|| ॐ ||
-: प्रारंभ:-
श्री गणेशाय नमः । श्री गुरूदेवोभ्यों नमः । श्री मातृपितृभ्यों नमः ।।
1. श्री समर्थ.
परम पुज्यनिय सच्चिदानंद सद्गुरू काशिनाथ महाराज हे महान योग्यांचे योगी होते, थोर तत्वज्ञ असुन ज्ञानाचे भांडार त्यांच्या ठायी सामावलेले होते. जगत्कल्याणाच्या कार्यासाठी आपला देह अहर्निष कष्टवित असत. लहान थोर अबालवृध्द सर्व जातीधर्माच्या भक्तांना एकत्र घेऊन ज्ञानदान करीत असत. संत कबीर दासांच्या संतोक्तीप्रमाणे, महाराज सांगत असत.
देनेको अन्नदान, लेनेको हरीनाम ।
तरनेको लीनता, डूबनेको अभिमान ।।
श्री सद्गुरू काषिनाथ महाराज भक्तांना हाच उपदेष करीत असत. बाबानो, शुध्द हस्ते अन्नदान करा, अन्नदानासारखे पुण्य नाही. हाताने अन्नदान करा आणि मुखाने हरीनाम घ्या. गुरूनी दिलेले नाम फार महान आहे. याच नामाने तरून जाता येते. लिनता अंगी बाळगावी. अभिमान धरू नये, अभिमानाने देहाची व कर्तुत्वाची राखरांगोळी होते. देहाच्या, चित्ताच्या शुध्दीसाठी अखंड नित्य नैमत्तिक मुखाने नाम घेत रहा. नामाच्या महान प्रभावाने देह शुध्द व पवित्र होतो. मन शांत राहते. अंतःकरण कोमल व मृदु मुलायम बनते. नामाच्या शक्तीने काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ इत्यादी षड्विकार हळूहळू नाहीसे होतात. नामस्मरणाच्या ध्यासाने अज्ञान नाहीसे होऊन शुध्द व पवित्र ज्ञानाची प्राप्ती होते. गुरूनी दिलेले नाम (मूळ बिज मंत्र) हे भक्तांसाठी महान वरदान आहे.
नाम हे ज्ञानाचे भांडार आहे. नामात फार मोठी शक्ती सामावलेली आहे. नाम हे पवित्रम् आहे. नामस्मरणाने सर्वज्ञता प्राप्त होते. आत्मज्ञानांतर्गत नेऊन सोडते ज्ञानाची उच्चतम अवस्था म्हणजे आत्मज्ञान. नामाचे अद्याक्षर ॐ आहे. ओंकार सर्वव्यापक असल्यामुळे नरदेहाचे सार्थक ओंःकाराच्या स्मरणाने होते. इंद्रियाची क्रिया ॐ च्या ध्वनिलहरीत होत असते. प्रकृतीची हालचाल चालणे फिरणे, उठणे बसणे, हात, पाय, मुख, कान, नाक वगैरे शरीराचे सर्व अवयव जे कार्य करतात ते सर्व ॐ च्या महान शक्तीने करीत असतात. श्र्वासातुन हवेच्या सहाय्याने देहाची जी क्रिया चालु राहते यात ॐ च्या लहरी उमटतात. अ. उ. म. या ॐ च्या मात्रा आहेत. व अर्धमात्रा शुन्य आहे.
(1) अकार - चरण युगुल. (2) उकार - उदर विषाल. (3) मकार - महामंडळ व अर्धमात्रा शुन्य. ब्रम्हरन्ध्रस्थानी ॐ हे परब्रम्ह स्वरूप परब्रम्ह परमात्मा आहे. आपण बिजमंत्राद्वारे ध्यान करतो. जे ध्यान करतो ते परब्रम्ह परमात्म्याचे नाम आहे. आणि तोच परब्रम्ह परमात्मा ॐ च्या रूपातुन सर्वाठायी प्रगट आहे. नाम आणि नामाचे स्मरण, ॐ चा ध्यास नामस्मरणानेच होतो. व सद्गुरू शिष्याला तेच नाम देऊन कृतार्थ करतात. सद्गुरूने दिलेले नाम हे फार मोठे अक्षय धन आहे. ते कधीही संपणारे नाही. ते कधी नाश पावत नाही. कुजत नाही, विटत नाही, संपत नाही किंवा त्याला चोर चोरून नेत नाहीत. ते अविनाशी असून जन्मो जन्मी सोबत येणारे आहे. नाम या धनाची किंमत करता येत नाही कारण त्याला किंमतच नाही. एवढी मोठी संपत्ती श्री गुरूनी शिष्याला दिलेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार न करता भक्त अज्ञानरूपी अंधःकारात चाचपडत राहुन अज्ञानपणाने अनंत दुःखे भोगत असतो. परंतु त्याच्या स्मरणात येत नाही की, आपल्या गुरूनी नाम ही भवदुःख व भवरोगनाषक नाम ही महान औषधी मात्रा दिली आहे. या नाममात्रेच्या नित्य सेवनाने आपण या महा भयंकर रोगातुन क्षणार्धात रोगमुक्त होऊ शकतो. पण औषधाचे पथ्य पाळल्याषिवाय गुण येत नाही. तद्वतच नाम मात्रा घेऊन सुध्दा आपण (अखंड) हे पथ्य पाळण्याचे विसरतो. नाममात्रेचे पथ्य एकच पाळावे लागते. ते म्हणजे (अखंड - नाम) अखंड याचा अर्थ खंड न पडु देणे. नामाचे स्मरण अखंड चालु ठेवणे हे नाममात्रेचे महत्वाचे पथ्य आहे. ज्याने औषध मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. ज्याने नाम मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी.
योगींद्र माध्यं । भवरोग वैद्यं । सद्गुरू त्वं नमामी ।।
भवरोगाचे महान वैद्य सद्गुरू आहेत. त्या महान सद्गुरू माउलीना अनन्यभावे शरण जावे लागते. गुरू सत्संगात रममाण व्हावे लागते. सत्संग हा फार मोठा अलभ्य लाभ आहे. सत्संगतीने सात जन्माचे पाप स्वच्छ धुतले जाते. शरीर निर्मळ, वाणी शुध्द व पवित्र होते. मन, बुध्दी, चित्त, अहंकार हे शांत होतात. दया, क्षमा, शांती सत्संगतीनेच देहाच्या ठायी वास करते. व देह ज्ञानाचे भांडार बनते. अंतःकरण शुचिर्भुत होऊन शांतीचा लाभ होते. पवनवेगी वाहणारे मन स्थीर गतीने प्रवाहित होते. याचवेळी नामाच्या गोडीचा अनुभव येऊ लागतो. याच समयात साधकाच्या ठायी नामाची गोडी लागते. ते गोड नाम त्याला आत्यंतिक गोड लागते. व त्याच गोडीने नामाचा आनंद परमानंदात विलिन होतो. इथेच सत्य सुखाचा अनुभव येऊन भक्त साधना मार्गात दिवसेंदिवस प्रगती पथावर रहातो. सत्संगतीने अज्ञान समुळ नाहिसे होऊन केवळ ज्ञान प्राप्त होते. याच स्थितीत भक्ताला अज्ञानरूपी सुख व ज्ञानरूपी सुख या दोन्ही सुखाचा अनुभव येऊन दुःख समुळ नाहीसे होते. आणि केवळ ज्ञानाचा आनंद सदैव अनुभवास येतो. याच आनंदमयी ज्ञानमार्गाने, मिळणारा पदमानंद अनुभवास येतो. परमानंदातुन नामाच्या शक्तीने, सत्य व सत् - चित् - आनंद (सच्चिदानंद) साधकाच्या ठायी अनुभवास येतो. याच सच्चिदानंदाचा सुख सोहळा साधकाला एकाग्रतेप्रत घेऊन जातो. यावेळी साधकाच्या मनाची द्विधा व गती मंद होऊन कर्ण बधीर होतात. नेत्रज्योती तेजपुंज होऊन अर्धोन्मिलित होते. वाणी मधुर होते. कंठातुन शांत चित्त प्रणवोद्गाराचा प्रवाह सुक्ष्म स्वरात प्रवाहित होत असतो. व साधक सच्चिदानंदाच्या स्वरूपातुन परमात्म स्वरूपाच्या सुक्ष्म तत्वातुन ब्रम्हमय अवस्थेत अहंब्रम्हास्मीचा अनुभव घेत राहतो. याच अवस्थेत परमात्म दर्षन झाल्याचे अनुभव येतात. सत्संगतीनेच साधक परम पवित्र परमात्म दर्शनाचा अधिकारी होतो.
नादबिंदु कलातितं् तस्मै श्री गुरूवे नमः.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा