीक होत. पण पुजेचे मुळ निष्काम पुजा करणे, निर्गुन निराकार पुजा हिच श्रेष्ठ  पुजा आहे. श्री गुरूच्या चरणप्रांती जाऊन अंतःकरणात विश्वास ठेऊन जी पुजा केली जाते तीच सर्वश्रेष्ठ पुजा. श्री गुरूंची पाद्यपुजा तन - मन - धनाने जी निष्काम पुजा केली जाते तीच सर्वात उत्तम होय.
                                             मंत्रमुलं गुरूर वाक्यं ।।
          मंत्राचे प्रकार पुष्कळ आहेत काही राम नामाचा जप करतात. काही  हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे मंत्राचा जप करतात तर काही इष्ट देवतेचे ध्यान करतात.  काही 🕉 नमः शिवाय मंत्र उपासना करतात. याप्रमाणे मंत्र जप केला जातो. मंत्राचे मुळ गुरू मुखात प्रणवोवाच्य गुरू मुखातुन जो मंत्र उपदेश प्राप्त होतो व भक्ताच्या ब्रम्हरन्ध्रस्थानी गुरूंचा हस्तस्पर्श होतो. एकांत स्थानी मंत्रोपदेष, मंत्रदिक्षा देतात तेच मंत्राचे मुळ, गुरू मुखातुन बाहेर पडणाऱ्या ध्वनित आहे. (गुरूवाक्यात सामावलेले आहे) म्हणजेच बिजमंत्र हा गुप्त असुन प्रणवोवाच्य आहे.
                                              मोक्षमुलं गुरूर कृपा ।।
          आपण मोक्ष मोक्ष म्हणतो. मोक्ष म्हणजे मुक्ती, मुक्ती हवी असेल तर भक्ती करावी लागते. ती पण निष्काम भक्ती पाहिजे. इथे गुरू कृपेची नितांत गरज आहे. मोक्षाचे मुळ गुरू कृपेत सामावलेले आहे. कृपा ही अनेक प्रकारची आहे. मातृकृपा, पितृकृपा, इषकृपा याप्रमाणे अनेक कृपा आहेत. मोक्ष हवा असेल तर गुरू कृपाच व्हावी लागते. व गुरू कृपेतच मोक्ष सामावलेले आहे. मुक्तीचे मुळ आहे केवळ गुरूकृपा.
           इ.सन 1967 मध्ये मुगुळखोड येथे. श्री सद्गुरु काशिनाथ महाराज यांचे परमपुज्य गुरूदेव श्री समर्थ सद्गुरू यल्लालिंगप्रभु  महाराज मुगळखोड (कर्नाटक) जि. बेळगाव. इ.सन. 1967 साली कांही भक्ताना कानडी (कन्नड) भाषेतुन आध्यात्माचा केलेला उपदेशाचा त्यांचे परम शिष्य श्री मायाप्पाअण्णा कोळीगुडकर यांनी मराठी भाषेतून केलेला अनुवाद.
          सद्गुरू यल्लालिंग प्रभु महाराज म्हणतात, ‘‘बाबानो ऐका नीट लक्ष देऊन ऐका, पुन्हा तुम्हाला सांगायला कोणीही येणार नाही, नीट लक्ष देऊन ऐका, माझ्या बाळानो तुम्ही फार भाग्यवान आहात. तुमचे पूर्व जन्मीचे संचित फार मोठे, चांगले व फार बलवान आहे त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात. तुमचे गुरू महाराज फार मोठे आहेत. ते महाराज नाहीत बर कां, ते देव आहेत. पण तुम्ही त्याना न ओळखल्यामुळे तुम्हाला ते काशिनाथ महाराज दिसतात. पण ते नुसते महाराज दिसत असले तरीपण ते महाराज नाहीत. प्रत्यक्ष काशीविश्वनाथ ते काशीचे विश्वनाथ महादेव आहेत. ते स्वयं काशिलिंग आहेत. तुम्ही आज्ञानाच्या अंधकारातुन, झोपेतुन जागे व्हा. व ज्ञानाच्या प्रकाशात जाऊन काशिनाथ महाराजाना अंतरदृष्टीने पहा. तुम्हाला त्यांचे खरे रूप दिसेल.  मग विश्वास बसेल एवढे महान मोठे देव महादेव तुम्हाला दर्शन देतील तेंव्हाच खात्री पटेल’’.                                                           "खरोखरच महाराज परमात्मा आहेत. ते अक्कलकोटहून आले, रामवाडी गावी विसावले, तेथे त्याना आनंद झाला. अमृतकुंड सीतेच्या न्हानीत, गुहेत अनुष्ठान करून भक्ताच्या उध्दारार्थ रामवाडी गावी आले. तेंव्हा काशिनाथ महाराज झाले. ते तुम्हाला ओळखतात व गुरूमंत्र देऊन अनुग्रहीत करतात व पदरात घेतात. तुम्हा सर्वांच्या कल्याणासाठी झटतात ते प्रत्यक्ष देव आहेत. पुन्हा तुम्हाला सांगायला कोणीही येणार नाही. बाबानो, तुम्ही मोठे भाग्यवान आहात. तुम्ही पूर्वजन्मीच्या  पुण्याईवर या जन्मात एवढया मोठया महाराजांचे शिष्य झालात. हा पुर्व संचिताचा ठेवा व पुर्व पुण्याईचे मोठे फळ आहे. आपण सर्व सिध्दांचे, भगवंताचे बाळ आहात. व देवांचा बीजमंत्र घेऊन तुमचे भाग्य उदयास आले आहे तुम्हाला संसाररूपी महासागरातून पैलतीरावर नेऊन सोडणारे फक्त गुरूच आहेत. ते तुम्हाला सुख दुःखातून अलगदपणे बाहेर काढणारे एक महान सत्पुरूष सद्गुरूच आहेत. तेच तुमच्या जन्मोजन्मीचे साथी आहेत. मातृपितृ देवता तेच आहेत’’. ‘‘माझ्या काशिनाथ  महाराजांच्या गुरूपुत्रानो.
             गुरूसेवा करा, गुरूंच्या मुखातुन बाहेर पडणारे प्रत्येक शब्द बहुमोल आहेत. ते निट ऐका व अंतःकरणात त्या बहुमोल शब्दाचा भला मोठा विश्वब्रम्हांडाच्या समान नकाशा रेखाटून ठेवा. व पुन्हा पुन्हा त्या नकाशाचे अवलोकन करत रहा. तेंव्हा तुम्हाला कळेल त्यांच्या मुखकमलातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक अक्षरात, शब्दात किती मोठी शक्ती समावलेली आहे. बीज मंत्राचा जप करा, नाम घ्या हे नाम गुरूनी तुम्हाला दिलेली एक महान देणगी आहे.  पैसे न देता मोफत मिळालेली नाम ही फार मोठी देणगी आहे. ही देणगी अक्षय असून अविनाशी आहे. ती कधीही संपत नाही, नाश पावत नाही हा अलभ्य लाभ आहे"
            ‘‘सत्संगतीत राहून गुरूंची सेवा करा व ज्ञानवान व्हा. मनुष्य जीवन ज्ञानावीन आंधळे आहे. मनुष्य जन्माला आल्यावर त्या जन्माचे सार्थक करण्यासाठी नामच सर्वश्रेष्ठ साधन आहे. पण ते फार सोपे साधन आहे. विनाकष्ट विनासायास नामाच्या उच्चाराने तुम्ही ज्ञानाचे महासागर व्हाल. महाचैतन्याचा प्रकाश पाहाल. त्या परम पवित्र पदाची प्राप्ती होऊन त्या स्वयं भगवंत स्वरूपाच्या ठायी पोहचून परमात्म स्वरूपी लीन होऊन परमपदाचे अधिकारपदी आरूढ व्हाल.व अविनाशी  सुखाचा परमानंद तुमच्यात निर्माण होईल. यासाठी माझ्या बाळानो, अंतःकरणातून मनोभावे गुरूसेवा करत रहा. गुरूचरणी देह अर्पण करा, जे कांही करता ते सर्व कार्य गुरूना स्मरून करा, गुरूकृपा संपादन करून घ्या, तेंव्हाच तुम्हाला नामस्मरणाची गोडी लागेल. नाम फार गोड आहे रे, पण चव घेऊन चाखून पहा. (गोडीची अविट चव घ्या) ते अमृताहूनही गोड आहे. तुमच्या शरीराला सुख देणारे नाम आहे. तुमचे कल्याण करणारे नाम आहे. रोगमुक्त करणारे नाम, ब्रम्हपद मिळवून देणारे नाम, तुमच्या आयुष्याचे कल्याण करणारे नाम, तुमच्या संसाराचे जबाबदारी वहाणारे नाम, मुलाबाळांचे पिता पुत्राचे, अर्धांगिनीचे कल्याण करणारे नाम, तुमच्या कुळीमुळीचा उध्दार करणारे नाम, जन्मोजन्मी साथ देणारे नाम, मृत्युची भिती पळवून लावणारे महाऔषध नाम.  🕉 ओंकार हे नाम तुमच्या गुरूंनी दिले आहे. एवढे महान शक्ती संपन्न नाम गुरूवर्यानी तुम्हाला देऊन नंतरच तूम्हाला पदरात घेतले आहे’’.                                        ‘‘त्या महान गुरूमाईना अनन्य भावे शरण जा आणि चोवीस तास रांत्रदिन उठता बसता जागृती, स्वप्नी, सुप्ती चालता फिरता, खाता पिता, ओठ न हलवता आतल्या आत नामाच 🕉 चा प्रणवध्वनि सतत निनादत ठेवा. शरीराकडून केले जाणारे प्रत्येक कर्म, श्वासासोबत नामाच्या 🕉च्या समिश्रणात करीत रहा. प्रयत्न करा व नामाला कायमचे प्रकृतीच्या रोमरोमात सुक्ष्मात रोवुन ठेवा. सर्वांग रोमरोम नाममय बनवून त्या परमात्म रूपी श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाचे अधिकारी व्हा’’.
          ‘‘बाबांनो गुरू तारणारे आहेत, गुरूंच्या चरणप्रांती विश्रांती घ्या, गुरूंनी केलेला उपदेश  तुमच्या रोमरोमात भिनला पाहिजे, तरच तुमची काया तेजपुंज होणार. गुरू हे ज्ञानाचे भांडार आहेत, ते तुमच्या कर्तव्य कर्माप्रमाणे ज्ञानभांडारातून तुमच्या शुध्द भावभक्तीप्रमाणे ज्ञानाचे दान तुम्हाला देत असतात. अशा महान परमपूज्य गुरूंना नित्य स्मरून प्रत्येक कर्म करीत रहा, तरच तुमचे कल्याण होऊन या जन्माचे सार्थक होणार आहे’’.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा