१३. आत्मसाक्षात्कारातुन शांतीचा लाभ.

        मानव जन्म हा पवित्र असुन इतर प्राण्यापेक्षा ज्ञानी आहे. मनुष्य जिवनाचे सार्थक नामाच्या स्मरणाने व ईश्वर चिंतनाने होते, पण सर्व सामान्य जिव या पवित्र जिवनाला जाणीत नसल्यामुळे मायेच्या आधिन होऊन एैहिक सुखोपभोगात गुरफटुन जातो आणि आपल्या सत्य असणाऱ्या आत्मस्वरूपाला जाणत नाही. आपण प्रभु कृपेने या पवित्र मानवकुळात जन्माला आलो आहोत. जन्माला येऊन जिवनाचे सार्थक होण्यासाठी काय केले पाहिजे, या अविद्यारूपी मायेत गुरफटल्यामुळे आपले कर्तव्य साफ विसरून जातो आणि अविद्येच्या आधिन राहुन सुखाच्या लालसेने मायावी आवरणात गुंतुन रहातो. इथेच खरे खुरे सुख लाभते, या चुकीच्या समजुतीने प्रभुच्या नामाला महत्व न देता, ईश्वरी साक्षात्कारापासुन पारखे होतो. या विश्वाचा निर्माण कर्ता, जिवाचा संरक्षण कर्ता जो परमात्मा आहे त्या परम पवित्र भगवत् स्वरूपाला विसरतो व अज्ञानरूपी काळया कुट्ठ अंधारात रात्रंदिन अनंत तऱ्हेच्या सुख दुःखाच्या संवेदना सहन करीत रहातो. कर्म, धर्म, योग संयोगाने पुर्व संचिताच्या पुण्यायीने जर का गुरू भेट होऊन महान योगी महापुरूषांच्या कृपाषिर्वादाचा एक क्षण लाभला तर त्यांच्या कडुन प्राप्त होणाऱ्या मंत्र दिक्षेने हा मानव देह पुणीत होऊन गुरूंच्या साह्याने मिळणाऱ्या मंत्र शक्तीने देहातीत असणाऱ्या आत्मस्वरूपाला जाणता येते.

        सद्गुरूंच्या सेवेने त्यानी दिलेल्या मंत्रदिक्षा(अनुग्रहाने) व सत्संगतीने सत्वगुणाची वृध्दी होऊन आज्ञानाचे निर्मुलन होऊन ज्ञानाचा प्रकाश देहाच्या ठायी निर्माण होतो, त्याच क्षणी उच्चतम नामाची गोडी साधकाला अनुभवास येते. गुरूंच्या सत्संगाने साधकाचा मनोभाव दिवसेंदिवस वाढत जातो व दया, क्षमा, शांती साधकाच्या ठायी सतत वास करते. राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर इत्यादी गुणांचे निर्मुलन होऊन मनुष्य शांतीचे आगार बनतो. सर्वाभुती प्रेमभावाने, दयाद्र भावाने सर्व प्राणीमात्रात परम पवित्र ईश्वरी शक्तीचे वास्तव्य आहे, या अनुभुतीने सर्वाठायी भगवंतच भरलेला आहे, हेच पहातो. तेंव्हा साधक नामाच्या साह्याने दिवसेंदिवस उन्नतीच्या मार्गावर आरूढ होतो. गुरूसेवा सत्संग गुरूचा आत्मबोधाचे प्रेमभावे श्रवण करून त्याचे मनन करून अंति निधिध्यास करून तो ध्यास अंतकरणाच्या ठायी स्थिर करून मन, बुध्दी, चित्त स्थिर होते. आणि भगवंताच्या स्वरूपाला परमानंद, गुरूचरण कमलाचा मकरंद चाखीत राहतो.

        परमानंदाच्या परम पवित्र आनंदात मग्न होऊन शांतीधाम जाऊन मिळतो. भक्त, गुरू आणि भगवंत त्रीपुटीचे काटकोन साधकाच्या अंतःकरणात तयार होतो. तो काटकोन खालीलप्रमाणे आकृती दिली आहे.

 १ ते ९० अंश
भक्तमार्ग                   गुरू                      भगवंत
१ ते            गु     रू   मा.                      ९० अंश
                             ४
४५ अंश आ.सं.   २ ९० अंश     ३        ४५ अंश  आ.सं.


जेंव्हा भक्त गुरू आज्ञेप्रमाणे वाटचाल करीत असतो तेंव्हा तो अनन्यभावे गुरू भक्तीत समरस होतो. त्याचा अनन्य भक्तीभाव पाहुन गुरू त्याच्यावर प्रसन्न होतात. शिष्याला अंग - संग - समरस करून घेतात.

        कृपामृताच्या सिंचणाने, शुध्द करून कुर्म दृष्टीने (कासवाच्या दृष्टीप्रमाणे) शिष्याकडे पाहुन त्याला प्रेमाचा पाझर सोडतात, त्याचक्षणी शिष्याची क्षुधा शांत होते व भुक तहान पुर्ण क्षमण होते ( भुकेलेले पोट भरते ) व सच्चिदानंद स्वरूपातुन ते भक्ताला ओळख करून देतात. भगवंत भेटीचा दर्शनाचा  राजमार्ग दाखवुन मार्ग सुलभ करतात. तेंव्हा साधक परीपुर्ण अवस्थेप्रत जाऊन भगवतस्वरूपी लिन होतो. त्याक्षणी शिष्याला आत्म साक्षात्कार होऊन आत्मदर्शनाचा महान प्रभावाने सत्य स्वरूपाची जाणीव होते. देहात असणाऱ्या जिव शिवाचे एैक्य होते. चेतन स्वरूप आत्मतत्व व जिवतत्व नित्य व अविनाशी आहे व देह हा नित्य नसुन अनित्य भासमान व क्षणीक आहे. या सर्व गोष्टीची जाणीव आत्मसाक्षात्कारातुन होते. मिळणाऱ्या आत्मशांतीचा अनुभव येऊन सद्गुरूंच्या चरणकमली अंहब्रम्हास्मीच्या अनुभवाने आत्मसाक्षात्काराचे सुख व शांती लाभुन परमानंदी निमग्न होऊन अक्षर वा अक्षर परब्रम्हाच्या ब्रम्हानंदात गुरू दर्शनाचा लाभ होत रहातो. सद्गुरू हेच सांगतात परंब्रम्हाच्या ब्रम्हानंदात जे सुख आहे ते अन्य कोठे नाही.

ब्रम्हानंदं परं सुखदं ।। केवलं ज्ञाणमुर्ती ।।

        गुरू हे ज्ञानमुर्ती आहेत. विश्वास हा मनुष्य जिवनाचा एक महत्वाचा भाग आहे. कसलेही कार्य करावयाचे असेल तर मनातुन विश्वास ठेऊन केले तर ते निश्चितच सफल होते. जर विश्वास न ठेवता मनात अनेक प्रकारच्या शंका घेऊन कार्य कराल तर सफल होत नाही. विश्वास ही एक कार्यारंभी. अंतःकरणाच्या ठायी परीपुर्ण भाव व विश्वास ठेऊन कार्य केल्यास ते कार्य यशस्वी होते. विश्वास ही एक फार मोठी बाब आहे. अविश्वासाने कार्यात मन लागत नाही मनोभावना खचत जातात. करीत असलेल्या कामात अनेक अडथळे निर्माण होतात. व दिवसेंदिवस त्या कामाविषयी मनाच्या ठायी नैराश्य  निर्माण होऊ लागते मन उदिग्न होऊन ते काम यशस्वी होण्यास अनेक प्रकारची अडथळे निर्माण होतात. जर का अंतःकरणातुन विश्वास ठेऊन मनाचा निश्चय करून ठरविले तर हे काम आपणच निश्चित सहजपणे पार पाडुन यशस्वी होऊ शकतो. असा मनाचा दृढनिश्चय  करून परीपुर्ण विश्वास ठेऊन करीत राहील्यास विश्वाच्या शक्तीने ते कार्य यशस्वी होऊ शकते. यासाठी मनुष्य जिवनात कसल्याही कार्यासाठी विश्वास ही प्रथम पायरी आहे. मनातुन अंतःकरणातुन विश्वास ठेवला पाहिजे त्याचप्रमाणे आध्यात्म मार्गात प्रभुच्या भक्तीत व गुरू भक्तीत समाजसेवेत दुःखीतांचे दुःख निवारनार्थ व परोपकारात मनाच्या अंतरंगात परीपुर्ण विश्वास ठेऊन सेवाधर्म म्हणुन निष्काम सेवा करणे, हीसुध्दा आत्मविश्वास सर्व कर्मे केली पाहीजेत. तरच गुरू सेवेचे फळ मिळते. श्री परम पुज्यनिय सद्गुरू काशिनाथ महाराज एका परम भक्त असणाऱ्या शिष्याची  गोष्ट सांगतात.

।। श्री सद्गुरू यल्लालिंग महाराज मुगुळखोड।।  यांचे सेवाधारी एक सद्भक्त शरणप्पा नुली हा मोठे महाराजांचा शिष्य मुगळखोड मठात श्री गुरूमाउलींची सेवा करण्यासाठी सतत २९ ते ३० वर्षे एकनिष्ठ भावाने गुरूसेवा करीत असे. गुरूंच्या सेवेत यत्किंचितही चुक न होऊ देता रांत्रदिन सेवेत तत्पर रहात असे, गुरू महाराजांचे जे काही शब्द गुरू मुखातुन बाहेर पडताच जो डाव्या हाताचा अंगठा डाव्या कानात घट्ठ घालुन जेंव्हा कान बंद करून, ते पवित्र शब्द उजव्या कानाने एैकत असे, प्रत्येक शब्दाचा अर्थ करून त्या अर्थाचे मनन करून निदिध्यास करीत असे. गुरू मुखातुन बाहेर पडलेल्या बहु मोल किमतीच्या प्रत्येक शब्दाचा एक पुष्प हार गुंफुन इतर वेळी तोच शब्द गुणगुणत असे. गुरूंच्या सत्संगतीत राहुन आश्रमातील अबालवृध्द व येणाऱ्या भक्ताना महाराजानी केलेला उपदेश पुन्हा पुन्हा प्रेमभावाने सांगत असे. परमभक्त शरणप्पा नुली नेहमी हेच सांगत असायचे, अहो उजव्या कानाने गुरूबोध ऐकावा नसता तो डाव्या कानातुन आला तसा बाहेर पळुन जातो. त्यासाठी गुरू बोध ऐकताना  डाव्या कानात बोट घालुन हवा बंद करावी व उजव्या कानाद्वारे ऐकल्याने तो शब्दध्वनि बाहेर न जाता आतच जमा रहातो. जमा खर्चात जमेचा आकडा १०० टक्के रहातो. एवढयासाठी आपल्या सर्वांचा गुरूभक्तीवर गुरूसेवेवर आत्मविश्वास होतो. विश्वासाची वाढ होऊन एक भला मोठा विश्वासाचा संच जमा होतो. विश्वास नावाचा महावृक्ष तयार होतो. त्या विश्वास वृक्षाच्या छायेत हजारो भक्त एकत्र येऊन अक्षय सुखाचा आनंद भोगतील. व गुरूसेवेत निष्काम भाव ठेऊन गुरूसेवा करीत राहतील तेंव्हा त्या सर्वांचा विश्वास पक्का होऊन आत्मविश्वासाची प्राप्ती होते. आणि गुरू सेवेच्या परमानंदाचा सुखसोहळा पहाण्याचे भाग्य लाभते. व आत्मप्रचितीचा लाभ होऊन संपुर्ण शास्त्र पुराणाची प्रचिती आपोआपच लाभते.  

          विश्वास आणि प्रचिती दोन्ही प्राप्त होतात. व हे सर्व वेद वेदांत शास्त्रे उपनिषदे महान संस्कृत ग्रंथ या देह भांडारात सामावले जातात. त्याच क्षणी विश्वासाच्या महान शक्तीने गुरू सेवेच्या निष्काम सेवेने मन शुध्द निर्मळ गंगाजळाप्रमाणे पवित्र होते. आणि हे भौतीक सुख ऐहिक असल्याची प्रचिती येऊन सत्य सुखाच्या अनुभुतीने गुरूचरणावर एकविंद्य भाव ठेऊन गुरू चरणी एकरूप रहातो. इथेच त्याला परमानंदाची प्राप्ती होते.

           विश्वास हा महाभयंकर असुन सर्व शक्तीने परीपुर्ण भरलेला एक महासागर आहे, अवाढव्य विस्तीर्ण प्रसरण होणारा एक हिमालय कैलास पर्वतच आहे. विश्वासातच हे ब्रम्हांड सामावलेले आहे. सर्व यशाचे सुयश विश्वासातच गुप्तरूपाने वास्तव्य करीत असते. जिथे विश्वास आहे तिथे यश आहे. यशाची  गुरूकिल्ली विश्वास हीच आहे. श्री परम पुज्यनिय सद्गुरू काशिनाथ महाराज म्हणतात, आत्मविश्वास हे मनुष्य जिवनाचे रक्षण करणारे महाभयंकर शस्त्र आहे. आत्मविश्वासाने आपण आपले जिवन सुखात जगु शकतो पण अज्ञानाच्या काळयाकुट्ठ अंधारात आपण गाढ निद्रेत आहोत, या अज्ञानाच्या काळयाकुट्ट अशा गाढ झोपेतुन जागे होऊन विश्वास ज्ञानाच्या महान प्रकाशात थोडे डोकावुन पहा. तेंव्हा विश्वासातून आत्मविश्वासात पोहचुन सत्य सुखाचा व परमानंदाच्या सान्निध्य निद्रिस्त होऊन, त्याही पलीकडे थोडे डोकावुन पहा त्याच क्षणी अहंब्रम्हास्मीचा ध्वनिनाद - वेणुनाद - घंटानाद - भ्रमरनाद - शंखनाद - अहंब्रम्हास्मी - अहंब्रम्हास्मी असा मृदु व मुलायम ध्वनि नाद निनादत असल्याचा भास होईल. सांगण्याचा तात्पर्य म्हणजे अविश्वासातून विश्वासात परिवर्तन होऊन परमपदाच्या ठायी निजरूप होते. हेच त्या परमभक्तीचे तरंग आहेत.  

          मन त्या नादब्रम्हात तल्लीन होऊन जाते. अनेक प्रकारची वृक्षवल्ली, जलाशय पवित्र तिर्थदर्शन, नानाप्रकारचे रंग तरंग प्रत्यक्ष दर्शनी दिसु लागतात, तर काही सुवर्णमय गोलार्ध व असंख्य सोनेरी किरणे झळकत राहतात. गोलार्धात लख्ख श्वेतवर्ण रंगाच्या चांदण्याप्रमाणे शुण्यवत टिंब आणि क्षणार्धात त्या सुवर्णमय चक्राच्या गोलार्धात गती येते व तो गोल फिरता फिरता त्या व्हिलपावर येऊन गतीशील होते. आतील केंद्रस्थानी मध्यंतरी दिसणारे सुक्ष्म श्वेतरंगी लख्ख शून्य हळु हळु पुढे पुढे दुर जात रहाते. त्या शून्याच्या भोवती अ. उ. म. या मात्रा उमटतात. शून्याच्या खाली प्रत्यक्ष ॐ आकार तयार होऊन ॐ आकाराने परिपुर्ण दर्शन होते. या वेळी भक्त (साधक) ॐ चे दृष्य पहात स्थिरावतो. 

         ॐ च्या भोवती परत एक कंगण तयार होऊन ते तेजपुंज सुवर्ण चकाकत राहते. त्याच्या बाहेर बाजुनी असंख्य सुक्ष्म किरणे, नानाप्रकारच्या रंगात चकाकत राहतात या अवस्थेत साधक नामस्मरणात एकाग्र होऊन हे सर्व दृष्य आनंदमय वृत्तीने दृष्टीसमोर पाहात राहतो. याच स्थितीत ज्या देवतेची उपासणा करतो किंवा जसा भाव तसा त्याला अनुभव येऊन त्या त्या देवतेचे प्रत्यक्ष दर्शन होते. जर का गुरू चरणी विश्वास ठेऊन साधना केली तर गुरू मुर्तीचे दर्शन होते. ज्या देवतेबद्दल आपला जसा भाव आहे त्याप्रमाणे त्या त्या देवतेचे दर्शन होते. यालाच म्हणतात ब्रम्हसमाधी. यासमाधीद्वारे साधक रात्र रात्र एकाग्रतेत आसनस्थ शांत चित्त बैठकीत अनेक प्रलोभणे, प्रक्षालन करीत असतो. ब्रम्हसमाधीची ज्या साधकाना प्राप्ती होते तो अहंब्रम्हास्मी, परमात्मा अन्य कोठे नसुन हे जग व्यापुन चराचरात भरलेला आहे. सर्व जिवमात्राच्या ठायी परमेश्वर व्याप्त असुन प्रत्येक जिवात प्रभुचा वास आहे. याची प्रत्यक्ष अनुभुती येते, नामाच्या पवित्र स्मरणातुन प्राप्त होते व त्या साधकाला अहं नाहीसा होऊन मी नाही, तो नाही, फक्त ईश्वरी शक्तीच आहे, सर्व जिवमात्रात संचारण करीत आहे, हेच त्याच्या अनुभवास येते. साधनेच्या महान शक्तीने अखंड नामस्मरणाच्या ध्यासाने गुरूचरणाच्या सेवेत अहं भाव लय होतो. केवळ शुध्द चैतन्य स्वरूप शिल्लक रहाते. आणि चैतन्य प्रकाशात  त्या परम पवित्र परमात्म स्वरूपात निमग्न होऊन आत्मानुभुतीने आत्मज्ञानाच्या शक्तीने अंतःकरणातुन गुरूचरणावर दृष्टी स्थीर होते. तीच सेवा ही सफल होऊन सर्व कार्य सिध्दी होतात. त्यासाठी भक्ती विश्वास ठेऊन केली जाते तीच शेवटचा क्षण गोड करते.

टिप्पण्या

  1. जय सद्गुरू फार दिवसानंतर आम्हाला हे ऐकायला पाहायला मिळाले खूप आनंद वाटला खूप सुंदर मार्गदर्शन आहे यामध्ये आत्मदर्शन होईल याप्रमाणे वागल्यास
    खूप छान उपदेश आहे महाराजांचा
    धन्यवाद पूजा
    ग्रुप वर टाकल्याबद्दलअवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशिनाथ महाराज की जय


    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा